‘दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र’ ही संस्था महिलांसंबंधित समस्यांवर सखोल अभ्यास करते. अभ्यासगट, परिसंवाद, संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण शिबीर, सर्वेक्षण या विविध माध्यमांतून संस्था आपली वाटचाल करत आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा...
स्त्री ही शक्ती आहे. दशदुर्गेच्या स्वरूपात तिचे नमन केले जाते. स्त्रीच्या सबलीकरणाकरिता अनेक संस्था कार्यरत आहेत. यातीलच एक संस्था आहे ‘दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र.’ स्त्रीला भेडसावणार्या समस्यांचा, परिस्थितीचा अभ्यास विविध प्रकारे करण्यासाठी ‘दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रा’ची अनौपचारिकरित्या १९९६मध्ये पुणे येथे स्थापना करण्यात आली. अध्ययन प्रबोधन केंद्रा’न’ १९९६ पासून वृत्तपत्र व नियतकालिक यातून महिलांविषयक प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांचा संग्रह केला. महिलाविषयक अभ्यास हाच विषय होता. यामध्ये ‘जेंडर बजेट’, महाराष्ट्रातील बचत गटांचा अभ्यास, हरियाणातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तराचा तेथील विवाह संस्थेवर झालेला परिणाम, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशातील वनवासी भागातील मुलीचे घरकामासाठी झालेले स्थलांतरण हे या अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. या सर्वांगीण बाजूंनी केलेल्या अभ्यासाचा शासकीय संस्था, बिगर शासकीय संस्था, खासगी संस्था व व्यक्तींना लाभ होत आहे.
भारतभूमी ही नररत्नांची खाण आहे. त्याचप्रमाणे भारत ही वीरमातांची भूमी आहे. या सर्वांनी देशभक्तीची भक्तिरसाची पराक्रमाची जोपासना केली. राजमाता जिजाऊ साहेब, राणी चेन्नमा, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, मादाम कामा, भगिनी निवेदिता, राणी लक्ष्मीबाई, संत मीराबाई, संत मुक्ताबाई, वंदनीय लक्ष्मीबाई केळकर, ‘माऊंट एव्हरेस्ट’वर पाऊल ठेवण्याचा पराक्रम करणार्या प्रा. बचेंद्री पाल ही वीरमातांची ठळक उदाहरण होत. या सर्वांनी केवळ आपल्या परिवाराचा विचार न करता तसेच परिवारापुरते सीमित न राहता देशाचा समाजाचा विचार केला. वेळप्रसंगी खस्ता खाल्ल्या. पण आपले ध्येय गाठण्यासाठी अतोनात परिश्रम केले. देशात स्वातंत्र्याची भक्तीची वीरतेची भावना जनमानसात रुजविली. अंधःकारात खितपत पडलेल्या समाजासाठी प्रसंगी पणती होऊन दिग्विजयाची ज्योत बनल्या. परकीय आक्रमकांविरुद्ध या भगिनी जशा त्वेषाने लढल्या, तर काहीजणी समाजातील अन्याय चालीरीती रूढीपरंपरा झुगारून देण्यासाठीही लढल्या, तर काही आपल्या समाजातील स्वजनांविरुद्धही लढल्या.
अनेक वर्षांपूर्वी भारतीय स्त्रियांनाही काही कुप्रथांना बळी पडावे लागत होते. मात्र अनेक समाजसुधारकांनी स्त्रियांवर होणार्या अन्यायाला वाचा पोडली. स्त्रीच्या सहनशीलतेला आत्मशक्तीचा मंत्र दिला. स्त्रियांचे जगणे माणूस म्हणून अतिशय सहज व्हावे म्हणून मग विधवांचे पुनर्विवाह, शिक्षणाचा प्रसार, मतदानाचा अधिकार, असे अनेक निर्णय घेण्यात आले. १९९६ साली स्थापन झालेल्या ’दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रा’ची सार्वजनिक न्यास म्हणून २००१ साली नोंदणी करण्यात आली. त्यावेळी काही उद्दिष्ट ठरविण्यात आली. त्यानुसार महिलांच्या स्थितीचा विकासाचा प्रश्नांचा भारतीय संस्कृतीच्या संदर्भात अभ्यास केला जातो. तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांबाबत जी धोरण जाहीर होतात, त्याचे मूल्यमापन संशोधन, प्रबोधन केले जाते. महिलांच्या समस्यांबाबत अभ्यास, परीक्षण, सर्वेक्षण केले जाते. तसेच महिला विकासाच्या सर्व योजनांची विविध कार्यांची माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते. महिलांच्या क्षेत्रात अभ्यास आणि काम करणार्या कार्यकर्त्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाते. या सर्वांचे प्रशिक्षण आयोजित केले जाते. महिलाविषयक संशोधन करणे व अशा संशोधन करणार्या व्यक्ती, संस्था, संघटना यांना साहाय्य केले जाते. तसेच महिलाविषयक अभ्यास साहित्य प्रकाशित केले जाते.
