नागपूर : विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी सलीम कुत्ता प्रकरणाचे पडसाद उमटले. याप्रकरणी विरोधकांनी मंत्री गिरीष महाजनांवर आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगलेच खडसावले आहे. कुठलाही संबंध नसताना एखाद्या मंत्र्यावर बेछुट आरोप केल्याने विरोधकांनी माफी मागायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे सभागृहात आल्यामुळे असे विषय आले असावेते, असा टोलाही त्यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गिरीष महाजन ज्या लग्नात गेले होते ते लग्न नाशिकचे मुस्लीम धर्माचे सर्वात मोठे धर्मगुरु शहर ए खातिब यांच्या पुतण्याचं होतं. गिरीष महाजन हे तिथे पालकमंत्री म्हणून गेले होते. शहर ए खातिब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. ज्या मुलीशी लग्न झाले तिच्या परिवाराचाही दाऊदशी कुठलाही संबंध नाही आणि तसा आरोपही नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरे सभागृहात आल्यामुळे कदाचित याठिकाणी अशा प्रकारचे विषय आले असतील. परंतू, एखाद्या मंत्र्यावर असे आरोप लावताना त्याची खातरजमा केली नाही. अशीच तडफड जेव्हा ते बडगुजर सलीम कुत्तासोबत नाचतात तेव्हा तुम्ही का दाखवली नाही? खरंतर कुठलाही संबंध नसताना मंत्र्यावर असे बेछुट आरोप केल्याने त्यांनी माफी मागायला हवी. त्यांनी केलेले आरोप हे पुर्णपणे खोटे आहेत," असेही ते म्हणाले आहेत.