ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) गट क संवर्गातील महाभरतीसाठी ११ हजार ५८८ उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु ही संपुर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्यात आली होती. पैकी १ हजार ४४७ अर्जदारांपैकी ज्यांनी परिपुर्ण माहिती संकेतस्थळवर भरली होती, त्या ७४४ उमेदवारांना परिक्षा शुल्क पोटी २ लाख १४ हजार २५० रुपये परत करण्यात आले आहेत.तरी उर्वरीत उमेदवारांनी संकेतस्थळावर बँक खात्याच्या तपशिलासह परिपुर्ण माहिती भरून शुल्क परतावा घेण्याचे आवाहन झेडपी द्वारे करण्यात आले आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ व ऑगस्ट २०२१ (अपंग व इतर सुधारीत आरक्षणासह) महाभरती करीता शासनाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. या भरतीसाठी ११ हजार ५८८ जणांनी अर्ज केले होते. मात्र ही जाहिरात, व संपुर्ण भरती प्रक्रीया रद्द करण्यात आली होती. पदभरती रद्द झाल्यामुळे उमेदवारांनी अर्जापोटी भरलेले परिक्षा शुल्क उमेदवारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी दिनांक. ०५ सप्टें. पासुन जिल्हा परिषदेच्या संकेस्थळावर परिक्षा उमेदवारांनी अर्ज भरताना त्यांच्याकडे असलेले युजर आयडी व पासवर्डचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने परत मिळण्यासाठी कळवण्यात आले होते. त्यानुसार ३१ ऑक्टोंबर पर्यत १ हजार ४४७ अर्जदारांपैकी ज्यांनी परिपुर्ण माहिती संकेतस्थळवर भरली होती अशा ७४४ उमेदवारांना २ लाख १४ हजार २५० रुपये परिक्षा शुल्क परत करण्यात आले आहेत.
ज्या उमेदवारांनी अर्जापोटी भरलेले परिक्षा शुल्क मिळण्यासाठी अद्याप अर्ज केलेले नाहीत. अशा उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्डचा वापर करून जि.प.च्या https://maharddzp.com या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने आपल्या बँक खात्याचा तपशील भरावा. जेणेकरून परिक्षा शुल्क पोटी असलेली रक्कम परत देता येणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.