नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून लोकसभेत कामकाज सुरू असताना सुरक्षा व्यवस्थेला बगल देत दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उड्या मारल्या. सभागृहात धूर पसरविण्यात आला. यावेळी खासदारांनी या हल्लेखोरांना पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. दरम्यान, याविषयी उच्चस्तरीय चौकशीस सुरूवात झाली आहे.लोकसभेत दुपारी १ वाजून १ मिनिटांनी शून्य प्रहराचे कामकाज सुरू असताना ही घटना घडली आहे. तालिका सभापती राजेंद्र अग्रवाल हे लोकसभेत शून्य प्रहराचे कामकाज चालवत होते. मालदा उत्तरचे भाजप खासदार खगेन मुर्मू आपले विचार मांडत होते. त्यानंतर दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली.
निळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या तरुणाने खासदारांच्या आसनांवर उड्या मारायला सुरुवात केली. सुमारे तीन रांगा पार करून तो अध्यक्ष आसनाजवळ दिशेने चालू लागला. गोंधळाच्या वातावरणात खासदारांनी धाडस दाखवून या हल्लेखोरास पकडले. त्याचवेळी हल्लेखोराने आपल्या बुटामधून धूर पसरविणरा पदार्थ फवारला. त्यानंतर लोकसभेतील मार्शलनी हल्लेखोरांवा पकडून त्यांना सभागृहाबाहेर नेले. लोकसभेतील घटनेपूर्वी वेळापूर्वी संसदेबाहेर दोन जण निदर्शने करताना दिसले होते. त्यात एक महिलाही होती. त्यांच्याकडेही रंगीत धूर पसरविणारा पदार्थ होता. तो फवारतानाच त्यांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी संसद मार्ग पोलिस स्थानकामध्ये चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सागर शर्मा आणि मनोरंजन नामक हल्लेखोरांनी लोकसभेत गोंधळ घातला तर नीलम नामक तरुणी आणि अमोल शिंदे नामक तरूणाने संसदेबाहेर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. हे चार हल्लेखोर आपल्या अन्य दोन साथीदारांसह गुरुग्राम येथे काही दिवसांपासून वास्तव्यास असल्याचे समोर आले असून दिल्ली पोलिस पुढील तपास दिल्ली पोलिस करत आहेत. खासदारांच्या शिफारसपत्रावर त्यांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत प्रवेश मिळवला होता.दरम्यान, लोकसभेच्या महासचिवांनी सुरक्षेच्या आढाव्यासाठी गृह मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. पुढील आदेशापर्यंत प्रेक्षक दालनासाठी कोणतेही पास जारी केले जाणार नाहीत. खासदारांच्या वैयक्तिक सहाय्यकांना पास जारी करण्यासही प्रतिबंध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चौकशीस सुरूवात
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील प्राथमिक तपासातील तपशिलांवरून असे दिसून आले आहे की नीलम आणि अमोल (संसदेच्या इमारतीच्या बाहेर पकडले गेलेले) - दोन लोक मोबाईल फोन बाळगत नव्हते. त्यांच्याकडे कोणतीही पिशवी किंवा ओळखीचा पुरावा नव्हता. ते स्वतःहून संसदेत पोहोचले आणि कोणत्याही संघटनेशी संबंध नसल्याचा त्यांचा दावा आहे. त्याचवेळी या घटनेनंतर दिल्लीचे पोलिस आयुक्त आणि सीआरपीएफचे महासंचालक संसदेत पोहोचले होते. त्याचप्रमाणे इंटेलिजन्स ब्युरोचे पथक या हल्लेखोरांच्या मूळ गावी तपासासाठी रवाना झाले आहेत.
लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी चार वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावून लोकसभेत घडलेल्या घटनेविषयी चर्चा केली. यावेळी सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करून काही सूचना केल्या. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येणार असून संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेचीही समीक्षा करण्यात येईल, असे ओम बिर्ला यांनी म्हटले आहे.