राष्ट्रवादी काँग्रेसप्रकरणी पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी
09-Nov-2023
Total Views | 55
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी अजित पवार गटाने सादर केलेले प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा युक्तीवाद शरद पवार गटातर्फे गुरुवारी करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या बंडानंतर पक्ष आणि पक्षचिन्हाच्या हक्काविषयी केंद्रीय निवडणूक आयोगात प्रकरण गेले आहे. याप्रकरणी अजित पवार आणि शरद पवार गटातर्फे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगामध्ये गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये शरद पवार गटातर्फे युक्तीवादास प्रारंभ झाला आहे, पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
शरद पवार गटातर्फे वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी अजित पवार गटातर्फे बोगस प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आल्याचे सुनावणीनंतर बोलताना सांगितले. ते म्हणाले, अजित पवार यांच्या गटाकडून मृत व्यक्ती, अल्पवयीन व्यक्तींच्या नावे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्तित्वातच नसलेल्या पदांच्या पदाधिकाऱ्यांच्या नावे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात आली आहेत. अजित पवार गटाने अशा २४ प्रकारांमध्ये बोगस प्रतिज्ञापत्रे दाखल केली असून त्याविरोधात आयोगाकडे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असल्याचेही सिंघवी यांनी नमूद केले आहे.