पुणे : देशाच्या कानाकोपर्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र पोचविण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे समर्पित भावनेने केले. त्यांनी हे काम केले नसते, तर शिवाजी महाराज यांची ओळख तितक्या मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचली नसती.शिवाजी महाराजांचे जीवन हे एका राजाचे जीवन नसून एका विचारांचे जीवन आहे. स्वधर्म, स्वराज्य, स्वभाषा हा शिवाजी महाराजांचा विचार नव्या पिढी पर्यंत पोचविण्याचे काम या शिवसृष्टीद्वारे होईल. असेही केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
महाराजा शिवछत्रपति प्रतिष्ठानच्यावतीने नहे आंबेगाव (पुणे) येथे उभारलेल्या शिवसृष्टीच्या सरकारवाडा या पहिल्या चरणाचा लोकार्पण सोहळा गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दि.१९ फेब्रुवारी रोजी झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाना जाधव, प्रांत कार्यवाह प्रवीण दवडगाव, प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम उपस्थित होते. कवड्यांची माळ, शिंदेशाही पगडी व शिवाजी महाराजांचे शिल्प देऊन शहा यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्याची प्रेरणा सत्ता नव्हती, तर अत्यांचारांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी, स्वधर्माप्रती निष्ठेसाठी, स्वभाषेला महत्वाचे स्थान देण्यासाठी आणि स्वराज्य स्थापनेसाठी त्यांचे जीवन होते. भारतावर कुणीही अत्याचार करू शकत नाही हा संदेश त्यांनी स्वराज्य स्थापना करून जगाला संदेश दिला. त्याचे कार्य घरोघरी पोहोचविण्यात शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांचे मोठे योगदान आहे. जगभरातील अधिकृत दस्तावेजाचे संकलन करून नव्या पिढीसाठी शिवचरित्राची रचना करून त्यांनी नव्या पिढीवर मोठे उपकार केले आहे. महाराज नसते तर, पाकिस्तानची सीमा शोधायला फार दूर जायला लागले नसते, कदचित आपल्या घराबाहेरच पाकिस्तानची सीमा सापडली असती, असे यशवंतराव चव्हाण यांनी म्हंटले आहे, असे शहा यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
गृहमंत्री अमित शाह पुढे म्हणाले की, स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यासाठी शिवाजी महाराज आग्रही होते. आपल्या संस्कृती आणि धर्मानुसार शासन चालावे असे प्रयत्न त्यांनी केले. स्वभाषेत राजव्यवहार कोष सर्वप्रथम तयार करण्याचे कार्य शिवछत्रपतींनी केले. स्वराज्यासोबत सुराज्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी शेतकर्यांसाठी विविध योजना राबवून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचे कार्य केले. मराठी नौसेनेचे संस्थापक म्हणूनही त्यांचे कार्यही महत्वाचे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवाजी महाराजांनी कायम जनतेच्या कल्याणाचा विचार केला. त्यांच्यासारख्या राजा जगात सापडणार नाही. बाळासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, त्यासाठी 50 कोटीचा निधी सरकारने दिला आहे. शिवसृष्टी उभारण्यात येत असल्याने शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिवसृष्टी प्रकल्प महाराजांचा इतिहास आणि महाराजांचे तेज पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त आहे. आपला स्वाभीमान सतत तेवत रहावा आणि आपल्याला अध:कारातून प्रकाशाकडे कुणी नेले हे आपल्याला समजावे यासाठी बाबासाहेबांनी शिवसृष्टीची निर्मिती केली. बाबासाहेबांनी 50 वर्ष शिवसृष्टीचे स्वप्न आपल्या उराशी बाळगले. प्रास्ताविक जगदीश कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.
योग्य व्यक्तीच्या हातातून शिवसृष्टिचं उद्घाटन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केवळ छत्रपतींना आदर्शच मानतात असं नाही, तर छत्रपतींच्या जीवनावर सातत्याने त्यांनी संशोधन केलं आहे आणि मराठा साम्राजाच्या संदर्भात वेगवेगळे दस्ताऐवज प्राप्त करून, महाराजांपासून ते वसईच्या संधीपर्यंत ज्या काही घटना आहेत, त्या घटना लेखणीबद्ध करून ते स्वत: यावर एक पुस्तक लिहित आहेत. त्यामुळे खरे शिवप्रेमी असलेले अमित शाह ज्यांनी महाराजांची जी संकल्पना आहे स्वधर्म, स्वभाषा आपल्या संस्कृतीचा या ठिकाणी पुरस्कार करणं, हे खर्या अर्थाने आपल्या जीवनात साकारलेलं आहे. गृहमंत्री म्हणूनदेखील पुन्हा एकदा काश्मीरपासून ते पूर्वोत्तर पर्यंत सगळीकडे महाराजांचाच आशीर्वाद घेऊन, त्यांचच तेज घेऊन या ठिकाणी काम करत आहेत. म्हणून मला असं वाटतं की अतिशय योग्य व्यक्तीच्या हातून आज आपण, या शिवसृष्टीचं उद्घाटन करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
राज्याभिषेकाला जाताना महाराजांच्या हातात शिवधनुष्य
व्यासपीठावरील पाहुण्यांचा सन्मान करताना निवेदक राहुल सोलापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करताना शिवधनुष्य उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाला जात असताना, त्यांच्या हातात शिवधनुष्य होते. आता शिवधनुष्य शिंदे यांच्या हातात आहे असा उल्लेख करताच उपस्थितांसह व्यासपीठावर चांगलाच हशा पिकला.
शिवसृष्टी अशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल
शिवसृष्टीचा प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून केंद्रीय मंत्री शाह म्हणाले, पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग साकारण्यात आले आहेत. इथं भेट देणारा शिवाजी महाराजांच्या जीवनातून मिळणारा संदेशही सोबत घेवून जाईल. शिवसृष्टी अशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.