भारतात मंदिरे उभी करून काहीही साध्य होणार नाही, त्याऐवजी तरुणांच्या हाताला रोजगार द्या, अशी भूमिका काँग्रेसी सॅम पित्रोदा यांनी घेतली. हे तेच गंडलेले पित्रोदा आहेत, ज्यांनी राहुल गांधींच्या फसलेल्या अमेरिका दौर्याचे नियोजन केले होते. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौर्याचे जगभरात कौतुक होत असल्यानेच, पित्रोदा यांच्या मनातील खदखद राष्ट्रद्रोही विचार व्यक्त करून बाहेर पडली असावी.
भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या आदराने घेतले जात असून महासत्ता म्हणून भारताची ओळख प्रस्थापित होत आहे. ‘प्रतिकूल परिस्थितीतही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था’ हा बिरूद मिरवणारी आपली भारतीय अर्थव्यवस्था. त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या राजकीय दौर्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या निमंत्रणावरून ते दि. २० जून रोजी अमेरिकेत पोहोचले. अमेरिकेत सर्वत्र ‘मोदी-मोदी’ असा जयघोष सुरू आहे. भारतीयांना अभिमान वाटेल, असा हा क्षण. त्याचवेळी काँग्रेसी नेते सॅम पित्रोदा यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना आपल्या अकलेचे तारे तोडले. ‘भारताबरोबर करार करायचा असल्याने, अमेरिका मोदी-मोदी करत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांच्या अमेरिका दौर्यावर टीका केली.
त्यांच्या या काँग्रेसी, कोत्या, अभद्र वृत्तीचा निषेध करावा तितका थोडाच. मुळात पित्रोदा यांचे कर्तृत्व ते असे काय! काँग्रेसी कार्यकाळात पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून त्यांची वर्णी लागली होती. डॉ. मनमोहन सिंग नामधारी पंतप्रधान होते, त्यावेळी त्यांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. ‘गांधी कुटुंबीयांचे एकनिष्ठ’ ही त्यांची खरी ओळख. अशा या पित्रोदांनी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक अतर्क्य दावे केलेत, मंदिरांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. कोरोनानंतर संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था एकेक करून संकटात सापडल्या. भारतही कडक निर्बंधांतून गेल्या वर्षी बाहेर आला. सणवार साजरे होऊ लागले. परिणामी, देशातील अर्थव्यवस्था वाढीचे विक्रम नोंद करू लागली. उत्तर प्रदेशातील अयोध्या, काशी यांच्या विकासासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्नशील आहे. वाराणसी येथे श्री विश्वनाथ मंदिराच्या सुशोभीकरणाबरोबर तेथे प्रशस्त कॉरिडोर उभारण्यात आला.
म्हणूनच भाविकांनी सर्वाधिक गर्दी केली ती वाराणसी येथे. कोट्यवधी भाविकांनी उत्तर प्रदेशला भेट दिली. अयोध्या-प्रयागराज-वाराणसी हा पर्यटकांसाठीचा आवडता त्रिकोण ठरला. एका आकडेवारीनुसार वाराणसी येथे ७.१६ कोटी, मथुरा येथे ६.५२ कोटी, प्रयागराज येथे २.६ कोटी, तर अयोध्येला २.३९ कोटी भाविकांनी २०२२ मध्ये भेट दिली. म्हणूनच ही तीर्थक्षेत्रे नव्या भारताची अर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जाऊ लागली. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास गेल्यानंतर अनेक पटीने ही संख्या वाढणार आहे. असे असतानाही पित्रोदा महोदयांना मंदिरे का बांधताय? हा प्रश्न सतावतो. ते म्हणतात, ‘रोजगार निर्माण करा, मंदिरे नकोत.’ प्रत्यक्षात मंदिरांचे बांधकामही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे असते. हजारो कामगार या मंदिराच्या निर्माणासाठी अहोरात्र झटतात. मात्र, असा तात्पुरता रोजगार नको, तर तो कायमस्वरुपी रोजगार हवा, असा पित्रोदा यांचा आग्रह. पण, याच मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर, संपूर्ण शहरालाच कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध होणारआहे, हे ते समजून घेत नाहीत. वाराणसी येथे त्याची अनुभूती येते. गेल्या वर्षी गोव्याऐवजी जास्त पर्यटकांची नोंद उत्तर प्रदेशात झाली, या वास्तवाकडे पित्रोदा सपशेल दुर्लक्ष करतात.
