“केवळ महार, चांभार किंवा अस्पृश्य समाजच नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजच परकीय जोखडामुळे पतित झाला आहे आणि या हिंदूराष्ट्राला पावन करणारं हे मंदिर आहे,”असे प्रतिपादन तात्यांनी ‘पतितपावन’ या नावाचं मर्म उलगडताना केलं होतं. तेव्हा, या पतितपावन मंदिर उभारणीमागची स्वा. सावरकरांची प्रेरणा आणि चिंतन यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
"पतितपावन म्हणजे पतितांना पावन करणारं! अशा तर्हेच्या मंदिराची कल्पना कैक दिवस माझ्या मनात घोळत होती. हिंदूंची चार धाम म्हटली जाणारी सर्व देवळं हिंदूंसाठी खुली व्हायला हवी. जन्मामुळे प्राप्त झालेल्या जातीचं कारण पुढे करून कुठल्याही हिंदूला मंदिर प्रवेश नाकारला जाता कामा नये. पण, या तत्त्वाचा स्वीकार समाज करू लागेपर्यंत निदान एक तरी असं मंदिर असावं ज्याची दारं सर्व हिंदूंना सदैव खुली असतील, असं मला वाटलं.”१९२९ सालातील १० मार्च या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीच्या वरच्या आळीत लक्ष्मी नारायणाच्या नियोजित पतितपावन मंदिराच्या स्थानी भाषण करताना बोलत होते.
सर्व रत्नागिरीत त्या दिवशी सण-उत्सवाचं वातावरण होतं. भगव्या रंगाचे कृपाण आणि कुंडलिनीची प्रतिमा असणारे ध्वज नगरात फडकत होते. सर्कसमधले हत्ती-घोडे आणून मिरवणूक काढण्यात आली होती. लाठी आणि लेझीमची पथकं मिरवणुकीचं नेतृत्व करीत होती. मिरवणुकीत हजारोच्या संख्येनं लोक सामील झाले होते. त्यात काही स्पृश्य होते, ज्यांचा सात-आठ वर्षांपूर्वी अस्पृश्यांनी त्यांच्या वस्तीतून बाहेर पडून नगरातल्या सामाजिक कार्यक्रमांत सामील होण्यास असणारा विरोध आता मावळला होता. काही अस्पृश्य होते, ज्यांच्या मनातली शतकांपासून अविवेकीपणे अनुसरल्या जाणार्या पोथीजन्य रूढी-परंपरांच्या पगड्यामुळे समाजातल्या तथाकथित उच्चवर्णीयांबरोबर मिळून-मिसळून वावरताना आधी निर्माण होत असलेली भीड आता चेपली होती. हिंदू धर्मातल्या सगळ्या जातींची सरमिसळ झालेला तो उत्साही जमाव हे जवळजवळ आठ-नऊ दशकांपूर्वीच्या त्या काळात अपूर्व असंच दृश्य होतं. कसं शक्य झालं होतं ते साकार करणं?हे शक्य झालं होतं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या समाजक्रांतिकारकाच्या रत्नागिरीतल्या आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनी!
अंदमानातील ११ वर्षांच्या अनन्वित हालअपेष्टामय बंदिवासानंतर रत्नागिरीची भौगोलिक (जिथून पलायन करता येणं सहज शक्य होऊ शकणार नाही) परिस्थिती लक्षात घेऊन १९२१ मध्ये तात्यांना रत्नागिरीच्या कारागृहात हलवलं. नंतर दि. ६ जानेवारी, १९२४ पासून ब्रिटिश सरकारने तात्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले. रत्नागिरी सोडून कुठेही जायला आणि राजकीय घडामोडींत भाग घ्यायला तेव्हा त्यांच्यावर बंदी होती. राजकीय क्रांती आणि सामाजिक क्रांती ही राष्ट्रशकटाची दोन चाकं आहेत. राजकारण जर तलवार असेल, तर समाजसुधारणा ही ढाल असते. सामाजिक क्रांती राजकीय क्रांतीला नेहमी पूरक असते आणि राजकीय क्रांती टिकाऊ व्हायला हवी असेल, तर सामाजिक क्रांतीचा आधारस्तंभ असलेला समाज एकजिनसी बनला पाहिजे, नाहीतर राजकीय क्रांतीही विफल होऊन पारतंत्र्याच्या बेड्या पुन्हा पायात पडतात, हे ज्ञात असलेल्या तात्यांनी आपल्या १३ वर्षांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात सामाजिक क्रांतीच्या कामी स्वतःला झोकून दिलं.
