जंगलसंवर्धनातून समाजसंवर्धन!

    08-May-2023   
Total Views |
Dinesh Meghe

जंगलसंवर्धनाचा ध्यास घेतलेले भिवंडी, देवराई येथील दिनेश मेघे. कोकणा समाजातील दिनेश हे वनहक्क, ‘पेसा’ कायद्याचे विशेष तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...

भिवंडीतील देवराई गावच्या कोकणा समाजाचे गणपत मेघे आणि त्यांची पत्नी भिमाबाई. दोघेही दिवसभर मजुरी करत. कधी शेतमजुरी, तर कधी विटभट्टीवर काम. पण, हातात कधी मुलाबाळांना पोटभरही खाता येईल इतके पैसे कमावता यायचे नाही. मेघे दाम्पत्याला तीन अपत्ये. त्यापैकी एक दिनेश. गणपत मुलांना सांगत, ”शिका पोरांनो, शिकलात तर दोन पैसे कमवाल आणि पोटभर खाऊ, काही तरी राखू.” दिनेश शाळेत जाऊ लागले. चौथी पुढील शिक्षणासाठी त्यांना चार किलोमीटर लांब दूरच्या शाळेत जावे लागले. या शाळेत विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान करावा हा नियमच होता. पण, गणवेश घ्यायला पैसे कुठून आणणार? दिनेश यांच्याकडे चप्पलसुद्धा नव्हती. दिनेश तसेच घरच्या फाटक्या शर्टवर अनवाणी पायाने शाळेत येऊ लागले. शाळेची शिस्त मोडली म्हणून एकेदिवशी शिक्षकांनी त्यांना भर वर्गात शिक्षा केली.

दुसर्‍या दिवसापासून दिनेश मिरच्या तोडायच्या कामाला मजूर म्हणून जाऊ लागले. सलग आठ दिवस काम केले आणि आलेल्या पैशांतून त्यांनी जुना शाळेचा गणवेश विकत घेतला. तेव्हा दिनेश नववीला होते. त्यांना जंगलाच्या निसर्गसंपन्नतेवर धडा होता. तो धडा वाचून दिनेश यांना लहानपणी बाबांकडून ऐकलेली बरमा देवाची गोष्ट आठवली. ”बरम्या देवानंं फुंकर घातली आणि सगळी जीवसृष्टी तयार झाली. बरम्या देवाने मग माणसाला या सृष्टीचे या जंगलाचे रक्षण करण्याचे काम दिले. पण, त्याने जंगल तोडायला सुरुवात केली.जेव्हा सगळे जंगल संपेल, तेव्हा माणूस या जगातून नष्ट होईल,’ अशी ती गोष्ट. मात्र, दिनेश पाहत असत की, काही लोक दररोज जंगलात निर्दयपणे झाडांची कत्तल आणि प्राण्यांची शिकार करत. एक दिवस दिनेश आणि त्यांच्या मित्राने या लोकांना अडवले. त्यावेळी जंगल काय तुमच्या बापाचे आहे, म्हणत त्या लोकांनी किशोरवयीन दिनेशला मारहाण केली. पण, दिनेश सातत्याने वृक्ष तोडणार्‍यांविरोधात उभे राहिले. त्यामुळे अभ्यासाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले.

