कला अन् कलाकारांचे ‘जनस्थान’

    31-Jul-2023
Total Views | 150
Article On Jansthan President Abhay Ozarkar

‘जनस्थान’ व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गेली नऊ वर्षं कला आणि कलावंतांसाठी अभिनव उपक्रम राबविणारे ‘जनस्थान’चे सर्वेसर्वा अभय ओझरकर यांचा जीवनप्रवास!

अभय ओझरकर यांचा जन्म मुंबईतील परळचा. अभय यांचे वडील नाशिकच्या ‘सिक्युरिटी प्रेस’मध्ये नोकरीला. त्यावेळी बालपणी ते मुंबईत आजोळी जात. तिथे सांस्कृतिक वातावरणात त्यांचे बालपण गेले. आजोबा दत्तात्रय परळकर यांना शास्त्रीय गाण्याची आवड, तर अभय यांचे मामा, नाटकामध्ये अभिनय करत. साहजिकच अभय यांचीही नाटक, चित्रपट कलांमध्ये अभिरुची विकसित होत गेली. बालपणापासून चित्र, अभिनय, शिल्प, फोटोग्राफी यांची विलक्षण आवड असणार्‍या अभय यांनी सातवीत शिकत असतानाच फोटोग्राफीची कला अवगत केली.

अभय यांची फोटोग्राफीची आवड पाहून वडिलांनी त्यांना हजार रुपयांचा कॅमेरा ‘सेकंड हॅण्ड’विदेशी पर्यटकांकडून विकत घेऊन दिला. त्यानंतर अभय यांची गट्टी फोटोग्राफीशी जुळली ती कायमचीच! शाळेत स्नेहसंमेलनांचे ते सुरेख फोटो काढत. ही आवड बघून त्यांना ग्रामीण भागात विवाहाच्या छायाचित्रणासाठी बोलवले जाऊ लागले. अल्पावधीतच त्यांचे सर्जनशील फोटोग्राफर म्हणून नाव झाले. साध्या कॅमेर्‍यांवर त्यांची फोटोग्राफी बहरत गेली. कृष्णधवल आणि रोल कॅमेर्‍यांवर त्यांनी फोटोग्राफीला सुरुवात केली. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी पुढे फोटोग्राफीचा डिप्लोमाही पूर्ण केला. एकीकडे फोटोग्राफी कला अर्थार्जनासाठी सुरू ठेवून कला नाटक, फोटोग्राफी, शिल्प, चित्र, संगीत अशा कलांची आवड जोपसणे सुरू ठेवले. प्रेस फोटोग्राफर म्हणनूही वृत्तपत्रांमध्ये काम केले.

नाशिकमधील कलावंत, रंगकर्मी यांच्यात प्रंचड क्षमता असून, ते पुण्या-मुंबईतील कलाकारांच्या तुलनेत मागे का पडतात, याचा अभ्यास करून कलेसाठी, कलाकारांसाठी योगदान देण्याची खुणगाठ त्यांनी बांधली. नाशिककर कलाकार आणि त्यांच्या कला यांना मंच देण्यासाठी त्यांनी ’जनस्थान’ हा व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. विखुरलेले आणि एकएकटे कलावंत या माध्यामतून एकत्र होत गेले. त्यांना गु्रपच्या माध्यमातून कलावंतांचा संवाद, संपर्क वाढत गेला. कलाकारांच्या कलेला नवे व्यासपीठ मिळावे म्हणून त्यांनी सर्वांना सोबत घेऊन अविरत उपक्रम राबबिले. ‘जनस्थान फेस्टिव्हल’ला त्यातूनच प्रारंभ झाला. ‘जनस्थान’च्या पहिल्या वर्धापन दिनी मिलिंद गांधी यांनी लिहून दिलेल्या गाण्याला संजय गीते यांनी चाल दिली. ते गीत अत्यंत गाजले. ‘जनस्थान’च्या पहिल्या वर्धापन दिनी नाशिकचे सर्व कलावंत, चित्रकार, आर्टिस्ट एकत्र आले. विचारांचे आदानप्रदान होण्यासह नवीन विद्यार्थ्यांना कलेतून संधी, मंच देण्याचे काम झाले.

पुढे २०१६ मध्ये ‘जनस्थान’ गु्रपमधील दिग्गज कलावंतांना सन्मानित करण्यासाठी ‘जनस्थान आयकॉन पुरस्कार’ दिला जावा, ही संकल्पना अभय यांनी मांडली. त्याला सर्वांनीच पाठिंबा दिला. आता दरवर्षी नाशिकच्या भूमीत कला क्षेत्रात योगदान देणार्‍या व्यक्तिमत्त्वांना ‘जनस्थान आयकॉन पुरस्कार’ देऊन गौरवले जाते. ’जनस्थान पुरस्कारा’साठी ‘हा’ पुरस्कार मिळालेले कलाकार तसेच नाशिकच्या दिग्गज तसेच प्रतिष्ठीत अभ्यासूंच्या ‘ज्युरी’च्या माध्यमातून पुरस्काराची निवड केली जात आहे.

‘जनस्थान’ने भारतीय संस्कृती जोपण्यासाठी ‘वासुदेव’ ही लुप्त होत जाणारी लोककला आणि लोककलावंत घेऊन गु्रपमधील वाढदिवस असलेल्या सभासदांच्या घरी जाऊन ‘जन्मदिवस’ साजरा करण्याची संकल्पना राबवायला सुरुवात केली. त्या सभासदाला पुस्तक देऊन वाढदिवस साजरा केला जातो. नाशिकमध्ये कला क्षेत्रात मोठे योगदान असणार्‍या १५० दिग्गज कलावंतांचा गु्रप असलेल्या ‘जनस्थान गु्रप’चे अभय ओझरकर हे एकमेव ‘अ‍ॅडमिन’ आहेत.

‘जनस्थान गु्रप’मधील कलाकारांनी ‘कोविड’ काळात घ्यावयची काळजी, काय करावे, काय टाळवे, यांचे छोटे-छोटे व्हिडिओ क्लिप तयार करून त्यांना जनमानसात प्रसिद्ध केले. ‘कोविड’ काळात नाशिकमधील कलाकार, पडद्यामागच्या कलावंतांना ‘जनस्थान’तर्फे भरीव मदत करण्यात आली. ‘आठवणीतील चहा’ हा उपक्रम जानेवारीच्या पहिल्या सप्ताहात दरवर्षी केला जातो. या माध्यामतून नाशिकरांना मोफत चहा दिला जातो. यातून नाशिकचे सर्व मित्रमंडळी, नाशिककर एकत्र येऊन भावनांचे, आठवणींचे आदानप्रदान करतात.

यंदा ‘जनस्थान’ आपला दशकपूर्ती वर्धापन दिन सोहळा दहा दिवस साजरा करणार आहे. त्यावेळी कलेतील दिग्गजांचा महाउत्सव भरणार असल्याचे अभय सांगतात. ध्वनी, संगीत, रेकॉर्डिंग आदी तंत्रज्ञांसह नाशिकच्या कलावंतांची चित्रपट, नाटक, संगीत जाहिरात यासाठी ’टेक्निकल’ चमू तयार करण्याचा, तसेच नाशिकमध्ये फिल्मसिटी सुरू व्हावी, हा ‘जनस्थान’मधील कलावंतांचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभय ओझरकर सांगतात. त्यांच्या या आणि एकूणच सर्व स्वप्नांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून असंख्य शुभेच्छा!

निल कुलकर्णी 
९३२५१२०२८४

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121