धर्मांतरणाचा म्होरक्या छांगुरचे पाकिस्तान कनेक्शन उघड

    19-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली :  जबरदस्ती धर्मांतरण प्रकरणात अटक झालेल्या मास्टरमाइंड जलालुद्दीन उर्फ छांगुरचा थेट पाकिस्तानशी संबंध असल्याचे पुरावे उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाले आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक राजीव कृष्ण यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

छांगुरच्या टोळीचा संपर्क पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांशी असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा राज्यांमधून दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे टोळके विशेषत: अल्पवयीन मुलींना जाळ्यात अडकवून त्यांचे जबरदस्ती धर्मांतरण करीत असल्याचे समोर आले आहे.

पोलिस महासंचालक म्हणाले की, या टोळीला कॅनडा, लंडन आणि दुबईहून आर्थिक मदत मिळत असल्याचेही पुरावे हाती आले आहेत. मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती जहांगीर आलम कासमी यांच्या अटकेनंतर छांगुर उर्फ जमालुद्दीनच्या अवैध धर्मांतरण रॅकेटचा भंडाफोड झाला. तपास अजून सुरूच असून काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. या टोळीला आंतरराष्ट्रीय जिहादी निधी मिळाला होता आणि देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल, अशा हेतूने कट्टरपंथी विचारधारा पसरवली जात होती.

आरोपी विशेषत: तरुण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून (लव्ह जिहाद) किंवा इतर मार्गांनी धर्मांतरणासाठी प्रवृत्त करीत होते. हे तंत्र आयएसआयएससारख्या दहशतवादी संघटनांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंतच्या तपासात या समूहाचे पीएफआय, एसडीपीआय आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, छांगुर स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (रा. स्व. संघ) संबंधित एका संघटनेचा वरिष्ठ पदाधिकारी म्हणून ओळख देत असे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटो असलेल्या बनावट लेटरहेडचा वापर करून तो सरकारी अधिकारी व राजकीय नेत्यांमध्ये स्वतःची ओळख तयार करत असे. छांगुरने स्वतःला तथाकथित भारत प्रतिकार्थ सेवा संघ नावाच्या संघटनेचा अवध क्षेत्र महासचिव म्हणून सांगितले होते. या संघटनेचे संचालन ईदुल इस्लाम नावाचा त्याचा साथीदार करीत होता. संघटनेचे नाव जाणीवपूर्वक रा. स्व. संघाशी मिळतेजुळते ठेवण्यात आले होते. संघटनेची विश्वसनीयता वाढवण्यासाठी नागपूरमध्ये फसवे केंद्रही उघडण्यात आले होते. छांगुर आणि ईदुल इस्लाम अनेक ठिकाणी रा. स्व. संघाच्या वरिष्ठ नेत्यांची नावे घेत असल्याचेही पुढे दिसून आले आहे.