हिन्दव: सोदरा: सर्वे काळाची गरज

    08-Jul-2023   
Total Views |
Article On Muslim society Situation In The World

नुकतेच सलमान मोमिका याने स्वीडनमध्ये कुराण जाळले. या घटनेचा निषेधच. पण, यानिमित्ताने जगभरातले ५७ मुस्लीम देश एकत्र आले. इतकेच काय आपल्या संविधानाने सांगितलेल्या निधर्मी भारतातही अनेक ठिकाणी मुस्लीम समाज एकत्र आला. संघटन कधीही चांगलेच. जीवंत हिंदू बांधवांच्या जगण्यासाठी आणि अस्तित्वासाठी आता आणि भविष्यातही अनेक प्रश्न उभे राहणार आहेत. भारतातल्याच नव्हे, तर जगभरातल्या हिंदूंच्या अस्तित्व आणि कल्याणासाठी आता एकच पर्याय शिल्लक ‘हिन्दव: सोदरा: सर्वे, न हिन्दू पतितो भवेत्’

कोणतेही धार्मिक ग्रंथ जाळणे, हे कृत्य निषेधार्हच. कारण, ग्रंथ जाळल्याने त्या ग्रंथावर नितांत श्रद्धा असणार्‍यांच्या विचार-आचारांमध्ये काही फरक पडत नसतो; उलट त्या ग्रंथाशी ज्यांची म्हणून अस्मिता जोडलेली असते, ते जोमाने एकजूट होतात. स्वीडनमधल्या मूळच्या इराकी व्यक्तीने सलमान मोमिका याने बकरी ईदच्या दिवशीच मशिदीसमोर कुराण जाळले. त्या विरोधात जगभरातले मुस्लीम एकवटले. ५७ मुस्लीम देशांनी एकी करत स्वीडनविरोधात आघाडी उघडली. यामध्ये अंतर्गत हिंसा-युद्ध सुरू आहे. ’घरी नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशी गत असणारे पाकिस्तान, इराण आणि मोरक्को. या देशांनी स्वीडनचे दूतावास बंद करून टाकले. स्वीडनमधून त्यांच्या राजदूतांना बोलवून काय घेतले, एक ना अनेक. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये काय चालू आहे? स्वीडनमध्ये पवित्र कुराण जाळले गेले, त्यामुळे आमच्या श्रद्धांवर आघात झाला.

जगभरातल्या ५७ मुस्लीम देशांनी स्वीडनविरोधात एकजूट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरात मोठे मानाचे स्थान आहे. त्यांनी या स्थानाचा उपयोग करून स्वीडनवर दडपण आणावे. कुराण जाळणार्‍यावर तत्काळ कारवाई करावी. देशातील इस्लामिक सेंटर या विरोधात आवाज उठवणार आहे, अशा आशयाचे निवेदन अलीगढच्या माजी महापौर फुरकान यांनी स्थानिक जिल्हाधिकार्‍यांना दिले. झाशी येथेही मुस्लीम संघटनांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना असेच एक आवाहन केले. देहरादून येथे स्वीडनच्या पंतप्रधानांचा पुतळा जाळण्यात आला. मुंबईमध्ये मिनार मशिदीच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात मुस्लीम एकत्र आले आणि त्यांनी स्वीडनचा निषेध केला. ‘रजा अकादमी‘सह अनेक मुस्लीम संघटना यानिमित्ताने पुन्हा सक्रिय झाल्या. अर्थात, जगभरात कुठेही काही घडले की, त्यासंदर्भात भारतात आंदोलन-मोर्चे वगैरे काढून शक्तिप्रदर्शन केले जाते. रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये मोर्चा काढत हिंसा करणार्‍या अगदी पोलीस भगिनींना मारहाण करणारा मोर्चा मुंबईकर कधी, तरी विसरतील का?

‘इस्लाम मतलब सब की सलामत‘ असे सांगणारा धर्म असे सगळेच मुसलमान सांगतात. इस्लाममध्ये शांती, अमन आणि इमानचे महत्त्व, असेसुद्धा सांगतात. सच्चा मुसलमान म्हणजे सद्गुणांचा पुतळा असतो, हे आपण अनेक हिंदी चित्रपटातून पाहिलेलेही आहे. (म्हणजे आपल्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे) या परिघामध्ये प्रश्न पडतो की, भारतीय मुसलमानांची मानसिकता सध्या काय असेल? अर्थात, नबी आणि कुराण याविरोधात ’ब्र’ ही उच्चारलेले त्यांना खपत नाहीच. पण, हल्ली-हल्ली तर बुरखा, जिहाद अगदी गोहत्या वगैरेविरोधात अभिव्यक्त होणेही त्यांना खपत नाही. आपण कुणीतरी वेगळे आहोत आणि आपल्या सोबतचे गैरमुस्लीम जग काय करते, याच्याशी आपले काही सोयरसुतक नाही. इस्लामच्या संवर्धनासाठी आसमानी किताबमध्ये जे सांगितले ते आणि तेच करायचे, असा अलिखित वज्र नियम पाळण्यासाठी आपण जन्मलो, ही मानसिकता मुस्लिमांमध्ये ठायी ठायी आढळते. याचे अनुभव अनेकदा आलेत.