हिंदू समाज तेव्हा रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, व्यवसायबंदी आणि वेदोक्तबंदी या सप्तशृंखलांमध्ये जखडला गेला होता. अस्पृश्यांच्या स्पर्शाचाच काय, पण सावलीचाही विटाळ मानणारे स्पृश्य दुर्मीळ नव्हते. हिंदू समाजातील जातिभेदामुळे हिंदू असंघटित होते. रत्नागिरीत आल्यावर काही दिवसांतच तिथल्या कारागृहात तात्यांनी केलेल्या व्याख्येनुसार, ’सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या विशाल देशाला जे पितृभूमी (पूर्वजांची भूमी) आणि पुण्यभूमी मानतात ते हिंदू’ हे हिंदूसभेने स्वीकृत केलं होतं.म्हणूनच राजकीय सुधारणेला आवश्यक एकजिनसीपणा साधण्यासाठी अस्पृश्यता आणि जातिभेद नष्ट करून हिंदू समाजाच्या एकीकरणाचा पुरस्कार करणं याला तात्यांनी अग्रक्रम दिला. जातिव्यवस्था हा हिंदू समाजाचा शाप आहे, हे त्यांना बालपणापासून डाचत असलेलं शल्य होतं. अगदी भगूरला असल्यापासूनच विनायक त्याच्या परीनं ही बंधनं तोडण्याचा प्रयत्न करीत असे. स्वतः एक उच्चवर्णीय जहागीरदार असूनही त्याचे बालपणीचे सवंगडी गरीब आणि तथाकथित मागास समाजातले होते. त्यांच्यासमवेत तो एकत्र भोजन करीत असे. हिंदूंवर हल्ला झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून वाचल्यावर ’हिंदूं संघटितपणे प्रतिकार का करत नाहीत?’ असा प्रश्न त्याला पडे. नाशिकला त्याने स्थापन केलेल्या ’मित्रमेळा’ या संघटनेतही समाजातल्या सर्व जातींमधील सदस्य होते.
शालेय वयापासूनच जातिभेद निर्दालनासाठी प्रकटपणे वागणार्या तात्यांनी समाजाला परोपरीने हाच उपदेश करण्याचा आपला वसा महाविद्यालयात, विलायतेत आणि अगदी अंदमानातही सुरूच ठेवला. मग ते तो रत्नागिरीत सुरू न ठेवते तरच नवल! बालपणी मित्रमंडळींसमवेत देऊळ बांधून मूर्तीची पूजा करणं, मूर्तीची मिरवणूक काढणं हा खेळला जाणारा लुटुपुटुचा खेळ वास्तवात साकार करायला तात्या सिद्ध झाले होते. मात्र, संकुचित, प्रतिगामी विचारसरणीच्या समाजमनाला हे विचार पटवून देण्यासाठीचा मार्ग खडतर आहे, याचीही त्यांना पूर्ण जाणीव होती. हिंदू समाजाचं ऐक्य हे ध्येय ठरवलेल्या तात्यांनी या खडतर मार्गावरून निश्चयाने आणि टप्प्याटप्प्याने वाटचाल सुरू केली. त्यांनी संपूर्ण रत्नागिरी परिसर पालथा घातला. प्रथम सार्वजनिक ठिकाणी स्पृश्य आणि अस्पृश्य यांची सरमिसळ होण्याची सवय समाजाच्या अंगी बाणवणं आवश्यक आहे, हे त्यांनी ताडलं. जेव्हा जेव्हा सरमिसळीची संधी चालून आली, तेव्हा तेव्हा तिचा फायदा त्यांनी उठवला. रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरातील कुठल्याही यजमानाला तात्यांनी आपल्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेला यावं, असं मनःपूर्वक वाटत असे. तेव्हा त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार तात्या एका अटीवर करीत असत आणि ती म्हणजे पूर्वास्पृश्यांनाही पूजेचं निमंत्रण देणं, अशा तर्हेचे अनेक दाखले सावरकरांचं चरित्र वाचताना मिळतात. स्पृश्य-अस्पृश्यांना एकमेकांत मिसळायची सवय लागावी म्हणून मग तात्यांनी अस्पृश्य वस्तीत आणि मग स्पृश्य वस्तीत भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले.
भाषणांच्या सभेत आधी स्वतंत्रपणे बसणं आणि मग सरमिसळ हे तत्त्व अवलंबिलं. पूर्वास्पृश्यांचे स्वतंत्र मेळे, मग मिश्रमेळे, अखिल हिंदू मेळे, अखिल हिंदू गणेशोत्सव हा क्रम अनुसरला. देशाच्या भावी पिढीच्या मनावर जातिभेदाचे (कु)संस्कार होऊ नयेत, यासाठी शाळांमध्ये स्पृश्य-अस्पृश्यांनी वेगवेगळं न बसता एकत्र बसावं, याचा आग्रह धरला. स्पृश्य-अस्पृश्य महिलांचे एकत्रित हळदीकुंकू समारंभ आयोजित केले. सहभोजनांचं आयोजन केलं.तत्कालीन स्पृश्य समाजाच्या वागणुकीत आढळणारा एक मोठा विरोधाभास असा की, अस्पृश्यांचा त्यांना विटाळ होत असे. परंतु, हिंदू समाजातल्या अनिष्ट रूढींमुळे गांजलेल्या अशा एखाद्या अस्पृश्यानं मुस्लीम अथवा ख्रिश्चन धर्मप्रसारकांच्या प्रलोभनांना भुलून जर धर्मांतर केले, तर मात्र ती व्यक्ती त्यांच्या दृष्टीने अस्पृश्य राहत नसे. धर्मांतरित व्यक्तींना पुन्हा हिंदू समाजात परतण्याची दारं खुली करण्याचं कार्यही तात्यांनी रत्नागिरीत असताना हाती घेतलं.
