प्रल्हाद वामनराव पै यांना नुकताच महाराष्ट्र सरकारच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ‘जीवनविद्या मिशन’च्या कार्याचा गौरव करणारे एक प्रतीक आहे. यानिमित्ताने सद्गुरू वामनराव पै आणि ‘जीवनविद्या मिशन’च्या कार्याचा घेतलेला आढावा...
भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग म्हणजे संतपरंपरा. संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागणार्या संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांची ही भूमी, अभंगातून समाज प्रबोधन करणारे संत तुकाराम, संत नामदेव, संत बहिणाबाई, संत जनाबाई, संत मुक्ताई अशी अनेक नावे सहज घेता येतील अशी संतांची मांदियाळी आपल्याला लाभली. स्वतःसाठी काही न मागता दुसर्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी, अशी शिकवण देणार्या या सर्व संतांनी समाज प्रबोधनासाठी दूर दूर प्रवास केला. तीच संतपरंपरा ‘जीवनविद्या मिशन’च्या माध्यमातून सद्गुरू वामनराव पै यांनी चालवली. त्यांनी केलेल्या कार्यातून समाजाला अध्यात्माची ओढ लागली, तर कोणी नशेच्या आहारी गेलेले पुन्हा चांगल्या मार्गावर आले, तर अनेक संसार यामुळे वाचले. या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे म्हणजे ईश्वराला वंदन करण्यासारखे आहे.
समाजप्रबोधनासाठी ‘जीवनविद्या मिशन’ कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता समोरच्याला कसे आनंदात पाहता येईल, वाममार्गाला लागलेल्या योग्य मार्गावर कसे आणता येईल आणि हे विश्व सुखी कसे होईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसते. सद्गुरू वामनराव पै यांचा वारसा त्यांच्या सुपुत्राने प्रल्हाद यांनी चालवला आहे. प्रल्हाद हे पवई ‘आयआयटी’मधून उच्चविद्याविभूषित आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते प्रल्हाद यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त झाला. सध्या सद्गुरु वामनराव पै यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. प्रल्हाद यांना यावर्षी हा पुरस्कार मिळणे म्हणजे वडिलांनी दाखविलेल्या मार्गावर विश्वकल्याणाचा वसा घेतलेल्या समाज प्रबोधनाची योग्य दिशेने सुरू असलेल्या वाटचालीची पोचपावती आहे. या पुरस्कारामार्फत जणू प्रत्येक नामधारक आपली कृतज्ञता पै परिवाराच्या चरणी अर्पण करत आहे.
तसेही ‘जीवनविद्या मिशन’ हा एक वटवृक्ष आहे. हा वटवृक्ष म्हणजे सद्गुरू वामनराव पै यांनी त्यांच्या नामधारकांवर धरलेली मायेची सावली आहे. खरे सद्गुरू ते असतात जे त्यांच्या अनुयायांना योग्य मार्ग दाखवतात. या वाक्याला समर्पक असे ‘जीवनविद्या मिशन’चे कार्य आहे. सद्गुरू वामनराव पै यांनी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असे प्रबोधन करत आयुष्यात कोणत्याही फळाची अपेक्षा न करता चांगले विचार आणि चांगले कर्म करत जा. त्यामुळे निसर्गनियमाप्रमाणे तुझ्या आयुष्यात चांगले दिवस येतील, असा मौलिक सल्ला त्यांच्या अनुयायांना दिला. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात १९२३ मध्ये वामनराव पै यांचा जन्म झाला. रुईया महाविद्यालयात आपले अर्थशास्त्र विषयातील शिक्षण पूर्ण करून अर्थमंत्रालयात उपसचिव या पदाचा कार्यभार सांभाळला. मनात सतत समाजाप्रति असणारी आपलेपणाची भावना, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सातत्याने ते कीर्तन, हरिपाठ, प्रवचने या माध्यमातून समाजप्रबोधन करू लागले. सकाळी नोकरी आणि संध्याकाळी कीर्तन अशा प्रवासात ते सर्व नामधारकांना आपल्या कुटुंबातील सदस्य वाटू लागले. अनेकांनी त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा निर्धार केला आणि वामनराव पै हे सर्व नामधारकांचे सद्गुरू झाले. जो सद्मार्ग दाखवतो, तो सद्गुरू या उक्तीप्रमाणे आजपर्यंत लाखोंच्या संख्येने नामधारकांनी सद्गुरु वामनराव पै यांचा अनुग्रह घेतला आहे.