त्यांचा असा आरोप आहे की, भारतीय प्रसार माध्यमे राहुल गांधी यांना प्रसिद्धीच देत नाहीत. तथापि, सर्वात जास्त प्रसिद्धी राहुल यांना मिळते, हे वास्तव ते सांगत नाहीत. राहुल हे लंडनला जावोत किंवा अमेरिकेला. तिथे ते काय बोलले, याची इत्थंभूत बातमी भारतात प्रसिद्ध होते. भारतीय संसदेत विरोधकांना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, असे धादांत खोटे ते लंडनमध्ये करतात येथील प्रसारमाध्यमे तेही वृत्त देतात. राहुल आणि त्यांचे गुलाम असे धडधडीत खोटे रोज बोलत असतात. अनिवासी भारतीय मोदी यांच्यावर जास्त प्रेम करतात, अशी तक्रारही पित्रोदा यांनी केली आहे. अमेरिकेला भारताशी केवळ व्यापार करण्यात स्वारस्य असल्याने मोदी यांना सन्मान दिला जात आहे, असा आरोप करणार्या पित्रोदा यांचे खरे दुखणे काय आहे, हे समजून येणारे. राहुल यांनी नुकतीच अमेरिकावारी केली. तिला अपेक्षेएवढी प्रसिद्धी मिळाली नाही, हीच खरी पोटदुखी. या दौर्याचे नियोजन पित्रोदा यांनीच केले होते. सोनियांकडून कानउघाडणी झाल्याचे दुखणे, हे असे बाहेर पडले असावे.
दुसरीकडे अमेरिकी संसदेला दुसर्यांदा संबोधित करण्याचा बहुमान मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. विमानतळापासून सर्वत्र अनिवासी भारतीय मोठ्या संख्येने मोदी यांना पाहण्यासाठी वय, प्रतिष्ठा सारे काही बाजूला ठेवत गर्दी करत आहे. त्यांच्या गाड्यांचा ताफा जाताना दिसला की, ‘मोदी-मोदी’चा गजर करत आहे. हे सहन न झाल्यानेच आता हिंदू बांधव आणि त्यांची मंदिरे पित्रोदा यांना डोळ्यात खुपू लागली असावीत. मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रमांतून संबोधित न करता, माध्यमांना सामोरे जावे, असा अनाहूत सल्ला म्हणूनच ते देतात. राहुल यांनी आपल्या दौर्यात भारताची प्रतिमा मलीन करण्याचे देशद्रोही कृत्य केले. भारताबद्दल अनेक गैरसमज त्यांनी करून दिले आहेत. म्हणूनच काही अमेरिकी माध्यमांनी मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे पाप पित्रोदा यांचेच.
अमेरिकेने हुकूमशाही नेत्यांना पाठिंबा दिला आहे, असे अतार्किक वक्तव्यही पित्रोदा करतात. १९८४चा शीखविरोधी नरसंहारावेळी ‘जो हुआ सो हुआ,’ असे विधान करणारे सॅम पित्रोदा भारतीय माध्यमांमध्ये त्या नरसंहाराचे चुकीचे चित्रण करण्यात आले होते, असा आरोप करतात. त्याचवेळी १९८४ हा भूतकाळ झाला आहे, आपण पुढे जायला हवे, असा आग्रह धरतात. याच न्यायाने २००२ हाही भूतकाळ आहे. पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च न्यायालयानेही ‘क्लीनचिट’ दिलेली असताना, न घडलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांना आजही जबाबदार धरण्याची काँग्रेसी मनोवृत्ती नेमके काय सांगू इच्छिते? महात्मा गांधी यांच्या अहिंसेची भाषा पित्रोदा यांच्या तोंडी म्हणूनच शोभत नाही. पित्रोदा ज्यांचे सल्लागार होते, त्या डॉ. मनमोहन सिंग यांनी २००५ साली अणुकराराला, शस्त्रखरेदीला प्राधान्य का दिले होते? सल्लागार म्हणून पित्रोदा यांनी त्यांना संरक्षणासाठी खर्च करू नये, असे ठणकावून सांगितले होते का? अर्थातच, याचे उत्तर नाही, असेच असेल.
मोदी-बायडन भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. एक महासत्तेचा नेता, तर दुसरा महासत्तेकडे वाटचाल करणार्या देशाचा, म्हणूनच हे दोन नेते काय भूमिका घेतात,याची सर्वसामान्यांसह जागतिक नेत्यांना उत्सुकता असताना, पित्रोदांसारखे काँग्रेसी गुलाम भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा हे तर देशद्रोही हीच स्वाभाविक प्रतिक्रिया उमटते. इतकेच!