२०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले होते, ते जगातील सर्वात उंच युद्धभूमी असा लौकिक असलेल्या सियाचीनमध्ये. तेव्हापासून दरवर्षी पंतप्रधान दिवाळी सशस्त्र दलातील जवानांसोबत उत्साहाने साजरी करतात. परिणामी, नागरिकांचाही अशा सैनिक सन्मानासारख्या उपक्रमांमध्ये सहभाग वाढलेला दिसतो. म्हणूनच राष्ट्रवाद जागवणारा हा दीपोत्सव केवळ एक उपचार नव्हे, तर बदलत्या भारताच्या सर्वांगीण कटिबद्धतेचे दर्शन घडविणारा राष्ट्रोत्सवच!
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर २०१४ सालच्या दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले, ते जगातील सर्वात उंच युद्धभूमी असा लौकिक असलेल्या सियाचीनमध्ये. बर्फाळ शिखरांचे रक्षण करणार्या सैनिकांचे मनोबल वाढावे, ही त्यामागील भावना. जवानांच्या शौर्याचे तसेच धैर्याचे त्यांनी मनसोक्त कौतुक केले. विशेष म्हणजे, त्यापूर्वीच्या दहा वर्षांत एकाही पंतप्रधानाने सियाचीनला भेटही दिली नव्हती. पण, मोदी २०१४ पासून अतिदुर्गम सुरक्षा चौक्यांवर तैनात सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करत आहेत. प्रथेप्रमाणे यावर्षीही हिमाचल प्रदेशमध्ये लेपचा येथे सैनिकांसोबत त्यांनी दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. २०१९ मध्ये पंतप्रधानपदाची दुसर्यांदा शपथ घेतल्यानंतर, जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये तैनात जवानांसोबत मोदींनी दिवाळीचा सण साजरा केला होता. पाकिस्तानी सैन्याने जिल्ह्यातील फॉरवर्ड पोस्टला लक्ष्य केल्यानंतर, काही तासांतच पंतप्रधानांचा हा दौरा झाला होता. म्हणूनच सैनिकांचे मनोबल उंचावणारा तो दौरा लक्षणीय ठरला.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असतानाही, नरेंद्र मोदी आवर्जून सैनिकांसोबत दिवाळी साजरी करायचे. सुरक्षा दलांना दिवाळीच्या कालावधीत त्यांच्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करता येत नाही. दुर्गम सीमेवर देशाच्या सीमांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर असते. म्हणूनच अशा कुटुंबापासून लांब असलेल्या जवानांसाठी पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष सीमेवर जाऊन हा दीपोत्सव साजरा करतात. सैनिकांशी मनमोकळी बातचित करण्याबरोबरच त्यांना मिठाई भरवून अगदी कुटुंबप्रमुखाप्रमाणे मोदी आपुलकीने विचारपूस करतात. त्यामुळे साहजिकच सुरक्षा दलांचे मनोधैर्यही वाढते. पंतप्रधानांची भेट हा खरं तर या सैनिकांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक ठरतो. अशी ही सशस्त्र दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा जीवनात एक वेगळाच आनंद प्रदान करणारी ठरते.
असा हा सीमावर्ती भागातील पंतप्रधानांचा दौरा कठीण प्रदेशात तसेच खडतर हवामानात सदैव देशाच्या संरक्षणासाठी समर्पित भावनेने रक्षण करणार्या सैनिकांचे मनोबल वाढवणारा ठरतो. त्यांचा सीमावर्ती भागाचा दौरा देशाच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा संदेशही देणारा आहे. त्यांचा हा दौरा शेजारील राष्ट्रांना एक स्पष्ट संदेश देणारा आहे की, भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे. हा दौरा त्यांना सैनिकांशी संवाद साधण्याबरोबरच त्यांच्या गरजा समजून घेण्याची संधी देतो.
आपल्या प्राणांची आहुती देणार्या जवानांना श्रद्धांजली वाहण्याची, सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्याची, सैनिकांचे मनोबल वाढवण्याची तसेच त्यांना प्रेरित करण्याची संधी म्हणून त्यांच्या या उपक्रमाकडे पाहिले पाहिजे. पंतप्रधान मोदी यांचा देशांच्या सीमांचे रक्षण करणार्या भारतीय सैनिकांसोबत साजरा करण्याची परंपरा एक उत्सव म्हणून आता साजरा होत आहे. संपूर्ण देशातील नागरिकांना एक संदेश त्यातून गेला आहे. सशस्त्र दलांबद्दलचा नितांत आदरभाव त्यायोगे वाढला आहे.