परिणामी, नववीला नापास झाले. मग शाळा सोडून ते विटभट्टीवर काम करू लागले. पण, तरीही त्यांचे सगळे लक्ष जंगलावरच असे. ढोलक्याची ढुबी, भुताळ ढुबी, लांब ढुबी, करंदीचा डवरा, दाता हा जंगलाचा परिसर आता वृक्षविहिन झाला होता.याच काळात गावातील लोकांच्या वनजमिनीच्या कागदपत्रांची फाईल बनवण्याचे काम दिनेश यांना मिळाले. गरवारे नावाच्या अधिकार्‍यांनी त्यांना वनहक्क आणि जंगलसंदर्भात माहिती शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी दिली. गावातल्या लोकांना ते त्याबद्दल माहिती देऊ लागले. गावात त्यांना मानसन्मान मिळू लागला. गावाचे उपसरपंच आणि भाजप नेते प्रवीण पाटील यांनी त्यांना ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून नेमणूक केली. काम करता करताच दिनेश वनहक्कासंदर्भात गावकर्‍यांसाठी काम करू लागले. २०१० साली त्यांनी गावातल्या कुटुंबांना वनहक्क मिळावेत, तसेच गावाला गावठाण आणि सामूहिक वनहक्काचा ताबा मिळावा, यासाठी काम सुरू केले. या सगळ्यांचा पाठपुरावा केला.

शेवटी २०१६ साली २९ कुटुंबांना वनहक्क अंतर्गत जमिनी, अडीच एकर गावठाण तसेच देवराई गावच्या वनवासी कुटुंबाना २२२ एकर जमिनीवरील जंगलाचा सामूहिक वनहक्क मिळाला. याच काळात देवराईमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होती आणि प्रवीण पाटील यांच्या पाठिंब्याने दिनेश सरपंच झाले. सरपंच असताना त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना गावात राबवल्या. गरजूंसाठी ११० शौचालये १११ घरकुल बांधले. वनवासी कुटुंबीयांना सामूहिक वनहक्क मिळावा म्हणून गावात थोडी कुरबुर सुरू झाली. मात्र, दिनेश यांनी सामोपचाराने ती मिटवली. याच काळात दिनेश यांचे दिव्या यांच्याशी विवाह झाला. दिव्याचे बंधू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. विटभट्टीवर काम करणार्‍या कुटुंबाच्या मुलांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागे. आई-वडील मजुरी करायला गावाबाहेर गेले, तरी मूल गावात राहून शिकतील, अशी व्यवस्था करणे गरजेचे होते. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक जग्गे काकांच्या संपर्कातील लोकांच्या मदतीने या मुलांसाठी दिनेश यांनी देवराईमध्ये वसतिगृह बांधले गेले. गावात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हैदोस घातला होताच.

दोन पाड्यातील २३ कुटुंब थातूरमातूर मदतीच्या आमिषाने धर्मांतरित झाले होते. पण, दिनेश तसेच बाबा जोशी, आप्पा जोशी, दीपक पाटील वगैरे स्वयंसेवकांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने ती २३ कुटुंंब पुन्हा स्वधर्मात आले. गावपाड्याचे परिसरातले धर्मांतर ९९ टक्के थांबले. या सगळ्या काळात सामूहिक वनहक्क मिळालेल्या जागेचे दिनेश यांनी सहकार्‍यांच्या मदतीने उत्तम संवर्धन केले. ओसाड पडलेल्या जंगल भागात आता पुन्हा दाट वृक्षराई निर्माण झाली आणि सांबर, निलगाय, हरीण, ससा, रानडुक्कर, बिबट्या, गंध्या, बाऊल, मुंगूस, मोर असे पशुपक्षी पुन्हा या भागात निवासाला आले. हे यश दिनेश यांच्या जंगलप्रेमाचे आहे.असो. दिनेश आता शेती करतात आणि ‘यशदा’ या प्रशिक्षण संस्थेमध्ये वनहक्क कायद्याचे विशेष तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. ‘देवराई’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते म्हणतात, ”वनवासी समाजाने रितीरिवाज जपावे, यासाठी ‘पेसा’कायद्यात आर्थिक तरतूद आहे. वनवासी समाजाने जर त्यांचे रितीरिवाज, परंपरा जपल्या, तरच त्याचे देव-धर्म-देशाशी नाते घट्ट जुळणार आहे. त्यामुळे मी ‘पेसा’ कायद्याची जागृती खेड्यापाड्यात करणार आहे.” दिनेश मेघे यांच्या जंगलप्रेमातून समाजसंवर्धन होत आहे, हे नक्कीच!


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.