नागपूर : कर्जत-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी शनिवार, १६ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सुरेश लाड हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात. मात्र, अलिकडे त्यांच्यातील स्नेह कमी झाला. लाड यांनी अनेकदा जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळेच राष्ट्रवादीतील उठावानंतरही त्यांनी अजित पवारांना साथ न देता शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
मात्र, शरद पवार गटाची सद्यस्थिती लक्षात घेऊन त्यांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शनिवारी नागपुरात सुरेश लाड यांचा भाजप प्रवेश झाला.