लोकप्रतिनिधींसाठी संघटन, संवाद, योग, समरसता, तणाव व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
- छत्तीसगढमधील राजकीय कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसाठी ३-दिवसीय शिबिर संपन्न
12-Jun-2025
Total Views |
मुंबई : लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी सर्व आवश्यक गुणांनी संपन्न असणे अत्यंत आवश्यक आहे! त्याशिवाय ग्रामपंचायत स्तरापासून संसदेपर्यंत कोणत्याही पातळीवरील कामकाज लोकोपयोगी होऊ शकत नाही. एकविसाव्या शतकात घोडदौड करणाऱ्या भारताला हे अतिशय गरजेचे आहे. ही गरज ओळखून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी गेली चार दशके इतर अनेक समाजघटकांप्रमाणे लोकप्रतिनिधींनाही प्रशिक्षण देत आहे. गेले ३ दिवस छत्तीसगढमधील कुरूद विधानसभा क्षेत्रातील राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी संस्थेच्या ठाणे जिल्ह्यातील उत्तनमधील ज्ञान नैपुण्य केंद्रात प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. एकूण ५४ कार्यकर्ते व पदाधिकारी शिबिरात सहभागी झाले होते.
गर्दी आणि संघटन यातील फरक लक्षात घेणे आवश्यक!
पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रात आमदार अॅड पराग आळवणी यांनी उपस्थितांना संबोधित केले. नंतर संघटनाचे महत्त्व अधोरेखित करताना अॅड संदीप लेले म्हणाले, “गर्दी व संघटन यांतील फरक लक्षात घ्यायला हवा. रेल्वे स्थानकावर असते ती गर्दी, तर एखाद्या संस्थेसाठी समान ध्येयाने प्रेरित होऊन काम करते ते संघटन. राजकीय क्षेत्रात्तील अशा कार्यात पुढील कामाचे नियोजन, नोकरशाहीचे आकलन, प्रत्येक बूथपर्यंत पोहोचण्याची रणनीती, सामाजिक व आध्यात्मिक संस्थांशी समन्वय, लोकांशी नियमित संपर्क व संघकार्य हे महत्त्वाचे मुद्दे आहेत.” श्री. माधव भांडारी यांनी जनसंघ ते भाजपा अशी पार्टीची विकासयात्रा उलगडून सांगितली, तर श्री. जमीर मोकाशी यांनी सांघिक कार्य, संघ बांधणी व संवाद कौशल्यांवर मार्गदर्शन केले.
योगाभ्यास, एआयचे धडे व मुंबई दर्शन
प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रबोधिनीच्या निसर्गरम्य वातावरणात श्री. संजय इनामदारांच्या मार्गदर्शनाखाली योगासनांनी झाली. दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्याच्या मनाची जडणघडण यांवर भाष्य केले, तर लेखक व संपादक श्री. रवींद्र गोळे यांनी सामाजिक समरसतेवर विचार मांडले. श्री. हरीओम शर्मा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघपरिवार याबाबत विचार मांडले आणि डॉ. चेतन नेरकर यांनी तणाव व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी श्री. दीपक करंजीकर यांनी नेतृत्वविकास व वेळेचे नियोजन यांचा आढावा घेतला. श्री. आदित्य यादव यांनी समाज माध्यमे व एआय यांचा जनसंपर्कासाठी सुयोग्य वापर करण्याचे महत्त्व सांगितले. श्री. राजाभाऊ मुळे यांनी समारोपाचे भाषण केले. तद्नंतर चौथ्या दिवशी सर्व सहभागींनी मुंबई दर्शन सहलीदरम्यान देशाच्या आर्थिक राजधानीचे जवळून दर्शन घेतले.
शिबिरात सहभागी झालेले श्री. लोकेश्वर सिन्हा यांनी समाधान व्यक्त करताना म्हटले, “आम्हाला या शिबिरात नवीन विषय शिकायला मिळाले. स्वतःहून समाज माध्यमांवर मजकूर निर्माण करण्याचे मार्गदर्शन मिळाले.” त्याचप्रमाणे श्री. सुरेश अगरवाल म्हणाले, “गेल्या तीन दिवसांत आम्हाला नेतृत्वविकासाचे महत्त्व व ते साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती मिळाली.” शिबिराचे उद्दिष्ट स्पष्ट करताना श्री. विनय मावळणकर, कार्यक्रम विभाग प्रमुख, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, म्हणाले, “भावी लोकप्रतिनिधींना व्यवस्थापनाची तत्त्वे, समाजभान, नेतृत्वगुण व अन्य कला आणि निवडणुकांच्या वेळी करायचे काम यांबद्दल जाणीव निर्माण व्हावी हा अशा शिबिरांचा मुख्य हेतू आहे. छत्तीसगढमधील कुरुद विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चंद्राकार यांच्या पुढाकाराने गेल्या २० वर्षांत नवनव्या कार्यकर्त्यांसाठी १२ शिबिरे झाली.”