दिवाळी हा दीपोत्सव. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक मानला जाणारा सण. सैनिकांच्या अविचल भावनेने तसेच राष्ट्राच्या रक्षणासाठी त्यांच्या समर्पित भावनेचे प्रतिनिधित्व करतो. हा शुभ प्रसंग त्यांच्यासोबत साजरा करून, मोदी त्यांच्या वचनबद्धतेची जाणीव देतात. त्याग, कृतज्ञता आणि एकतेचा शक्तिशाली संदेश यातून दिला जातो. त्यांची उपस्थिती तसेच परस्पर संवादामुळे सैनिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते. मनोबल वाढवणे, राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लावणे; तसेच सामान्य जनतेमध्ये सशस्त्र दलांची प्रतिमा उंचावणे हे कार्य प्रभावीपणे केले जाते.
पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेली ही परंपरा आता प्रखर राष्ट्राभिमान तसेच आदराचे प्रतीक बनली आहे. म्हणूनच देशवासीय आता सीमेवरील जवानांसाठी फराळ तसेच मिठाई पाठवतात, ‘एक दिवा जवानांसाठी’ असे उपक्रम राबवले जात आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण करणार्यांचे राष्ट्रकल्याणासाठी त्यांचे असलेले योगदान अधोरेखित करण्याचे महत्त्वपूर्ण काम या उपक्रमाने केले आहे. राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्याबरोबरच नागरिकांमध्ये कृतज्ञता तसेच कौतुकाची भावना निर्माण केली आहे. नागरी-लष्करी संबंध मजबूत झाले आहेत. सशस्त्र सेना आणि सर्वसामान्य यांच्यातील दरी कमी झाली आहे. राष्ट्रीय अभिमान, सैन्यदलांबद्दल आदर वाढवणारी अशी ही परंपरा. देशाच्या सीमांचे रक्षण करणार्यांच्या सन्मान करण्याचे काम म्हणून ही परंपरा ओळखली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या आधुनिकीकरणाला चालना दिली. त्यामुळे लष्कराची क्षमता लक्षणीयरित्या वाढली आहे. भारताची संरक्षण क्षमता वाढवणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट. सैन्यासाठी नवी आणि अधिक शक्तिशाली अस्त्र-शस्त्रास्त्रे खरेदी केली जात आहेत. लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्रे, तोफखाना आणि इतर शस्त्रास्त्रे यांचा समावेश आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापरही वाढवला जात आहे. त्यांच्यासाठी नवा गणवेश आणला गेला. भारतीय सैन्य अधिक शक्तिशाली तसेच ते आधुनिक होण्यावर भर दिला जात आहे.
देशावर हल्ला झाल्यानंतर निषेधाचा खलिता न पाठवता, शत्रू राष्ट्राच्या प्रदेशात खोलवर घुसून चोख प्रत्युत्तर पंतप्रधान मोदी यांच्यात काळात देण्यात आले. म्हणूनच ‘सर्जिकल स्ट्राईक’, ‘एरियल स्ट्राईक’ भारतीय सशस्त्र दलांनी यशस्वी करून दहशतवाद्यांच्या तळावर यशस्वी हल्ले करण्यात आले. चीनने केलेल्या आगळिकीला डोकलाममध्ये चोख प्रत्युत्तर देण्यात आले. चिनी सैनिकांच्या अक्षरशः माना मोडण्यात आल्या. भारतीय सैन्याच्या उंचावलेल्या मनोबलाचा तडाखा चीनने अनुभवला. सैन्यशक्तीचा परिचय करून देण्याचे मोलाचे काम मोदी यांनी केले. म्हणूनच मनोबल वाढले. पंतप्रधान मोदी यांचा प्रखर राष्ट्रवाद दिसून येतो. लेपचा येथे बोलताना ते म्हणाले की, “सणासुदीच्या दिवशी तुमच्या कुटुंबापासून दूर सीमेवर तैनात राहणे, हा स्वतःच कर्तव्याप्रति निष्ठेचा सर्वोच्च बिंदू आहे.
प्रत्येकाला कुटुंबाची उणीव भासते; पण या कोपर्यातही तुमच्या चेहर्यावर दुःख दिसत नाही. तुमच्यात उत्साहाचा अभावही दिसत नाही. तुम्ही उत्साहाने, ऊर्जेने भरलेले आहात. कारण, तुम्हाला माहीत आहे की, १४० कोटी देशवासीयांचे मोठे कुटुंबदेखील तुमचेच आहे. त्यामुळे देश तुमचा कृतज्ञ आणि ऋणी आहे. म्हणूनच दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घरात तुमच्या सुरक्षेसाठी एक दिवाही लावला जातो. म्हणूनच प्रत्येक पूजेत तुमच्यासारख्या वीरांसाठी प्रार्थना असते.” त्यांनी ही व्यक्त केलेली भावना सर्व काही सांगून जाते.