ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काही दिवसांत झालेले रुग्णांचे मृत्यू धक्कादायक व चिंताजनक आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधून रुग्णांवर उपचार करावेत, अशी सूचना आ. निरंजन डावखरे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस करून सर्वांना धीर दिला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचीही उपस्थिती होती.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दोन-तीन दिवसांत अचानकपणे मृतांची संख्या वाढल्यावर खळबळ उडाली. याची दखल घेत आ. निरंजन डावखरे व जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनीही रुग्णालयात येऊन प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. तसेच मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
सिव्हिल हॉस्पिटलच्या स्थलांतरानंतर कळवा रुग्णालयामध्ये यापुढेही ठाणे व पालघर जिल्ह्यातून रुग्णांची संख्या वाढणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कळवा येथील हॉस्पिटलवरील ताण वाढणार असल्याकडे लक्ष वेधले होते. आता या गंभीर परिस्थितीची राज्य सरकारने तत्काळ दखल घेऊन कळवा रुग्णालयामध्ये युद्धपातळीवर उपाययोजना करावी, अशी मागणी आ. डावखरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर शहरातील खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधून रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पार्किंगच्या जागेत रुग्णांवर उपचारासाठी सुविधा सुरू करावी. सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोविडमध्ये कामावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा नोकरीवर घ्यावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात येईल, असे आ. डावखरे यांनी सांगितले. तर, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात जादा डॉक्टर, नर्स आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी संजय वाघुले यांनी केली.