मुस्लिम आरक्षण रद्द करणार कारण ते घटनाबाह्यच! अमित शाह आणि योगींची घोषणा
25-Nov-2023
Total Views |
हैद्राबाद : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शुक्रवारी तेलंगणा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुस्लिम आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली.
अमित शाह यांनी शुक्रवारी निजामाबादमध्ये निवडणूक प्रचार सभा घेतली. यानंतर त्यांनी तेलंगणामध्ये रोड शो केला. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही खूप आश्वासने दिली आहेत. त्यापैकी एक म्हणजे मागासवर्गीयातून मुख्यमंत्री बनणार आहे. आम्ही मुस्लिम आरक्षण संपवू आणि एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षण देऊ. आम्ही मडिगा समाजालाही आरक्षणाचे आश्वासन दिले आहे.”
ते पुढे म्हणाले की, “राज्यातील गरीब महिलांना वर्षभरात चार मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासनही आम्ही दिले आहे. जो काही भ्रष्टाचार झाला आहे त्यावर आम्ही चौकशी आयोग स्थापन करू आणि भ्रष्टाचारासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा करू," असेही ते म्हणाले.
दुसरीकडे, शनिवारी कुमुरम भीम आसिफाबाद आणि वेमुलवाडा येथे भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री योगी म्हणाले की, "मुस्लिम आरक्षण घटनाविरोधी आहे. भाजप मुस्लिम आरक्षण रद्द करुन एससी, एसटी आणि ओबीसी वर्गाच्या कल्याणासाठी हे चार टक्के आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. तेलंगणातील वेमुलवाडा येथील लोकांनी सकारात्मक बदलाचे आश्वासन ओळखून भाजपला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे."
ते पुढे म्हणाले की, “तुम्हाला तुष्टीकरणाचा सर्वात घाणेरडा खेळ पाहायचा असेल तर तुम्ही तेलंगणामध्ये पाहू शकता. समाजात फूट पाडण्यासाठी आणि स्वतःचे हित साधण्यासाठी सरकार किती दूर जाऊ शकते याचे मुस्लिम आरक्षण हे उदाहरण आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष तेलंगणातील जनतेला वचन देतो की, भाजप जिंकल्यास भारतीय जनता पक्ष मुस्लिम आरक्षण संपवेल," असेही ते म्हणाले. दरम्यान, तेलंगणातील ११९ विधानसभा मतदारसंघांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहेत. याठिकाणी सत्ताधारी पक्ष बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत आहे.