नवी दिल्ली : बंगळुरू शहरामध्ये दहशतवादी कृत्य करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सोहेल, उमर, मुदासिर, जाहिद आणि फैसल या पाच संशयित दहशतवाद्यांना बंगळुरू पोलिसांनी अटक करून त्यांचा कट उधळला आहे. याप्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात यावी, अशी मागणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे.
बंगळुरू पोलिसांनी शहरात 'असामाजिक' कारवाया करण्याचा कट रचल्याप्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. पाच संशयितांवर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (युएपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल, उमर, मुदासिर, जाहिद आणि फैसल असे या पाच संशयितांचे नाव आहे. माहितीच्या आधारे ही अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना यापूर्वी २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती. सुटका होण्यापूर्वी ते एका खून प्रकरणात १८ महिने तुरुंगात होते, २०१९ साली त्यांची सुटका झाली होती.
बंगळुरू केंद्रीय तुरुंगात असताना त्यांना नाझीर नावाच्या व्यक्तीने कट्टरतावादी बनवले होते. लष्कर-ए-तोयबाशी संबंध असलेला नाझीर २००८ च्या बंगळुरू साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात केंद्रीय तुरूंगात आहे. अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींकडून सात पिस्तूल, अनेक जिवंत काडतुसे, एक वॉकीटॉकी आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी दिली आहे.