मंदिर हे केवळ श्रद्धास्थान नसतं, तर विभिन्न समाजांत सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संवाद साधण्यासाठीचं ते एक माध्यमही असतं, हे मर्म उमगलेल्या तात्यांनी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले. अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशाचे प्रयत्न कर्मठ सनातन्यांच्या विरोधामुळे मुंबई-पुण्यात तोपर्यंत विफल ठरले असताना, रत्नागिरीत शिरगाव इथे मात्र नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी, १९२५ साली मंदिराच्या पालखी प्रदक्षिणेत महार, मांग यांचादेखील समावेश होता. १९२९ मध्येच सावरकरांच्या वक्तृत्वाने प्रभावित झालेल्या समाजाने काहीही विरोध न करता, रत्नागिरीतल्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश करू दिला आणि युगांचं ’सुतक’ फिटल्याची भावना तात्यांच्या मनाला स्पर्शून गेली. असं असलं तरी अस्पृश्यांना मंदिर प्रवेश करू देण्याविरोधात इतरत्र झालेल्या आंदोलनांमुळे सगळ्या हिंदूंना कुठल्याही निर्बंधाशिवाय, भेदभावाशिवाय जिथे पूजा करता येईल, असं मंदिर बांधायची कल्पना तात्यांच्या मनात आली. त्यांनी भागोजीशेठ कीर या धनाढ्य, दानी व्यक्तीची भेट घेऊन हा मानस त्यांच्यापाशी व्यक्त केला. भागोजी कीर हे स्वतःही जातिभेदाच्या जाचक अनुभवातून गेले होते. ते भंडारी समाजाचे असल्याने रत्नागिरीतल्या इतर मंदिरांत पूजा करू शकत नव्हते. या शल्यावर मात करण्यासाठी आवश्यक वित्तबळ मात्र त्यांच्याकडे असल्याने स्वतःला पूजा करण्याचे समाधान जिथे लाभेल, असे भागेश्वर मंदिर त्यांनी स्वतःसाठी रत्नागिरीत बांधलं होतं.
तात्यांनी कीर यांना अस्पृश्यांची दयनीय स्थिती विदित केली आणि त्यांना दुरूनही देवदर्शन घेता येत नाही, आर्थिकदृष्ट्याही ते मंदिर बांधायला सक्षम नाहीत हे निदर्शनास आणून दिलं. या वस्तुस्थितीने हेलावलेल्या भागोजींनी मंदिर बांधण्यासाठी आर्थिक साहाय्य द्यायचं मान्य केलं. अशा तर्हेने पतितपावन मंदिराच्या उभारणीला १९२९ मध्ये सुरुवात झाली.“केवळ महार, चांभार किंवा अस्पृश्य समाजच नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजच परकीय जोखडामुळे पतित झाला आहे आणि या हिंदूराष्ट्राला पावन करणारं हे मंदिर आहे,“ असे प्रतिपादन तात्यांनी ’पतितपावन’ या नावाचं मर्म उलगडताना केलं.पायाभरणी समारंभानंतर दोन वर्षांत एक लाख रुपये व्यय करून मंदिराचं बांधकाम पूर्णत्वाला नेलं. दि. २२ फेब्रुवारी, १९३१ रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्याप्रसंगी ’हिंदू धर्म की जय’ या निनादानं आसमंत दुमदुमून गेला. तात्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, ”पोथीजात जातिभेदाच्या मानीव उच्चनीचतेला थारा न देता हिंदूमात्र तितका जिथे एकमुखाने सांघिक पूजाप्रार्थना करू शकतो, असे हिंदू जातीचं एक राष्ट्रीय केंद्र स्थापन झालं.आजही रत्नागिरीला हे साधंसं दिसणारं, पण हिंदू धर्माच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेलं मंदिर त्यादृष्ट्या हिंदूराष्ट्रवादी क्रांतिकारकाची गाथा सांगत, पर्यटकांचं स्वागत करीत उभं आहे.
संदर्भ :
१. सावरकरांचे समाजकारण - सत्य आणि विपर्यास, प्रा. शेषराव मोरे, राजहंस प्रकाशन, पुणे. १९९२
२. सावरकर-विस्मृतीचे पडसाद- १८८३- १९२४ विक्रम संपत (मराठी अनुवाद), कृष्णा पब्लिकेशन, २०२२
३. सावरकर-एक वादग्रस्त वारसा- १९२५- १९६६ विक्रम संपत (मराठी अनुवाद), कृष्णा पब्लिकेशन, २०२२