मुंबई : दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जूनला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी कथानकापासून या चित्रपटातील संवादावरही ताशेरे ओढले होते. लोकांच्या भावनांशी खेळल्याचा आरोपही दिग्दर्शक आणि लेखरांवर करण्यात आला होता. तसेच, या चित्रपटातील वादग्रस्त संवादावरुन तर वेगळेच वादंग निर्माण झाले होते. प्रेक्षकांकडून यामधील वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची मागणीही वारंवार केली जात होती. देशभरातून प्रचंड टीका झाल्यावर चित्रपटातील काही संवाद लवकरच काढून टाकले जातील अशी ग्वाही संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी दिली होती आणि त्यानंतर दोन दिवसांनी ‘आदिपुरुष’मधील काही संवादांमध्ये बदल करण्यात आला होता. अखेर या सगळ्या वादानंतर २३ दिवसांनी मनोज मुंतशीर यांनी जाहीरपणे आपली चूक मान्य करत सोशल मीडियावर माफी मागितली आहे.
“‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे मी समस्त जनतेच्या भावना दुखावल्या आहेत हे मला मान्य आहे. माझे सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ मंडळी, आदरणीय साधू-संत आणि प्रभू श्रीरामाचे भक्त यांची मी हात जोडून क्षमा मागतो. भगवान हनुमानाचे आशीर्वाद सदैव आपल्याबरोबर आहेत. देव आपल्याला पवित्र सनातन आणि आपल्या महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!” असे ट्वीट करून मनोज मुंतशीर यांनी जनतेची माफी मागितली आहे.