असेच काहीसे भक्तीने ओतप्रोत भरलेले क्षण घेऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्वागत केले. दुपारी दोनच्या सुमारास ही पालखी विश्रांतवाडी येथे पुणे शहराच्या हद्दीत दाखल झाली. तर, त्या पाठोपाठ संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले. लाखो भाविक भक्तांसह वारकरी संप्रदायाचा जनसागर पुण्यनगरीत उसळला आहे. विठोबा रखुमाई आणि ग्यानबा तुकारामच्या जयघोषात ताल धरणारे वारकरी पाहून अवघी पुण्यनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीचा अनुभव संपुर्ण शहर आज घेत आहे. या दोन्ही पालख्यांचा आजचा आणि उद्याचा मुक्काम पुणे शहरातील अनुक्रमे श्री पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंग्या विठोबा मंदिरात असणार आहे.