संस्थेने आपले कार्य विविध माध्यमांतून चालू ठेवले आहे. वरती ठरविलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. विविध वृत्तपत्रे, नियतकालिके यातून प्रसिद्ध झालेल्या महिलाविषयक बातम्या व लेख यांचा संग्रह ’दृष्टि’त केला आहे. हा संग्रह १९९६ पासूनचा उपलब्ध आहे, याचे बरेचसे दस्तावेजीकरण पूर्ण करण्यात आले आहे. संस्थेच्यावतीने महिलाविषयक अभ्यास मंडळ, परिसंवाद प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच संस्थेने महिलाविषयक विविध साहित्य प्रकाशित केले आहे. यात स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांचे अनौपचारिक शिक्षण, महिला विश्व मासिक (वर्तमानपत्र नियतकालिक यातून येणारी माहिती), महिला विश्वचा विशेषांक (महिलांविषयी विशिष्ट विषयावरील तज्ज्ञांचे लेख), शिक्षण -रोजगार निर्णय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग, आर्थिक सहभाग, महिलांची तस्करी, १९४७ पासून स्त्रीजीवनाचा प्रवास आणि आगामी दिशा (२०२२), झारखंड, छत्तीसगढ ओडिशाच्या वनवासी भागातील तरूण मुलींचे घरकामासाठी स्थलांतर, जेंडर बजेट संकल्पना, हरियाणातील घटत्या स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तराचा तेथील विवाह पद्धतीवर झालेला परिणाम, नवदुर्गा-महिलांच्या यशोगाथा, लेखसंग्रह, किशोरी समग्र विकास - किशोरवयीन मुलींच्या विकासासाठी कार्यशाळा घेण्यासाठी मार्गदर्शिका, आसाम, अरुणाचल, मणिपूर येथील स्त्रियांची सामाजिक- आर्थिक स्थिती, 'Status of women in India - Education Employment and Health, two volumes' यांचा समावेश आहे.
तसेच संस्थेने काही विषयांवर संशोधन प्रकल्प सादर केले आहेत. यात महाराष्ट्रातील बचत गटाचा सामाजिक विकास, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशाच्या वनवासी भागातील तरूण मुलींचे घरकामासाठी स्थलांतरण, हरियाणामध्ये घटत्या स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तराचातेथील विवाह पद्धतीवर झालेला परिणाम, ईशान्य भारतातील महिलांच्या स्थितीचा अभ्यास, ‘स्टेट्स ऑफ वुमन इन इंडिया’ याचा समावेश आहे. संस्थेच्यावतीने काही प्रशिक्षण वर्गही आयोजित करण्यात आले. यात पुणे महानगरपालिका व ‘दृष्टि’च्यावतीने ‘जेंडर बजेट’ संकल्पनेवर महिला नगरसेविकांचे प्रशिक्षण घेतले. तसेच ‘दृष्टि’ व भारतीय स्त्रीशक्ती जागरण यांचे संयुक्त विद्यमाने नगरसेविका पदासाठी निवडणूक लढविणार्या महिला उमेदवारांचे प्रशिक्षण आणि कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखलाजावा, यासाठी आस्थापनांमध्ये नेमण्यात आलेल्या तक्रार निवारण समिती सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. ‘दृष्टि’ संस्थेच्यावतीने काही अभ्यासगट स्थापण्यात आले. यात ‘जेंडर बजेट’ विषयाचा अभ्यासगट स्थापन करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाचा २०१७-२०१८चा अर्थसंकल्प स्त्रीकेंद्री असण्यासाठी सूचना करण्यात आल्या.
