डॉ. अभिजीत यांचे ‘वेट लॉस’ तंत्र

    16-Apr-2023   
Total Views |
 dr abhijeet mhatre

वजन कमी करण्यासाठी समुपदेशन करणार्‍यांच्या यादीत डॉ. अभिजीत म्हात्रे पंधराव्या स्थानावर असून त्यांनी ‘मॉडेलिंग’ मध्येही ठसा उमटविला आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया.

अभिजीत याचे बारावीपर्यंतचे शिक्षण स. है. जोंधळे शाळेतून झाले. त्यानंतर त्यांनी एमएससी आणि एम.फील मुंबई विद्यापीठातून केले आहे. मानसोपचार आणि समुपदेशन यामध्ये त्यांनी ‘एमएस’ पदवी संपादन केली आहे. आहार आणि पोषणतत्त्व यामध्ये पीएच.डी केली आहे. अभिजीतचे एमबीए करण्याचे कोणतेच नियोजन नव्हते. पण नोकरी करीत असताना प्रमोशन मिळेल, या हेतूने त्यांनी एमबीए करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद येथील त्रिपुरा विद्यापीठातून २०११-१२ मध्ये एमबीए केले. पण त्यानंतर नोकरी सोडली. दरम्यानच्या काळात अभिजीतचे वजन वाढले. अभिजीतला वाढलेल्या वजनामुळे चक्कर येत होती.

सर्वजण ’कमी खा’ असा सल्लाही देत होते. अभिजीतचे वजन काही केल्या कमी होत नव्हते. अखेर ’हेल्थ’कडे लक्ष देण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. ‘बेसिक ट्रेनर’ कोर्स केला. त्यानंतर अभिजीतचा या क्षेत्राकडील ओढा वाढला. आणि त्यांनी या क्षेत्रातच पीएच.डी करण्याचे पक्के केले. अभिजीतने स्वत:चे वजन एवढे कमी केले की त्याला ‘मॉडेलिंग’च्या संधी चालून आल्या. मग अभिजीतने ‘मॉडेलिंग’ आणि समुपदेशन करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी कधीही नोकरी केली नाही. अभिजीतचे वडील उत्तम हे बांधकाम व्यावसायिक. त्यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे, तर आई चंद्रकला गृहिणी आहेत. अभिजीतनी ‘मॉडेलिंग’ क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली तेव्हा त्याला घरातून विरोध नव्हता, पण ‘सपोर्ट’ही केला नाही. पण जसे यश मिळाले तसे कुटुंबीयांनी ’सपोर्ट’ करायला सुरूवात केल्याचे अभिजीत सांगतात.

अभिजीत यांचा एक मित्र फोटोग्राफी शिकत होता. तेव्हा एका ‘फॅशन फोटोग्राफी’ करणार्‍या फोटोग्राफरने अभिजीत यांची ‘प्रोफाईल’ पाहिली. त्यातून अभिजीतला दोन ते तीन जाहिरातींचे काम मिळाले. दोन ते तीन वर्षे ‘मॉडेलिंग’ केले. ‘मॉडेलिंग’सोबत काहीतरी व्यवसाय असावा, असे त्याला वाटू लागले. कारण, ‘मॉडेलिंग’ हे क्षेत्र महाराष्ट्रात पूर्णवेळ स्वीकारले जात नाही. त्यातून अभिजीतने स्वत:ची डोंबिवलीत ‘एएम फिटनेस सेंटर’ नावाने (अभिजीत म्हात्रे) जिम सुरू केली. ‘मॉडेलिंग’ क्षेत्रात काम करताना काहींना ‘हेल्थ’शी संबंधित समस्या होत्या, ते अभिजीतकडे येत. हळूहळू आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकही ‘फिट’ राहण्यासाठी अभिजीतकडून सल्ला घेऊ लागले.

