नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात १० इलेक्ट्रिक वातानुकूलित डबलडेकर बसगाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात नवी मुंबईकरांनाही इलेक्ट्रिकल डबलडेकर बसमधून प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे. २०२२ पासून परिवहनच्या वतीने इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी प्रयत्न सुरू होते. त्यानुसार या बसगाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या १० इलेक्ट्रिक बसगाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. नवी मुंबईतील पर्यटनाच्या दृष्टीने या बसगाड्यांचा विचार करण्यात आला आहे.
उत्पन्नवाढीच्या दृष्टिकोनातून एनएमएमटीच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आधुनिक शहराला शोभेल अशी परिवहन सेवा देण्यासाठी शहरात डबलडेकर बसगाड्या चालवण्याचा निर्णय एमएमएमटी प्रशासनाने घेतला आहे. अशा 10 डबलडेकर बसगाड्यांसाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे. या डबलडेकर बसच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना नवी मुंबई दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. नवी मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी ही बस सुरू करण्याचे परिवहनचे प्रयोजन आहे. एका बसगाडीची किंमत एक कोटी 90 लाख रुपये आहे. बस तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार डिसेंबरअखेर या बसगाड्या दाखल होणार आहेत.
सध्या एका इलेक्ट्रिक बसमधून प्रति किमी ४० रुपये उत्पन्न एनएमएमटीला मिळत आहे. या डबलडेकर बसगाडीमधून हे उत्पन्न सरासरी ६० ते ६५ रुपयांपर्यंत नेता येईल. त्यातून उत्पन्नवाढीचा चांगला पर्यायही मिळेल. इलेक्ट्रिक डबलडेकर बस डिसेंबरअखेर व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दाखल होतील. त्यामुळे नवीन वर्षात नवी मुंबईकरांना डबलडेकर बसगाडीमधून प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे.
– राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका