मुंबई : आपली संस्कृती, आपली श्रद्धा ही सगळ्यांनाच प्रिय असते. आणि याच श्रद्धा, आस्तिक, नास्तिक गोष्टींवर भाष्य करणारा 'ओएमजी २' चित्रपट ११ ऑगस्ट रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून समाज माध्यमावर प्रेक्षकांनी याला पसंती दिली आहे. अभिनेते परेश रावल यांची प्रमुख भुमिका असलेला 'ओएमजी' हा २०१२ रोजी आलेल्या चित्रपटाचा हा दुसरा भाग असून यात परेश रावल यांच्याऐवजी पंकज त्रिपाठी अक्षय कुमारच्या विरुद्ध अभिनय साकारताना दिसणार आहे.
काय आहे टीझरमध्ये?
पंकज त्रिपाठी हा आस्तिक शंकराचा निस्सीम भक्त. त्याच्यावर एक संकट आलेलं दिसते. अशातच एक मुलगा ट्रेनखाली येऊन आत्महत्या करताना दिसतो. कुटूंबावर आलेलं संकट परतवुन लावण्यासाठी पंकज त्रिपाठी शंकराची आराधना करतात. अशातच भगवान शंकर म्हणजेच अक्षय कुमारची एन्ट्री झालेली दिसते. भगवान शंकराच्या रुपात अक्षय कुमार पंकज त्रिपाठी सोबत राहून त्याच्यावरचं संकट कसे दूर करणार याची गोष्ट 'ओएमजी २' मध्ये दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केले आहे.
दरम्यान, अक्षय कुमारला गेली काही वर्ष चित्रपटांच्या बाबतीत यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. ओएमजी चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. त्याचप्रमाणे ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा चित्रपटाचा दुसरा भाग अक्षयच्या अपयशाचे रुपांतर यशात करणार का हे येणारा काळच ठरवेल.