जागतिक शांततेची क‘तार’

    28-Nov-2023
Total Views | 122
qatar

कतार हा पश्चिम आशियातील २७ लाख लोकसंख्येचा छोटासा देश. पण, आज जगभरातील वादविवादांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी जागतिक महासत्तांनासुद्धा याच देशाची मदत घ्यावी लागते. गॅस आणि तेलाच्या साठ्यातून जगातील श्रीमंत देशांच्या यादीत जाऊन बसलेला कतार आपल्या अनोख्या कूटनीतीमुळे जगात एक विशेष स्थान राखून आहे, त्याचाच घेतलेला हा आढावा...

इस्रायल-‘हमास’ युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेच्या नेतृत्वात पाश्चिमात्य देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला, तर जगभरातील मुस्लीम देशांनी ‘हमास’च्या कारवाईचा निषेध केला नाही. पण, पश्चिम आशियातील एक प्रमुख मुस्लीम देश असूनसुद्धा कतारने या युद्धात एक रचनात्मक भूमिका पार पाडली. इस्रायलच्या कारवाईची निंदा करण्याबरोबरच कतारने इस्रायल आणि ‘हमास’मध्ये युद्धविराम करण्यासाठी मध्यस्थाचीसुद्धा भूमिका बजावली. कतारच्या मध्यस्थीमुळेच इस्रायल-‘हमास’मध्ये बंधक-ओलिसांच्या अदला-बदलीशीसंबंधित करार होऊ शकला. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यश जो बायडन यांनीसुद्धा कतारच्या अमिरांचे आभार मानले. ही घटना कतारच्या कूटनीतिक ताकदीचा अंदाज घेण्यासाठी पुरेशी आहे. कतार मागच्या दोन दशकांपासून एक मध्यस्थ म्हणून जागतिक राजकारणात उदयास आला. पण, यामागे कतारचाही भू-राजकीय स्वार्थ. कतार हा सुन्नीबहुल देश. राजेशाही असलेल्या या देशाचे सध्याचे प्रमुख आहेत, तमीम बिन हमाद अल थानी. सुन्नीबहुल देश असतानासुद्धा कतारचे इराणशी चांगले संबंध आहेत. त्याचबरोबर कतार हा सौदी अरब आणि त्यांच्या गटाने दहशतवादी संघटना घोषित केलेल्या ‘मुस्लीम ब्रदरहूड’चासुद्धा पाठीराखा आहे.

त्याचबरोबर कतार सरकारच्या मालकीची ‘अल-जझिरा’ वृत्तवाहिनीसुद्धा अरब देशांमध्ये कतारचा प्रपोगंडा प्रसारित करते. यामुळे सौदी अरब गटातील सुन्नीबहुल देशांचे कतारशी तणावपूर्ण संबंध आहेत. पण, कतार हा अमेरिकेचा एक विश्वासार्ह रणनीतिक भागीदार. अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वांत मोठा लष्करी तळदेखील कतारमध्येच. त्याचबरोबर ‘हमास’ आणि ‘तालिबान’सारख्या दहशतवादी संघटनांची राजकीय कार्यालयेसुद्धा कतारची राजधानी असलेल्या दोहामध्येच आहेत. त्यामुळे कतार हा असा एकमेव देश आहे, ज्याचे इराण, अमेरिका, इस्रायल, हमास, तालिबानसोबत चांगले संबंध आहेत. आता सगळ्यांसोबतच चांगले संबंध असल्यामुळे कतारला साहजिकच मध्यस्थाची भूमिका बजावणे सोपे जाते.२०१२ साली ‘हमास’ने दोहा येथे आपले राजकीय कार्यालय सुरु केले. अमेरिकेने ‘हमास’चे कार्यालय बंद करण्यासाठी कतारवर दबाव आणण्याचा प्रयत्नदेखील केला. पण, या दबावाला बळी न पडता, कतारने हे कार्यालय शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवादाचे माध्यम म्हणून काम करेल, असा दावा त्यावेळी केला. आज इस्रायल आणि अमेरिकेला या कार्यालयाचे महत्त्व समजलेले दिसते.

युद्ध सुरू असताना कतारमधील या कार्यालयामुळेच काही दिवसांची का होईना युद्धबंदी शक्य झाली. पण, या कार्यालयाच्या आडून ‘हमास’चे प्रमुख नेते ज्यांच्यावर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप आहे, अशा नेत्यांना राजकीय शरण देण्यात आलेली आहे. इस्रायल-‘हमास’ शांतीवार्तावेळी सुद्घा कतारने इस्रायल समोर त्यांच्या देशात कोणत्याही ‘हमास’च्या नेत्याच्या हत्येचा प्रयत्न होणार नाही, असे आश्वासन घेतल्याचा अहवाल एका फ्रेंच वृत्तपत्राने प्रकाशित केला आहे.तालिबानच्या बाबतीतसुद्धा कतारची हीच भूमिका आहे. कतार हा एकमेव देश होता, ज्याने २०१३ मध्ये तालिबानला आपल्या देशात राजकीय कार्यालये उघडण्याची परवानगी दिली होती. याचं कार्यालयातून २०२० मध्ये अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार झाला. या करारामुळेच अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही घटनांकडे पाहिल्यास कतार जागतिक शांततेसाठी काम करत आहे, असा वरकरणी भास होणे साहजिकच. पण, टीकाकर कतारवर आपला जागतिक पातळीवर प्रभाव वाढवण्यासाठी युद्धांचा उपयोग करतो, असा आरोप करतात. काही अहवालांमध्ये, कतारवर युद्धांना ‘फंडिग’ करण्याचा सुद्धा आरोप करण्यात आला. पण, पाश्चिमात्य देशांनी कतारवरील ही कृपादृष्टी हटवून वक्रदृष्टी केली, तर मात्र जागतिक शांततेची ही क‘तार’ तुटल्याशिवाय राहणार नाही!

- श्रेयस खरात


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121