मुंबई : "संतवृंदांचा परमेश्वराशी नित्य संवाद चालत असतो. भारताबाहेरील लोकांना याबाबत आश्चर्य वाटतं. परमेश्वर आणि आपले संतवृंद म्हणजे दोन शरीर एक आत्मा आहेत. ते परकीय नसतात. त्यामुळे भारतात परमेश्वर विविध रुपाने पुन्हा जन्म घेऊन येत असतो. भारतात परमेश्वर ही केवळ थिअरीची गोष्ट नाही", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी पैठण येथे केले. श्री संत एकनाथ महाराज यांचा चतुःशतकोत्तर रौप्य-सुवर्ण समारोपीय महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. त्यावेळी ते बोलत होते.
सरसंघचालक यावेळी म्हणाले, "संतांनी लिहिलेल्या पोथ्या, पुस्तकं हे फक्त लिखाण नाही. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली एकतरी ओवी प्रत्येकाने अनुभवायला हवी, त्याप्रमाणे एकनाथी भागवतातील एक वचन आपल्या जीवनात नक्कीच बाळगायला हवे. कारण त्यातील एक एक अक्षरामागे संतांच्या जीवनाची तपस्या उभी आहे."
एकनाथ महाराजांनी अंगीकारलेल्या सामाजिक समरसतेबाबत सरसंघचालक म्हणाले, "भागवतात धर्माचे चार पाय आहेत; सत्य, करुणा, सुचिता (पवित्रता), तपश्चर्या. कार्यकर्त्याने सत्यावर उभे राहून चालले पाहिजे. आपला किंवा आपल्या संघटनेचा स्वार्थ साधण्याकरीता असत्याचा मार्ग त्याने स्वीकारू नये. कार्यकर्त्याचे वागणे भेदरहीतच असले पाहिजे. सर्व समाज आपला आहे, कोणीही परका नाही. एकनाथ महाराजांनीही सर्व सामाजाला आपले म्हणून त्यांनी जवळ घेतलं. कोण काय म्हणेल याची त्यांनी परवा केली नाही. आपल्या देशात अशाप्रकारे समसरतेची वागणूक वाढवणे व ती सर्वांना शिकवणे आवश्यक आहे. एकनाथी भागवत वाचल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनात हे परिवर्तन यायला पाहिजे."
संपूर्ण जगाला 'एक कुटुंब' बनवणारे कुटुंब म्हणजे 'भारत'
"आपल्या घरात काम करायला अनेक लोकं येत असतात. त्यांच्यामुळे आपलं जीवन चालतं. म्हणजेच आपला लाँड्रीवाला, किराणा मालाच्या दुकानातील कर्मचारी, झाडलोट करायला येणारे पालिकेचे कर्मचारी यांच्याशी आपला संबंध असतोच. हे सगळे आपलेच आहेत. भारत हे संपूर्ण जगाला 'एक कुटुंब' बनवणारे कुटुंब आहे. आपल्याला सर्वांना सोबत जोडून पुढे जायचे आहे. त्यांच्या अडचणीत साथ देत पुढे जायचे आहे.", असे सरसंघचालक यावेळी म्हणाले.