झारखंड, छत्तीसगढ, ओडिशाच्या वनवासी भागातील अनेक महिला रोजगारासाठी दिल्ली व इतर प्रदेशांत येत असतात. त्या घरेलू कामगार म्हणून काम करतात. घरातून बाहेर पडल्यावर या मुलींचे शोषण केले जाते. ६० हजारांपेक्षा जास्त महिला दिल्लीत काम करतात. २०१३ साली याचे सर्वेक्षण करण्यात आले. घरेलू कामगारांसाठीचे सामाजिक सुरक्षा विधेयक सादर करताना संस्थेने केलेल्या सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला. हरियाणासारख्या प्रगत राज्यात स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण घटले होते. मुलीची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली होती. सोनोग्राफी सेंटरद्वारे स्त्रीभ्रूण हत्येला चालना मिळत होती, तरी ‘दृष्टि’च्यावतीने या प्रश्नांवर अभ्यास करण्यात आला. २७ नोव्हेंबर, २०१० रोजी अभ्यासगट स्थापन केला, तरी या अभ्यासगटाच्या सूचनांचा विचार करून हरियाणा सरकारने काही कडक उपाययोजना केल्या व मुलींचा जन्मदर सुधारला. महाराष्ट्रातीलबचत गटांचा अभ्यास करताना १३ जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले. यात १५० बचत गटांचा अभ्यास करण्यात आला. ६५ बचत गटांतील व्यक्तीच्या व्यक्तिगत, तर ८५ बचत गटांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ज्या बचत गटांना तीन ते पाच वर्षे पूर्ण झाली आहेत, असे गट अभ्यासासाठी निवडण्यात आले. या गटासाठी विविध विषयांवर प्रशिक्षण वर्ग साक्षरता वर्ग आरोग्य शिबिरे संस्थांनी आयोजित करावी, अशी शिफारस अभ्यासात करण्यात आली. तसेच सरकारी अनुदान व मदत न घेता गावाच्या विकासासाठी गावाच्या पातळीवर विचार केला पाहिजे, तसेच ग्रामस्वच्छता व शौचालय बांधणे या योजना कागदावरच न राहता प्रत्यक्षात आल्या पाहिजेत, अशा शिफारसी करण्यात आल्या.
भारतातील महिलांच्या स्थितीचे खरे चित्र स्पष्ट व्हावे या हेतूने दृष्टीने भारतीय महिलाची स्थिती यावर सर्वेक्षण केले. यात भारतीय महिलांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार यावर भर देण्यात आला. संपूर्ण भारतात सर्व राज्य पाच केंद्रशासित प्रदेश व भारतातील ६३ टक्के जिल्ह्यात हे सर्वेक्षण करण्यात आले. एवढ्या विस्तृत क्षेत्राला स्पर्श करणारे हे सर्वेक्षण महिलांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरले. यासाठी अनेक सामाजिक कृतीगट स्थापन करण्यात आले. सर्वेक्षणाबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या विशिष्ट समस्यांवर अभ्यास करण्यात आला. २०१७ व २०१८ साली हा अभ्यास करण्यात आला. अभ्यासासाठी निवडलेल्या महिला विविध क्षेत्रांतील होत्या. आध्यात्मिक क्षेत्र, वनवासी व सीमावर्ती भाग, तणावग्रस्त भाग, शास्त्रज्ञ महिला, मच्छीमार महिला, शिक्षिका, झोपडपट्टीतील महिला, डॉक्टर महिला, शेतकरी महिला, गृहिणी याचा यात समावेश होता.
‘दृष्टि स्त्री प्रबोधन अध्ययन केंद्रा’चे कार्यकारी मंडळ आहे. भारतीय शिक्षण मंडळाच्या राष्ट्रीय शिक्षक प्रकोष्ट प्रमुख अरूणा सारस्वत उज्जैन या अध्यक्ष आहेत. पुणे महानगरातील प्रा. डॉ. अंजली देशपांडे सचिव व प्रा. शुभांगी तांबट या सहसचिव म्हणून काम पाहतात. कार्यकारी मंडळात अभाविपच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष गीता गुंडे, राष्ट्र सेविका समितीच्या वंदनीय प्रमुख संचालिका शांताक्का, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीताक्का, ‘स्वरुपवर्धिनी’च्या पुष्पाताई नडे, भटके विमुक्त विकास परिषदेच्या सुवर्णा रावळ, विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय महामंत्री मिनाक्षीताई पेशवे, राष्ट्रसेविका समितीच्या भाग्यश्री साठये अशा अनेक जणी आपले योगदान देत आहेत.
‘दृष्टि’ हे अध्ययन केंद्र असल्याने महिलांच्या संबंधित समस्यांवर सखोल अभ्यास केला जातो. या अभ्यासात शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणूनच कोणत्याही सरकार किवा अशासकीय संघटना त्याची धोरण उपक्रम ठरविताना या अभ्यासाचा उपयोग करतात. या संबंधित अहवालाच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या भागातील महिलांच्या समस्यांबाबतीत माहिती जमा करून दस्तावेजीकरण करणे व त्या समस्या तपशीलवार मांडणे, असे विधायक काम केले जाते. दिवसेंदिवस अशा विचारपूर्वक नियोजन करणार्या संस्थाची देशाला गरज आहे. ‘दृष्टि’सारख्या संस्था दीपस्तंभ आहेत.
-सचिन साठ्ये
अधिक माहितीसाठी संपर्क-
www.streeadhyayan.org
drishti.pune@gmail.com
संपर्क : ८६६८२१०१७४