मणिपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक
30-May-2023
Total Views | 92
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी विविध उच्चस्तरीय बैठकांच्या माध्यमातून विविध घटकांशी संवाद साधला आहे. याद्वारे मणिपूरमधील संघर्षास संपविण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. त्यासाठी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे १ जूनपर्यंत मणिपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये मंगळवारी त्यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय बैठकीस संबोधित केले. या बैठकीमध्ये गृहमंत्र्यांनी सर्व पक्षांशी आणि गटांशी सविस्तर चर्चा केली आणि राज्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या बैठकीपूर्वी शाह यांनी राज्यातील सिव्हील सोसायटीतील महत्वाचे लोक आणि महिलांच्या प्रतिनिधींसोबतही चर्चा केली.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी यापूर्वी सोमवारी मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांचीही भेट घेतली होती. शाह यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह आणि राज्यातील मंत्री, वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांची राज्यातील स्थिती पूर्ववत करण्यासाठी बैठक घेतली होती. केंद्र आणि मणिपूर राज्य सरकारने मणिपूरमधील जातीय संघर्षादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णयही घेतला आहे. दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरीही दिली जाणार आहे. नुकसान भरपाईची रक्कम केंद्र आणि राज्य समान प्रमाणात करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.