लखनऊ : उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथील हनुमान मंदिराजवळ एका गोणीत मांस सापडले आहे. गोणीतून रक्त वाहत होते, स्थानिक लोकांनी पोती उघडली असता त्यात मांस आढळले. यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी माहिती मिळताच रास्ता रोको आंदोलन केलं. एफआयआर नोंदवून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी संघटनांनी केली.
शाहजहांपूरातील मोहल्ला कच्चा कटरा तिराहा येथे हनुमान मंदिर आहे. हा शहरातील सर्वात वर्दळीचा चौक आहे. याठिकाणी चोवीस तास पोलीस बंदोबस्त तैनात असतो. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरा हल्लेखोरांनी हनुमान मंदिराबाहेर मांसाने भरलेली गोणी फेकून दिली. गोणीतून रक्त सांडून रस्त्यावर पसरले होते.
मांसानी भरलेली गोणी सापडल्यानंतर लोकांनी हिंदू संघटनांना याबाबत माहिती दिली. यानंतर मंदिराजवळ मांसाची गोणी सापडल्याची बातमी संपूर्ण शहरात पसरली आणि मोठ्या संख्येने लोक हनुमान मंदिराजवळ जमा झाले. हनुमान मंदिराबाहेर मांसाने भरलेली पोती फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.