संपूर्ण जगाचे लक्ष ज्या बचावकार्याकडे होते, त्या उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यातून ४१ मजुरांना परवा सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण होते. यानिमित्ताने असंभव वाटणार्या आव्हानांपुढे हार न मानता केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे आपुलकी व्यवस्थापनही तितकेच लक्षवेधी ठरले.
संपूर्ण देशात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना, उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे दोन पदरी बोगद्याचा काही भाग कोसळून ४१ मजूर बोगद्यात अडकले. सिल्क्यारा आणि दांडलगाव यांना जोडणारा हा ४.५ किमी लांबीचा बोगदा, ‘चार धाम’ महामार्ग प्रकल्पाचा भाग. उत्तरकाशी ते यमुनोत्रीदरम्यानचे अंतर २६ किमीने कमी करणारा. १२ तारखेला मजूर बोगद्यात अडकून पडल्याचे वृत्त आले आणि संपूर्ण प्रशासन त्यांच्या बचावकार्यासाठी अथकपणे कामाला लागले. विविध सरकारी यंत्रणांच्या पथकांनी खोदाई यंत्राचा वापर करत राडारोडा, ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. काही प्रमाणात यश मिळालेही. मात्र, नंतर त्याला मर्यादा आल्या. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी १२ तारखेपासून अथकपणे परिश्रम घेण्यात आले. मानवतावादी दृष्टिकोनातून, बचावकार्य हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. प्रत्येक कामगाराचा जीव लाख मोलाचा आहे, असे समजून त्यांच्या बचावासाठी काळाविरोधात ही शर्यत लढली गेली. प्रत्येक सेकंद इथे महत्त्वाचा होता. प्रतिकूल हवामान तसेच उद्भवलेली तांत्रिक आव्हाने यांचा यशस्वीपणे सामना करत, अखेर मजुरांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी स्वतः या प्रकरणी अखंडितपणे बचाव पथकांशी संपर्क ठेवला होता. पुष्कर सिंह धामी हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहिले, हे विशेष.
करुणा, धैर्य आणि खंबीरपणा या मानवी भावभावनांचे प्रतिबिंब उत्तरकाशी येथील घटनेत पाहायला मिळाले. बचाव मोहिमेने आपत्ती सज्जता तसेच सुरक्षा उपायांचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. बांधकाम सुरू असताना बोगदा कोसळणे, ही तशी अपवादात्मक बाब. म्हणूनच सुरक्षा प्रोटोकॉल तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे कठोर पालन करून देण्याची गरज ती ठळकपणे मांडते. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणा योग्य त्या खबरदारी अर्थातच घेतील. बचाव पथकाने आपत्ती व्यवस्थापनातील तंत्रज्ञानाची गरजही दाखवून दिली आहे. या बचावकार्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी तसेच तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी ड्रोनचा प्रभावीपणे वापर करण्यात आला. म्हणूनच हे कार्य जलद गतीने झाले. बचावकार्य यशस्वी झाल्याचा आनंद देशभरात साजरा केला, हे विशेष. भारतीय म्हणून देशातील प्रत्येक नागरिक या घटनेकडे लक्ष ठेवून होता. प्रार्थना करत होता. म्हणूनच मजुरांची सुटका होताच, प्रत्येकाने आनंद साजरा केला.
आपत्ती व्यवस्थापनात संसाधनांचे नियोजन, संघटन तसेच समन्वय यांचा समावेश होतो. आपत्तीचा सामना करण्यासाठी विशेष योजना केल्या जातात. संभाव्य धोके ओळखून धोका कमी करणे, आपत्ती व्यवस्थापनातील एक महत्त्वाच भाग. शोध आणि बचावकार्य, वैद्यकीय साहाय्य, अन्न-पाणी यांचा पुरवठा करणे यात अपेक्षित आहे. उत्तरकाशी घटनेत मजूर अडकल्याची घटना घडल्यानंतर प्रशासन लगेचच सक्रिय झाले आणि बचावकार्याला गती दिली गेली, जी अडकलेल्या मजुरांची सुखरूप सुटका करण्यास महत्त्वाची ठरली. अडकलेल्या कामगारांच्या मानसिक स्वास्थ्यावर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आलेला यंत्रमानवाचा वापर प्रभावी ठरला. तब्बल १७ दिवसांनंतर बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुटका करण्यात आल्यानंतरच यंत्रणा थांबल्या, तोपर्यंत बचावकार्याचे प्रयत्न थांबवले गेले नाहीत.
