नवीन शासकीय महाविद्यालयासाठी जमीन हस्तांतरणास मंजुरी
पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती
21-Apr-2023
Total Views | 66
1
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे विद्यापीठाची स्वतःची पदवी व पदव्युत्तर संस्था सुरू करण्यासाठी ५ एप्रिल, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली. त्यासाठी नवीन महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय यांच्या विस्तारीकरणांसाठी मौजे- म्हसरुळ येथील सर्व्हे नं. क्र. २५७ मधील क्षेत्र १४ हेक्टर ३१ आर जागा गुरुवार २० एप्रिल रोजीच्या शासन ज्ञापनाद्वारे हस्तांतरण करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय विद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासह पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर अत्याधुनिक अतिविशेषोपचार आरोग्य सेवा व संशोधनास चालना देण्यासाठी महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यासही मान्यता मिळाली आहे.
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नाशिककरांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर पडणार आहे. उत्तर महाराष्ट्राचे वैद्यकीय महाविद्यालय, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था यांचे स्वप्न साकार होणार असल्याचेही पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.