
१९७१ हे वर्ष भारतीय उपखंडाच्या इतिहासात एक निर्णायक टप्पा ठरले. पाकिस्तानच्या लष्कराने त्या काळात पूर्व पाकिस्तानात केलेल्या अमानुष नरसंहारामुळे लाखो निरपराध लोकांचे प्राण गेले, हजारो महिलांवर अत्याचार झाले आणि अखेर भारताच्या निर्णायक हस्तक्षेपातून बांगलादेशाचा जन्म झाला. त्या संघर्षातील रक्ताचे डाग आजही पुसले गेलेले नाहीत. बांगलादेशातील सर्वसामान्य जनतेच्या स्मृतीत ही वेदना कायम आहे. तरीसुद्धा, बांगलादेशच्या आजच्या राजकीय नेतृत्वाने या इतिहासाकडे पाठ फिरवत पाकिस्तानसारख्या कोत्या मनोवृत्तीशी संग मैत्रीचा प्रयत्न केला. त्यासाठी १९७१च्या कृत्याबद्दल पाकिस्तानने माफी मागावी, असे युनूस यांनी म्हटले. पाकिस्तानने बांगलादेशची मैत्री स्वीकारली. मात्र, केलेल्या नरसंहाराविषयी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला.
बांगलादेशाचे अंतरिम प्रमुख आणि ‘नोबेल’ पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानशी जवळीक साधण्याचा केलेला प्रयोग म्हणजे, भारताविरोधात सामाईक आघाडी तयार करून उपखंडात नवे समीकरण उभे करण्याचे हे स्वप्न होते. मात्र, पाकिस्तानने पहिल्याच टप्प्यात १९७१ सालच्या नरसंहाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यास स्पष्ट नकार दिला आणि या संवादाची दारे बंद केली. परिणामी, युनूस यांचे स्वप्न दिवास्वप्न ठरले.
युनूस यांची भूमिका येथे विशेष धक्कादायक अशीच! कारण, एकीकडे बंगाली अस्मितेचे मन जिंकण्यासाठी पाकिस्तानसमोर माफी मागण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला, तर दुसरीकडे वंगबंधूंसारख्या बांगलादेशच्या स्वातंत्र्ययोद्ध्यांचा अपमान करण्याचे पातकही केले. त्यासाठी ते कोणाची आणि कधी माफी मागणार, हा प्रश्नच आहे. मात्र, आजची राजकीय परिस्थिती पाहता लवकरच ती वेळ त्यांच्यावर येऊ शकते. बांगलादेशाने वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून गेल्या दोन दशकांत काही प्रमाणात प्रगती केली होती. परंतु, मोहम्मद युनूस यांच्याकाळातील भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि राजकीय अस्थिरतेमुळे आज बांगलादेशात कट्टरतावादाने डोके वर काढले आहे. अशावेळी पाकिस्तानकडून सहकार्याची अपेक्षा म्हणजे, स्वतःच्या पायावर धोंडा मारण्यासारखेच.
पाकिस्तानची परिस्थिती तर आणखीच बिकट. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेला हा देश जागतिक नाणेनिधीच्या अर्थकृपेवर अवलंबून आहे. पाकिस्तानात महागाईने जनतेचे कंबरडे मोडले असून, धार्मिक कट्टरतेने समाज पोखरला आहे. कट्टरतावादी लष्करामुळे पाकिस्तानात लोकशाही तशी नावालाच. कट्टरतेला खतपाणी घालून देशाची वाटचाल केवळ अंधारात होते, याचा वस्तुपाठ म्हणजे पाकिस्तान! यातून शिकण्याऐवजी युनूस यांनीही पाकिस्तानचा मार्गच अवलंबला आहे. त्यामुळे बांगलादेशचीही आता त्याच मार्गाने सुरू आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वाचे उद्दिष्ट भारतविरोधी आघाडी तयार करणे हेच आहे. पाकिस्तानने दशकानुदशके भारताला दोष देऊन, स्वतःच्या अपयशावर पडदा टाकला आहे. बांगलादेशातही काही गटांना भारतविरोधी भूमिका घेऊन राजकीय लाभ मिळवायचे आहेत. मोहम्मद युनूस यांचाही प्रयत्न याच चौकटीत बसतो. मात्र, प्रश्न यातून जनहिताचे काय? हा आहे. पाकिस्तानातील नागरिक आज बेरोजगारी, असुरक्षितता आणि अराजकतेच्या विळख्यात आहेत. बांगलादेशातील नागरिक अजूनही दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी लढत आहेत. वास्तविक १९७१ सालचे बांगलादेशचे स्वातंत्र्य भारताच्या मदतीशिवाय अशय होते. आजही भारत बांगलादेशाचा सर्वांत मोठा व्यापार भागीदार आहे. उलट पाकिस्तानकडून बांगलादेशला ठोस मदत मिळालेली नाही. पाकिस्तानने माफी मागण्यास नकार देऊन दाखवून दिले की, त्यांची मानसिकता बदललेली नाही. त्यामुळे आज प्रश्न आहे तो दोन्ही देशांच्या जनतेचा. पाकिस्तानातील जनता आणि बांगलादेशातील जनता दोघेही सत्ताधार्यांच्या स्वार्थी डावपेचांचे बळी ठरत आहेत. या देशांत कट्टरतेला पोषण दिले जाते आहे. या मार्गाने केवळ दुर्दशा आणि अपयशच हाती लागते, हे पाकिस्तानने सिद्ध केले आहे. दुर्दैवाने, बांगलादेशही आज त्याच मार्गावर घसरताना दिसतो.
बांगलादेशासाठी धडा साधा आहे. प्रगतीची वाट धर्मांधतेतून जात नाही, ती वाट जाते सुशासनातून. बांगलादेशने स्वतःमध्ये सुधारणा न केल्यास, लवकरच अंधकारमय भविष्य बांगलादेशचे वर्तमान असेल.
कौस्तुभ वीरकर