जसे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ‘तिहेरी तलाक‘ विरोधी कायदा आणला. तेव्हा मुंबईतील मुस्लीम महिलांशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे होते की, ”आमच्या इस्लाममध्ये जे सांगितले ते आणि तेच राहणार. त्यात बदल होणे आम्हाला मान्य नाही. अल्लाचा कायदा सर्वश्रेष्ठ. आमचे चांगले वा वाईट अल्लाच करणार. माणसाने तेही हिंदू माणसाने (मोदींनी) आमच्यासाठी कायदा करणे म्हणजे अल्लाच्या नियोजनाविरोधात आहे.” दुसरा अनुभव असा की, काही मुस्लीम देशांमध्ये आणि आपल्या भारतातसुद्धा काही मुस्लिमांमध्ये महिलांचाही खतना केला जातो. त्याबद्दल लेख लिहिला असता, त्या समाजातील महिलांचे म्हणणे होते की, ”आमच्या समाजातील एका तरी महिलेने तुझ्याकडे तक्रार केली की, त्यांचा खतन्याला विरोध आहे. आम्ही आमच्या धर्मपरंपरेसाठी काहीही करायला तयार आहोत. आम्हाला त्रास होत नाही, उलट घालून दिलेले नियम आणि प्रथा आम्ही पाळतो. मृत्यूनंतर आमचे जगणे, इशांअल्ला खूप चांगले असणार.” अर्थात, यावर काय बोलणार?

मुस्लीम मन समजून घ्यायचे असेल, तर ’रिल्स’ या समाजमाध्यमावर एक चक्कर टाका. बाल ते अगदी वयोवृद्ध हौशी लोक त्यांची अभिव्यक्ती या माध्यमावर सादर करतात. या अभिव्यक्तीच्या दर्जावर अनेकांचा आक्षेप आहे, ही बाब वेगळीच. रिल्समध्ये अनेक मुस्लीम युवक इस्लाममध्ये हराम असलेले संगीत आणि नृत्य वगैरे सादर करत असतात. त्यांना इंशाअल्ला माशाअल्ला म्हणत अनेकजण पसंती देतात. मुस्लीम नसलेल्या लोकांनी त्यातही युवतींनी ’रिल्स’ बनवले, तर त्यावर पसंतीचा शिक्कामोर्तब करून हिरिरीने जवळीक साधणार्‍यांमध्ये भाईजान, चाचाजान बहुसंख्य दिसतात. मात्र, ’रिल्स’ बनवणार्‍या मुस्लीम महिला कमी आहेत. त्यातही ज्या ’रिल्स’ बनवतात, त्या महिलासांठी जे संदेश असतात ते वाचले की, मुस्लीम पुरूष त्यांच्या रूढीपरंपरांबाबत किती पक्के आहेत, हे कळते.

मुस्लीम मुलींच्या ’रिल्स’वर संदेश देताना त्यांचे ठरावीक संदेश असतात. ”तुम्हारे अब्बू अम्मीने तालीम दी की नही.” तसेच, ”इस्लाम मे हिजाब पेहनना जरूरी हे ये” व ”अल्लासे डर, व्हिडिओ बनाना और सबके सामाने आना इस्लाममे हराम हैं,”, ”अल्लाह हिदायत दे, अल्लाह को क्या मुह दिखायेगी. दोजख मे जावोगी”, ”अभी समय हे अल्ला अल्ला कर.” तर ज्या मुलींनी बुरखा किंवा हिजाब घातला असेल त्यांना संदेश असतो, ”तुम्हे प्यार से समझा रहा हू बेहेन हिजाब पेहन के ये येडेचाले मत कर, बुरखे को बदनाम मत कर. हिजाब पाक हैं.” ”सच्ची मुस्लीम मोहतरमा व्हिडिओ नही बनाती.” काही-काही लोक सरळ धमकीच देतात. बहुतेकदा चित्र असेच असते की, सगळे भाईजान-चाचाजान एकत्र येऊन आवाहन करतात की, त्या मुली-महिलेच्या समाजमाध्यमावरील अकाऊंटचा रिपोर्ट करून तिचे अकाऊंटच बंद पाडा. तिचे अकाऊंट एकत्रित येत ते त्यावर अंमलबजावणीही करतात. ’रिल्स’वर जाणवलेले ‘मुस्लीम बद्ररहूड‘ अफलातून असते.

