रेल्वे उपकरणांच्या निर्यातीत भारताची झेप केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा

Total Views |

वडोदरा, केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवार, दि.२७ रोजी गुजरातमधील वडोदरा येथील सावली येथे असलेल्या अल्स्टॉम या रेल्वेनिर्मिती कारखान्याला भेट दिली. यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत वडोदरा खासदार डॉ. हेमांग जोशी, सावलीचे आमदार केतनभाई इनामदार, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, वडोदरा आणि अहमदाबादचे डीआरएम आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी होते. यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या अल्स्टॉमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेल्वे मंत्र्यांना युनिटमध्ये सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आधुनिक डिझाइन आणि बांधकाम गुणवत्तेचे कौतुक केले.

अल्स्टॉम टीमने मंत्री अश्विनी वैष्णव यांना मटेरियल वापर आणि पुरवठादार एकत्रीकरणासह केल्या जाणाऱ्या देखभाल उपक्रमांबद्दल माहिती दिली. सेन्सर्स आणि एआय वापरून प्रतिबंधात्मक देखभालीचाही या चर्चेत समावेश होता. प्रत्येक ऑर्डरसह उपकरणांचे डिझाइन सतत अपग्रेड करण्याचा कंपनीच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाची माहिती यावेळी रेल्वेमंत्र्यांना देण्यात आली. 'डिझाइन इन इंडिया' रेल्वे उपकरणांसाठी मंत्र्यांनी अल्स्टॉमचे अभिनंदन केले. फॅक्टरीमध्ये उत्पादित केलेले कोच, लोकोमोटिव्ह, बोगी, प्रोपल्शन सिस्टीम इत्यादी जगभरात निर्यात केले जात आहेत. 'डिझाइन, डेव्हलप, डिलिव्हर फ्रॉम इंडिया टू द वर्ल्ड' उपक्रमाचा भाग म्हणून ही रेल्वे उपकरणे ऑस्ट्रेलिया, यूके, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, मेक्सिको आणि इतर देशांमध्ये पोहोचत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'मेक, इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या दृष्टिकोनाचा परिणाम भारतातील रेल्वे उत्पादनावरही दिसून येत आहे. सावली कारखान्याने वडोदरा प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे, स्थानिक तरुणांसाठी रोजगार निर्माण केले आहेत आणि या प्रदेशाचा सर्वांगीण विकास झाला आहे. भारत आता जगातील अनेक विकसित देशांमध्ये रेल्वे घटक, कोच आणि लोको निर्यात करत आहे, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या यशाबद्दल बोलताना सांगितले.

भारतात जगासाठी प्रतिभा विकास

अल्स्टॉम भारतात करत असलेल्या प्रतिभा विकास उपक्रमांची माहितीही यावेळी वैष्णव यांना देण्यात आली. असे सांगण्यात आले की, अल्स्टॉमकडे भारतात रोलिंग स्टॉक आणि सिग्नलिंग सिस्टीमसह सुमारे ७,००० अभियंते आहेत. यापैकी सुमारे ३०० अभियंते आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये कार्यरत आहेत. केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी अल्स्टॉमच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये रस व्यक्त केला आणि गती शक्ती विश्वविद्यालायशी सहकार्य करण्याची सूचना केली. त्यांनी अल्स्टॉम, सावली आणि पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागातील विद्यमान प्रशिक्षण भागीदारीची प्रशंसा केली. अल्स्टॉम टीमला भारतीय रेल्वेसाठी मोठ्या प्रमाणात कॅम्पसबाहेर आणि साइटवर प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याचे आवाहन केले. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या टीमना या कार्यशाळांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.