काँग्रेसकडून अजुनही विरोधी पक्षनेत्याची निवड नाही!
29-Jul-2023
Total Views | 96
मुंबई : राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील कामकाजाचे अवघे तीन दिवस उरले आहेत. मात्र अजूनही काँग्रेसकडून विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदाच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं नाही. विरोधी पक्षनेता कोणाला करायचं हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडकडे अडकलेला असल्याची माहिती आहे.
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ काँग्रेस पक्षही फूटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेसमधील काही नेते पक्षातून बाहेर पडणार हे निश्चित आहे, असा दावा केला होता. काँग्रेसचे घर फुटणार हे मी वारंवार सांगतोय, असे शिरसाट म्हणाले होते.
अजित पवार महायुतीत गेल्यानंतर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विधानसभेत आता विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक आमदारांचं संख्याबळ आहे. परंतु काँग्रेसने अद्याप कुठल्याही नेत्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिलेली नाही. या पदासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यादृष्टीने अनेकजण सभागृहात आक्रमक होताना दिसत आहेत.