मुंबई : मुंबई महानगरपालिका २१ ऑगस्टपासून शहरात कडक प्लास्टिक बंदीची पुन्हा अंमलबजावणी करणार आहे. त्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, पालिका अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी आणि पोलीस हवालदार यांच्याद्वारे फेरीवाले, दुकाने आणि मॉल या ठिकाणी संयुक्त छापे टाकण्यात येणार आहेत.
छाप्यांमध्ये सामील होण्यासाठी एमपीसीबीने २४ पोलिस अधिकाऱ्यांची यादी देण्यात आली असून प्रत्येक प्रभागात पाच जणांचे पथक प्लास्टिक वापराविरोधात काम करणार आहे. यात एकूण १२० लोकांचा संघ एकत्र काम करेल. महाराष्ट्र सरकारने मार्च २०१८ पासून प्लास्टिकचे उत्पादन, विक्री, वापर आणि साठवणूक यावर बंदी घातली आहे. तेव्हापासून पालिकेकडून याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत असून मागील वर्षात पालिकेने १,५८६ छापे टाकत ५२८५ किलो प्लास्टिक जप्त केले आणि ७९ लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.
या बंदीमध्ये सर्व प्लास्टिक पिशव्या, पाउच, वाट्या आणि २०० मिली पेक्षा कमी बाटल्यांचा समावेश आहे. यात निर्दिष्ट दुधाचे पाऊच वगळता सिंगल-यूज थर्माकोल प्लेट्स आणि ग्लासेसचाही समावेश आहे. पालन न केल्यास पहिल्यांदा ५००० रुपये दंड तर त्यानंतर अनुक्रमे १०,००० रुपये आणि २५,००० रुपये दंड ठोठावण्यात येणार असून या गुन्ह्या अंतर्गत तीन महिन्यांचा तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो.