वयं पंचाधिकं शतम्

    02-Sep-2025
Total Views |


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नावरो यांनी रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवल्याने भारतावर पुन्हा टीका केली. मात्र, यावेळी रशियाकडून तेलखरेदीमुळे ब्राह्मण समाजाला विशेष फायदा होत असल्याचा अजब दावाही त्यांनी केला. नावरो यांची ही टीका अनाकलनीय अशीच! वास्तविक पाहता, रशियाकडून तेलखरेदी हा सार्वभौम भारताचा निर्णय आहे. या निर्णयामागे भारतातील अमूक एक जातीला फायदा होत असल्याची टीका अमेरिकेने करणे, हे सर्वथा अनुचितच. महत्त्वाचे म्हणजे, भारताच्या सामाजिक बाबींमध्ये टीका करण्याचा अमेरिकेला अधिकारही नाही. आपला देश विविध जातींमध्ये विभागलेला आहे. त्यामुळे अनेकदा या जातींमध्ये अनेक झगडे निर्माण होतात. हे सारेच मतभेद असले, तरी मनभेदाला भारतीयांमध्ये स्थान नाही. राष्ट्रासाठी देशातील सर्वच भारतीय एकत्र उभे राहतात. असे असतानाही आजवर कधीही न केलेली आगळीक अमेरिकेने केली. त्यामुळे भारतीयांनीही त्यांच्या भूमिकांचा पुन्हा विचार करणे आवश्यक आहे.

यासाठी महाभारतातील एक प्रसंग सदैव मार्गदर्शक ठरतो. महाभारतातील एका प्रसंगात, कौरव आणि गंधर्व यांच्यात मोठा युद्धप्रसंग उभा राहतो. त्यावेळी कौरवांना त्या युद्धात मदत करण्याची विनंती घेऊन काही सैनिक पांडवांकडे येतात. सुरुवातीला भीम त्यांना मदत करण्यास नकार देतो. परंतु, युधिष्ठिराच्या सूचनेनुसार पांडव एकत्र येऊन कौरवांना गंधर्वांविरुद्ध मदत करतात आणि पराभव टाळतात. त्यावेळी धर्मराजाच्या मुखी असे वाक्य आहे ‘वयम् पंचाधिकम् शतम्|’ या प्रसंगातून आपल्याला शिकवण मिळते म्हणजे, ‘आपण पाच नाही, १०५ आहोत.’ आपले मतभेद असले, तरीही योग्य वेळेला आपल्याला एकत्र येऊन देशहिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे.

भारत आजही जातीजातीच्या भांडणांनी विभक्त आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, कायस्थ, दलित, आदिवासी किंवा इतर कोणतीही समाजघटक आपल्यात नेहमीच मतभेद राहिले आहेत. पण, याच मतभेदांवर परदेशी शक्ती भाष्य करून टीका करत असेल, तर ते निंदनीयच. आपण घरात कितीही भांडलो, तरी ती भांडणे आपल्या घरातीलच आहेत. त्याचा गैरफायदा घेण्याचा अधिकार कोणत्याही बाह्य शक्तीला नाही.

पीटर नावरो यांनी असे ब्राह्मण समाजाला लक्ष्य करणे, हे सहज नाहीच. कारण, आजवरच्या इतिहासात कधीही अमेरिकेने थेट एका समाजाला लक्ष्य केले नाही, त्यामुळे भारतीयांना आता अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. पण, अमेरिकेची भारतातील धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याची जुनीच खोड. दरवर्षी भारतातील अल्पसंख्याकांचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात असल्याचा अहवालही त्याचेच द्योतक. त्यातही अमेरिकेला भारतात धर्मद्वेष, जातीभेदाचा नाहक बाऊ करायचा असेल, तर तेथे होणार्या वर्णद्वेषाला काय म्हणावे?

पीटर नावरो यांचे वक्तव्य निश्चितच भारताच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे. तेलखरेदीसारखे निर्णय राष्ट्रीय अर्थव्यवस्था, ऊर्जासुरक्षा आणि जागतिक बाजारपेठेतील स्थिरतेवर आधारित असतात. यात कोणत्याही बाहेरील देशाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. अमेरिका आज जगासमोर मुक्त व्यापार आणि लोकशाहीचे मुखवटे लावून वावरते. पण, प्रत्यक्षात तिचे स्वार्थकेंद्रितच आहे. ट्रम्प प्रशासनाने लादलेले आयातशुल्कही अमेरिकेच्या व्यापारी स्वार्थाचाच भाग!

आज अमेरिकन अर्थव्यवस्था बाहेरून कितीही चमकदार दिसत असली, तरी आतून ती गंभीर संकटांनी ग्रस्त आहे. महागाई सातत्याने डोके वर काढत असून, राष्ट्रीय कर्जाचे ओझे ऐतिहासिक पातळीवर गेले आहे. बेरोजगारी व सामाजिक असंतोषही वाढत आहे. डॉलरच्या वर्चस्वाला पर्याय शोधण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत. ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रात चीन, भारत, रशिया यांसारखे देश स्वतःचे स्वतंत्र मार्ग शोधत आहेत. त्यामुळे अमेरिकेचे ‘दादागिरीचे साम्राज्य’ आता दिवसेंदिवस अस्थिर होत असून, त्यामुळेच अमेरिकेचा विवेक ढासळत चालला आहे.

भारतात मतभेदांचा बाहेरच्या कोणीही त्याचा फायदा घ्यावा, हे सहन करण्यासारखे नाही. भारताची खरी संस्कृती ही एकतेची आहे. घरात भांडण झाले, तरी राष्ट्रीय हिताच्या वेळी आम्ही सारे भारतीय म्हणूनच एकत्र उभे राहतो. भारतीयांची हीच ताकद अमेरिकेच्या दादागिरीसमोर भारताला अजिंय करते!

कौस्तुभ वीरकर