ठाणे : पावसाळ्यापूर्वीच ठाण्यात पडझड सुरु झाली आहे. कळवा येथील सूर्यनगर भागात शनिवारी दुपारी श्री साईनिवास या चार मजली अनधिकृत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील स्लॅबचे प्लास्टर कोसळुन दोन चिमुकले जखमी झाले. त्यांच्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी, कॉलमला तडे गेल्याने ठाणे महापालिकेने तुर्तास या सदनिकेला सील ठोकले आहे.
कळवा पूर्वेकडील भागात सूर्यनगर भागात श्री साईनिवास ही १५ वर्ष जुनी अनधिकृत इमारत आहे. या इमारतीत एकूण ४५ कुटुंबे राहत असुन पहिल्या मजल्यावर १०४ क्रमांकाच्या गौतम शहा यांच्या मालकीच्या खोलीत आशिष सिंग हे भाड्याने राहतात. शनिवारी दुपारी खोलीतील स्लॅबचे प्लास्टर पडून त्यात अक्षित आशिष सिंग (४ वर्षे) आणि आर्या आशिष सिंग ( ७ वर्षे) ही दोन मुले जखमी झाले आहेत. त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कळवा प्रभाग समितीचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेततर कॉलमला तडे गेल्याने पालिकेने खोली रिकामी केली असून त्याचबरोबर पालिकेने इमारतीच्या बांधकामाचे संरचनात्मक परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) सुरू केले आहे. या अहवालानंतरच इमारती पूर्णपणे रिकामी करायची की नाही, याबाबतची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.