यंदाचा महाराष्ट्र दिन आपल्या सर्वांसाठी खास असेल. कारण, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रथमच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत सर्वदूर ऐकले जाईल. आजच्या या मंगल दिनी आपण सर्वांनी एकजूट व्हावे, अशीच अपेक्षा व्यक्त करतो.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विकासाची नवी उंची गाठत आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी हे गतिमान सरकार सक्षम आहे. मार्च 2023 मध्ये राज्याच्या विकासाचा ‘पंचामृत अर्थसंकल्प’ सादर करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी केलेली आहे. त्यातच या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून, माझ्यावर सोपविण्यात आलेल्या तिन्ही विभागांनादेखील भरभरून निधी उपलब्ध झाल्यामुळे कामांनी गती घेतली आहे. राज्यातील महिलांचे सक्षमीकरण, पर्यटन विकास धोरण आणि युवकांना रोजगारक्षम बनवणे या प्रमुख मुद्द्यांवर आम्ही काम करत आहोत.
यंदाच्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 393वी जयंती किल्ले शिवनेरीवर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरीवर आणि गडाच्या पायथ्याशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2023’ च्या आयोजनाचा उद्देश आणि त्याची फलश्रुतीदेखील तेवढीच महत्त्वाची ठरते. त्याचप्रमाणे प्रतापगडावर साजरा झालेला ‘शिवप्रताप दिन’ आणि किल्ले रायगडावरील शिव पुण्यतिथी दिनानिमित्त, शिवरायांना अभिवादन करण्यासाठी असंख्य शिवप्रेमी मावळ्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, येणार्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक दिन सोहळादेखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. महाराष्ट्रातील पर्यटन वाढावे, आपल्या राज्याचा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढ्यांना कळावा, यासाठी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी राज्य सरकारचा पर्यटन विभाग काम करत आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागामार्फत आगामी काळात ‘मान्सून धमाका’ हा अभिनव उपक्रम देखील राबवला जाणारा असून, यंदा महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला प्रथमच आठ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
महिला व बालविकास विभाग आणि कौशल्य विकास विभागाची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आल्यानंतर महिला व युवा वर्गाला रोजगारक्षम बनविण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू आहेत. याकरिता मुंबईसह महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांना रोजगार मिळवून देणे, प्रत्येक युवक-युवती, महिला, विद्यार्थी यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, नवनवीन संकल्पनांवर काम करणार्या ‘स्टार्टअप्स’ना प्रोत्साहन आणि चालना देणे, उद्योगांमधील बदलत्या तंत्रज्ञानास अनुसरून ‘आयटीआय’मधील अभ्यासक्रमांचे तसेच ‘आयटीआय’चे आधुनिकीकरण करणे यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांच्या माध्यमातून डिसेंबर 2022 मध्ये 46 हजार, 154 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.
‘महास्वयं पोर्टल’, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीसाठी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजकांमध्ये सांगड घालण्यासाठी हीींिीं://ीेक्षसरी.ारहरीुरूरा.र्सेीं.ळप हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेसुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेहीदेखील आयोजन करण्यात येत आहे.
आजवर मुंबईतील एलफिन्स्टन टेक्निकल हायस्कूल, भायखळा, बोरिवली, गोरेगाव, जुहू, पालघर आणि कल्याणसह विविध ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात आले आहेत.
कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नुकतीच महाराष्ट्र स्टार्टअप आणि नावीन्यता यात्रा संपन्न झाली. यामधील उत्कृष्ट स्टार्टअप्सना सन्मानित करण्यात आले. कृषी शिक्षण, गव्हर्नन्स, पर्यावरण, ई-कॉमर्स, रोबोटिक्स, स्मार्ट इन्फ्रा आणि मोबिलिटी, शाश्वतता, आरोग्य आदी क्षेत्रातील स्टार्टअप्स युवक-युवतींनी सादर केले. प्रथम विजेत्या तसेच सर्वोत्तम महिला स्टार्टअप्सना प्रत्येकी एक लाख रुपयांचे, तर द्वितीय विजेत्या स्टार्टअप्सना 75 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व ‘रेवती रॉय फाऊंडेशन’ यांच्यामार्फत महिलांसाठी ‘गॅस स्टेशन’, ‘पेट्रोल पंप सेवक’ या अभिनव अभ्यासक्रमाचा नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. यातून प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना थेट गॅस स्टेशन, पेट्रोल पंप येथे रोजगार उपलब्ध होईल. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 100 महिला लाभार्थींना प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणाचा कालावधी सात दिवसांचा असून संस्थेमार्फत 90 दिवसांचे ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ही देण्यात येईल.
त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ‘अंगणवाडी दत्तक योजने’अंतर्गत राज्यातील 750 अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा नव्या संस्थांसोबत मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला. त्यामुळे ऑक्टोबर 2022 पासून ते आत्तापर्यंत राज्यात एकूण 4,418 अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळणार आहे. तसेच, ‘कंटेनर अंगणवाडी’ ही अभिनव संकल्पनादेखील सुरू करण्यात आली आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांना सक्षम बनविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20 हजार पदे येत्या काळात भरण्यात येणार आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे राज्य असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर बनविण्यासाठी काम सुरू केले असून, संपूर्ण राज्य यासाठी काम करत आहे.
संपूर्ण देशाचा विचार केला, तर महाराष्ट्र राज्य हे वेळोवेळी आपल्या संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाची उदाहरणे देत आहे. महाराष्ट्रातील जनता बहुउद्योगी आहे आणि यामाध्यमातून आपल्या देशाच्या विकासातदेखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जातो. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, परेड आणि ध्वजारोहण समारंभ होतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले अशा विविध महापुरुषांना अभिवादन करण्याचा आणि राज्याच्यानिर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या महान नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आजचा हा दिवस आहे. सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
- मंगलप्रभात लोढा
पर्यटन, महिला व बालविकास, कौशल्य रोजगारमंत्री, महाराष्ट्र