नाशिकमधील वाढत्या रहदारीवर देखरेख ठेवून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस यंत्रणाही नेहमीच नवे उपक्रम हाती घेते. आता शहरातील सिग्नलवर पुढील महिन्यापासून ‘सीसीटीव्ही वॉच’चा घेतलेला निर्णय स्तुत्यच..! सिग्नलवरील वाहतूक नियमांचे भंग करणार्या वाहनचालकांना त्वरित ई-चलन देण्यात येणार आहे. यामुळे पोलीस विरहित चौक, सिग्नलवर तिसर्या डोळ्यांची नजर आणि त्यानंतर नियम तोडणारे वाहनचालक कॅमेर्यात कैद होऊन त्यांच्यावर कारवाई होणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्याची अपेक्षा आहे. नियमभंग करणार्यांना अवघ्या काही मिनिटांत केलेल्या चुकीचा फोटो व सोबत ई-चलनाचा संदेश रजिस्टर्ड मोबाईलवर प्राप्त होईल. १५ जूनपासून ही यंत्रणा नाशिकमध्ये सर्वत्र कार्यान्वित होणार आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्वच सिग्नलवर ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागण्यासोबतच प्रसंगी वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी तसेच ‘स्ट्रीट क्राईम’लाही आळा बसण्यास मदत मिळणार आहे. येत्या काळात शहरातील सिग्नलची संख्या ६८ इतकी होणार असून, प्रत्येक नवीन सिग्नलवर प्रारंभीपासूनच ‘सीसीटीव्ही’ यंत्रणाही बसवण्यात येत आहे. सद्य:स्थितीत शहरात ५२ सिग्नल्सपैकी ४५ सुरू असून येत्या काही महिन्यात २३ नवे सिग्नल शहरातील मुख्य चौकात कार्यान्वित होतील. नव्या यंत्रणेत ‘ऑप्टिकल फायबर’ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ‘एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ वायफाय, ‘स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर’, ‘हेल्प डेस्क’ आदी या सुविधांनी सुसज्ज नियंत्रण कक्षामुळे शहरातील वाहतूक यंत्रणा भक्कम, जलद होणार आहे. ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण बघण्यासाठी सहा बाय चार फुटांची ‘एलईडी स्क्रीन’ बसण्यात आली. १६ डबल पॅनलचे ‘मॉनीटर’, गुगल मॅपद्वारे सिग्नलवर वाहतूककोंडीचे ’अपडेटस्’ देणार आहेत. विशेष म्हणजे सिग्नल नियमांचा भंग करणार्यांखेरीज झेंब्रा कॉसिंग, युटर्न घेणार्यांही अॅटोमॅटिक ई-चलन पाठवले जाणार आहे. ‘तिसर्या डोळ्यां’ची नजर असल्याने नियमभंग केल्यास दंडाची कारवाई अटळच’ हे बघता नाशिककर वाहतूक नियमांबाबत आतातरी अधिक सुजाण, प्रगल्भ होतील ही अपेक्षा..!
‘ति’च्या हाती रिक्षाचे स्टेअरिंग
नाशिकमध्ये ’पिंक रिक्षा’च्या माध्यमातून महिला चालक असलेल्या रिक्षा धावू लागल्या आहेत. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ नाशिक’च्या पुढाकाराने शहरातील गरजू महिलांना नुकत्याच ‘पिंक रिक्षा’ वितरित करण्यात आल्या. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि औद्योगिक नगरी नाशिकमध्ये आता महिलांसाठी पिंक रिक्षा धावू लागल्याने नवे पर्व सुरू झाले. ‘रोटरी’चे अध्यक्ष प्रफुल बरडीया आणि सचिव ओमप्रकाश रावत यांच्या संकल्पनेतून उपक्रम साकारला. ‘रोटरी’तर्फे आणखी सहा ते सात पिंक रिक्षा गरजू महिलांना दिल्या जाणार आहेत. हे स्तुत्य आणि विधायक पाऊल म्हटले पाहिजे. एकीकडे रोटरीचा पिंकरिक्षा उपक्रम सुरू असताना कल्याणी बहुउद्देशीय संस्थेने शहरातील आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘रिक्षा मालक चालक अबोली रिक्षा प्रकल्प’ सुरू केला. त्याअतंर्गत महिलांना मोफत ऑटोरिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण, बॅच बिल्ला, व राष्ट्रीयकृत बँकेमार्फेत मुद्रा लोन उपलब्ध करून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे शहरातील १०० महिलांना ‘कल्याणी’ संस्थेतर्फे रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याने महिलांही स्वत:च्या पायावर उभ्या राहून उन्नती करण्यास सक्षम होणार आहे. एकीकडे महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे, तर प्रवासी महिलांना ‘पिंक रिक्षा’ किंवा महिला रिक्षा चालकांकडून ऑटोरिक्षा सेवा मिळण्यासाठी पर्याय उपलब्ध झाल्याने महिलावर्गही आश्वस्त व आनंदी दिसून येत आहे. देशासह राज्यातील अनेक महानगरात महिलांकडून ऑटोरिक्षा चालवल्या जातात. मात्र, नाशिकमध्ये या व्यवसायात महिलांचे प्रमाण शून्य होते. आता ‘पिंक रिक्षा’ उपक्रमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे महिलांना ऑटो रिक्षा उपलब्ध करुन देण्यासाठी कार्य करत असलेला ‘रोटरी क्लब’ आणि मोफत रिक्षा प्रशिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्या ‘कल्याणी बहुउद्देशीय संस्थे’चे हे पाऊल अत्यंत स्तुत्यच..! आता नाशिककरांनी ‘पिंक रिक्षा’चे स्वागत करून महिला ऑटो रिक्षा चालकांना शक्य ते सहकार्य करण्याचे ‘स्त्री दाक्षिण्य’ नेहमीसाठीच दाखवायलचा हवे.!