‘हरिपाठाचे महत्त्व’, ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’, ‘नामाचे महत्त्व’, ‘अमृतमंथन’, ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात’, ‘स्त्रियांचे हितगुज’, ‘शरीर साक्षात् परमेश्वर’, ‘नामाचा नंदादीप’, ’ज्ञानेशाचा संदेश’, ‘जीवन विद्येचा मंगल कलश’, ‘अंधार अंधश्रद्धेचा’, ‘जीवन विद्या दर्शन’, ‘सुखी जीवनाचे पंचशील’, ‘तुमचे भाग्य तुमच्या विचारात’, ‘ही खरी मूर्तिपूजा आणि हाच खरा धर्म’, ‘सुखाचा शोध आणि बोध’, ‘जीवन विद्या समज गैरसमज’, ‘माणसाचा जन्म कशासाठी’, ‘विद्यार्थ्यांना मार्गदर्शन’, ‘शांती सुखाचा राजमार्ग’, ‘आदर्श पालक आदर्श विद्यार्थी’, ’पापपुण्य’, ‘संकल्प सिद्धीचे गुपित’, ’विश्वप्रार्थना’ अशा अनेक भाषांत उपलब्ध असलेल्या ग्रंथांतून ,चिंतनांतून , संस्कार केंद्रातून संतसंगातून त्यांनी नामधारकाचे जीवन सुखी केले आणि प्रसादरुपी विश्वप्रार्थना विश्वकल्याणसाठी प्रत्येक नामधारकांना दिली.आपली प्रत्येक कृती ही राष्ट्राच्या उन्नतीसाठी असली पाहिजे. राष्ट्राची प्रगती हेच आपले ध्येय असले पाहिजे, अशी आग्रही भूमिका सद्गुरु आपल्या प्रवचनातून नेहमी मांडत. आज ते शरीर रूपाने आपल्या मध्ये नसले, तरीही ते विचाररूपाने प्रत्येक नामधारकांच्या हृदयात आहे. म्हणून हा जीवनविद्येचा वटवृक्ष आजही लाखो नामधारकांना मायेची कृपेची सावली देत बहरत आहे.
‘जीवनविद्या परिवारा’मार्फत सद्गुरुंच्या संकल्पनेतून साकारलेल्या कर्जत येथील ज्ञानपीठात आज अनेक उपयुक्त कोर्सेसचे आयोजन केले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘वेबिनार’, ’युट्यूब चॅनेल्स’, ‘कॉन्फरन्स’, ‘समुपदेशन सत्र’ हे देशविदेशात ही होत आहे. सद्गुरू श्री वामनराव पै यांची जीवनविद्या आज अनेक देशात पोहोचत आहे, वाढत आहे. गर्भसंस्कार, उत्कर्ष विद्यार्थ्यांचा संकल्प जीवनविद्येचा, सुजाण पालकत्व, कौटुंबिक सौख्य, सोळावे वरीस मोक्याचे सोनं करा आयुष्याचे, गशर्शींरप र्ींळवूर’ी डळिीर्ळीींरश्र ुळीवेा ळप वरू ीें वरू श्रळषश हे सर्वसामन्यांसाठी, तर ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हाती’, ‘स्वानंदयोग - १ ते ७’, ‘एन्जॉय स्ट्रेस’ हे कॉर्पोरेट जगतासाठीचे कोर्सेस चालतात. कॉर्पोरेट क्षेत्रात ‘स्वानंदयोग’ या कोर्सेसना खूप मागणी आहे. प्रल्हाददादा या विषयांची मांडणी खूप आकर्षक पद्धतीने करतात. सद्गुरुंनी दिलेल्या या कार्याचा वसा प्रल्हाद पै समर्थपणे पेलत आहे. सद्गुरुंचे विचार आज ते घरा घरात पोहोचवत आहेत.
हे सर्व करत असताना सद्गुरु श्री वामनराव पै यांनी नामधारकांकडून कसलीच अपेक्षा केली नाही, उलट प्रत्येक वेळेला त्यांनी नामधारकांची कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या कार्यात दैनंदिन जीवनात ज्या ज्या लोकांची आपल्याला मदत होते, अशा प्रत्येकाची नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगितले. ज्यांचा राग येतो, त्या प्रत्येकासाठी नम्रपणे विश्वप्रार्थना म्हणायला सांगितली. कसला आकस नाही, मोह नाही, कोणत्याही फळाची अपेक्षा नाही, स्वभावात नम्रपणा, आत्मचिंतन, चांगले विचार असा नामधारक सद्गुरुंनी घडवला. अनेक गावं दत्तक घेऊन तिथे समाजोपयोगी काम सुरू केली. आज हा ‘जीवनगौरव पुरस्कार’ श्री प्रल्हाद पै यांना सन्मानित करता करता स्वतःच सन्मानित झाला असेल.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव...
सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ।
सातत्याने मुखाने विश्वप्रार्थना जप करणार्या प्रत्येक नामधारकाला सद्गुरु कृपेने सर्व काही मिळो, हीच शुभेच्छा व्यक्त करतो. ‘जीवनविद्या मिशन’चे हे कार्य उत्तरोत्तर वाढत राहील, यात शंका नाही. सद्गुरु नक्कीच आपल्या प्रत्येक नामधारकांकडून असे कार्य करवून घेत राहतील. सद्गुरु श्री वामनराव पै आणि ‘जीवनविद्या मिशन’चे विस्तृत कार्य लेखनात बांधणे अशक्य आहे, ते फक्त अनुभवातूनच अनुभूती घेऊन समजू शकते.
सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. विश्वप्रार्थना महाजप यज्ञाचे प्रयोजन सुरू आहे, या वर्षातील कार्यक्रम कोर्सेस तसेच ग्रंथांच्या माहितीसाठी संपर्क-
राजेश नटे - ९९६७८४६२०६
-प्रसाद मोर्जे