‘मुस्लीम बद्ररहूड‘ ही संकल्पना मुस्लीम मनात अमरच झालेली. त्यामुळे वस्तीपातळीवर एक मुस्लीम असेल आणि इतर मुस्लिमेतर असतील, तर त्या वस्तीत मुस्लिमेतर कधीही एकत्र येणार नाहीत. मात्र, या एकट्या मुस्लीम व्यक्तीसाठी बाहेरच्या वस्तीतले आणि शहरातलेही मुस्लीम एकत्र येतात. याबाबत पुण्याच्या एका सामाजिक कार्यकर्त्यांने सांगितलेली घटना आठवते. या व्यक्तीचे परिचित हिंदू कुटुंब कर्नाटकमध्ये राहत होते. त्यांची अल्पवयीन मुलगी एका मुस्लीम युवकाच्या संपर्कात आली. अचानक एके दिवशी ती घर सोडून निघून गेली. कुणी तरी तिला स्टेशनवर पुण्याला जाणारी रेल्वे पकडताना पाहिले. तिच्या पालकांनी पुण्याच्या या सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क केला. या कार्यकर्त्याने पुणे स्टेशनवर त्या मुलीला पकडले. तिच्यासोबत तो युवक होताच. या दोघांना घेऊन कार्यकर्ता पोलीस स्थानकात गेला. मात्र, तिच्या पालकांनी फोन करून सांगितले की, ”पोलिसांत तक्रार केली, तर इज्जत जाईल. फार तर पोलिसांना मुलामुलीला दम द्यायला लावा.

मुलीला ताब्यात घ्या.” पोलिसांनी दोघांची चौकशी केली. त्या मुलाचे म्हणणे त्याचे इथे कुणीच नव्हते. चौकशीदरम्यान पोलीस स्थानकामध्ये गर्दी करत भाईजान-आपाजान आले. पोलिसांना म्हणाले, ”मुलगी सलामत आहे. तुम्ही या मुलाला सोडा.” पोलिसांनी या लोकांना विचारले, ”तुम्ही कोण?” त्यांनी उत्तर दिलेे, ”आमच्या कौमचा बच्चा आहे. त्याचे इथे कुणी नाही, त्याची जबाबदारी आमची आहे ना.” नंतर ते त्या मुलाला घेऊन गेले. दोन-चार दिवस त्याचा पाहुणचार करून त्याला स्वखर्चाने त्याच्या घरी पाठवले. (हे त्या कार्यकर्त्याने सांगितले) तर असेही ब्रदरहूड. इतके की, तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कू्ररतेची राजवट लादली, तेव्हा त्याविरोधात निषेध करूया, असे काही पुरोगामी मुस्लिमांना म्हटले तेव्हा त्यांचे म्हणणे, ”त्यांच्या कृत्याला आमचे समर्थन नाही. मात्र, ते आमचे मुस्लीम बांधव आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करू शकत नाही.”

फ्रान्स असो की, इराण की, स्वीडन की, पाकिस्तान की, अफगाणिस्तान, या देशांमध्ये जे चालले आहे ते काय आहे? पाश्चिमात्य विचारसरणी मिरवणार्‍या युरोपला आपला ’युरेबिया’ (अरेबियाच्या धर्तीवर) होईल अशी भीती का वाटते? पाकिस्तानमध्ये तर तेथील अल्पसंख्याक हिंदू, शीख आणि ख्रिस्ती लोकांवर भीषण अत्याचार सुरू आहेत. चला मान्य करू की, हे सगळे अल्पसंख्याक मुस्लिमेतर आहेत, पण पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लिमांवर जे अत्याचार सुरू आहेत किंवा इतर मुस्लीम देशांमध्ये शिया-सुन्नींमध्ये जी हिंसा सुरू आहे, त्याचे काय? आफ्रिका खंडातील डझनभर देशांमध्ये शरिया कायदा लागू व्हावा, म्हणून अनेक दहशतवादी संघटना अस्तित्वात आल्या. त्यांच्यामुळे लाखो कुटुंब देशोधडीला लागली. निंदा तर या संघटनांचीही व्हायला हवी. आंदोलन तर या असल्या संघटनांच्या विरोधातही व्हायला हवीत. पण, दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके लोक भारतात आहेत, जे या सगळ्या दहशतवाद्यांविरोधात बोलतात. या परिक्षेपात इतरांनी काय केले पाहिजे? तर जगभरच्या हिंदूना एकच विनंती आहे की

हिन्दव: सोदरा: सर्वे,
न हिन्दू पतितो भवेत्।
मम दीक्षा हिन्दू: रक्षा,
मम मंत्र: समानता॥
ही संकल्पना जीवनात रूजवली पाहिजे. अर्थात, सगळे हिंदू हे बंधू आहेत. एक हिंदू असताना दुसरा हिंदू पतित राहू शकत नाही. माझी दीक्षा हिंदू रक्षा असून, माझा मंत्र समानतेचा आहे. हा मंत्रच आता जगभरातल्या आणि भारतातल्याही हिंदूंना तारू शकतो.
 
९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.