सध्या अभिजीत ‘सेलिब्रेटी न्यूट्रीशन’, ‘सेलिब्रेटी वेटलॉस’ आणि ‘लाईफस्टाईल मॅनेजर’ म्हणून काम करत आहे. २०१५ पासून अनेक ‘सेलिबेट्री’ अभिजीत यांच्याकडे समुपदेशनासाठी येऊन गेल्या. अभिनेता रजित कपूर, फॅशन डिझाईनर विशाल कपूर, अभिनेत्री सोनाली जोशी, नेक ग्रेस आंतरराष्ट्रीय मॉडेल यासारखे अनेक सेलिब्रेटी अभिजीतकडून समुपदेशनाचे धडे गिरवत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला आपल्या क्षेत्रात कार्यरत असताना ‘ग्लॅमर’ हे हवे असते. त्यामुळे त्यांच्या क्षेत्रात ‘ब्रॅण्ड इमेज’ वाढायला मदत होते. बरेच जण बाजारात मिळणारे ’हर्बल ज्यूस’ पिऊन बारीक होण्याचा सल्ला देतात.

पण अभिजीत ’वेट लॉस’ समुपदेशन करताना कोणालाही उपाशी राहायला सांगत नाही. अभिजीतने या क्षेत्रात खूप संशोधन केले आहे. तो प्रथम मानसिकदृष्ट्या समुपदेशन करतो. त्यानंतर समस्या समजून घेऊन ४५ दिवसात खाऊन-पिऊन वजन कमी करण्याचा सल्ला देतो. अभिजीतने २०१५पासून आतापर्यंत पाच हजारांहून अधिक लोकांचे समुपदेशन केले आहे. अभिजीतच्या ‘वेट लॉस’मध्ये पथ्य पाळले, तर पुन्हा वजन वाढण्याची शक्यता कमी असते. दोन महिन्यांत त्या व्यक्तींच्या सवयी समजून घेऊन त्यांना समुपदेशन केले जाते. वजन कमी करण्यासाठी बाजारातील कोणतीही उत्पादने खाण्याचा सल्ला अभिजीत देत नाही, असे त्यांनी सांगितले.

हल्ली प्रत्येकालाच आपण छान दिसावे, असे वाटत असते. सोशल मीडियाच्या जमान्यात अगदी मंदिरात गेले, तरी त्यांच्याकडून फोटो काढले जातात. वजन कमी केल्यानंतर त्या व्यक्ती सुंदर दिसायला लागतात. ५० टक्के लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. चांगले दिसणे सध्या खूप महत्त्वाचे झाले आहे, असे अभिजीतने सांगितले. ‘मॉडेलिंग’ हे क्षेत्रसुद्धा चांगले आहे. पण मॉडेल म्हटल्यावर सर्वांकडे एकाच दृष्टिकोनातून पाहिले जाते. मॉडेलकडे एकाच दृष्टिकोनातून पाहिले जाते. पण सर्वजण तसे असतील असे नाही. ’रॅम्प’वर चालणे एवढेच ‘मॉडेलिंग’ नाही. ज्यांचा रंग ‘डार्क’ आहे, त्यांनासुद्धा ‘मॉडेलिंग’च्या क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. ‘डस्टी मॉडेल्स’चे फोटो खूप चांगले येतात. ’मॉडेल’ बनायचे असेल, तर स्वत:वर ’फोकस’ केले पाहिजे.

‘कमर्शियल मॉडेलिंग’ही करता येतात. ’मॉडेलिंग’मध्ये ही वेगवेगळे प्रकार आहे. काहींना या क्षेत्रात अभिनयाची ही संधी चालून येते. मग ते कलाकार म्हणून काम करू लागतात. ‘मॉडेलिंग’च्या प्रशिक्षणासाठी ‘ग्रूमिंग स्कूल’ सुरू केले आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्वत: मेहनत घ्यावी लागते. या क्षेत्रात येण्यासाठी थोडीफार गुंतवणूकही करावी लागते. अभिजीतना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अभिजीत यांचा ‘फिटनेस’विषयी अभ्यास असल्याने ‘मॉडेलिंग’मध्ये त्याचा उपयोग होतो. अशा हरहुन्नर मॉडेलला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.