आमच्यासाठी सुरुवातीचे २४ तास कठीण होते. श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. मात्र, त्यानंतर आम्हाला अन्नपुरवठा करण्यात आला. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांनी अखंडितपणे राबवलेल्या मोहिमेमुळेच आम्ही सुखरूप बाहेर आलो, ही प्रतिक्रिया सर्व काही सांगून जाते. कठीण परिस्थितीत कसे नेतृत्व करावे, याचाही एक आदर्श वस्तुपाठ त्यांच्यातील एकाने दाखवून दिला, ज्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्वतः कौतुक केले आहे. संपूर्ण पथकाचे मनोधैर्य कायम राखण्यात गब्बरसिंग नेनी यांनी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोगदातज्ज्ञ ख्रिस कूपर, अर्नोल्ड डिक्स यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’ या सर्वांनीच ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून अविरत प्रयत्न केले. संपर्क कायम राहावा, यासाठी ‘बीएसएनएल’ने विशेष यंत्रणा उभारली, हे विशेष. त्याने संपर्क आणि मनोबल कायम राहण्यात मोलाचे योगदान दिले.
उत्तरकाशीतील सिल्क्यारा येथील हा बोगदा १.५ अब्ज डॉलर खर्चून तयार केल्या जाणार्या ८९० किमी अंतराच्या ‘चारधाम’ प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पा अंतर्गत हिमालयातील राज्यांमधील प्रमुख हिंदू धार्मिक स्थळे पक्क्या रस्त्यांनी जोडली जात आहेत. चार जिल्ह्यांत हा प्रकल्प राबवला जात असून, त्याअंतर्गत नव्याने रस्ते उभारणे, रस्त्यांची पुनर्बांधणी करणे, बोगदे उभारणे, उड्डाणपूल तसेच लहान पुलांच्या माध्यमातून सध्याचे महागार्ग रुंद करणे, अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. १२ महिने या भागात चांगली कनेक्टिव्हिटी मिळावी, हा त्यामागचा उद्देश. ‘चारधाम’ प्रकल्प हा आवश्यक असाच आहे. गेल्या ६५ वर्षांत देशात पायाभूत सोईसुविधा उभ्या केल्या गेल्या नाहीत. म्हणूनच अलीकडच्या काही वर्षांत त्यांच्या उभारणीसाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
कितीही कठीण परिस्थिती असली, तरी मनोबल कायम राहिले पाहिजे, हा संदेश या बचावकार्याने दिला. त्याचवेळी केंद्रातील सरकारला समाजातील सर्व घटकांबद्दलची काळजीही यातून समोर आली. भाजपला कामगारांच्या हिताची पर्वा नाही, असा आरोप देशातील उरल्यासुरल्या डाव्यांकडून केला जातो. कामगारांचे हित केवळ आम्हालाच कळते, ही त्यांची मानसिकता. या डाव्या मानसिकतेला सणसणीत चपराक या बचावकार्याने लगावली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यादरम्यान बचावकार्याच्या प्रगतीचा आढावा घेत होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामीही प्रसंगी घटनास्थळी उपस्थित होते. हे ४१ जण ऐन दिवाळीच्या पहाटे बोगद्यात अडकले होते. आता त्यांची सुरक्षितपणे सुटका झाली आहे. ते जेव्हा घरी परततील, तेव्हा त्यांच्या घरी पुन्हा एकदा दिवाळी साजरी होईल.