जीएसटी चोरांना दणका! चुकीचे बिल बनवल्यास होणार मोठी सजा
10-Nov-2023
Total Views | 158
नवी दिल्ली : जीएसटी कर संकलनात विक्रमी वाढ होत आहे. पण दुसरीकडे एक लाखाहून अधिक लघू आणि मध्यम आकाराचे उद्योग वस्तू आणि सेवा कराच्या ई-इनव्हॉइसिंग मानकांचे पालन करत नाहीत. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरातील ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी ई-इनव्हॉइसिंग मानकांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
देशभरातील सुमारे २० ते ३० टक्के उद्योग जीएसटी ई-इनव्हॉइसिंग भरताना मानकांचे पालन करत नाहीत. जीएसटी कार्यालयाने अशा उद्योगांना नोटीस पाठवून जीएसटी ई-इनव्हॉइसिंग नियमांचे पालन करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यासोबत नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल हे सुद्धा सांगण्यात आले आहे.
जीएसटी कायद्यानुसार चलन जारी न करणे किंवा चुकीचे चलन जारी करणे हा जीएसटी कायद्यानुसार गुन्हा आहे. जीएसटी कायद्यानुसार चलन जारी न केल्यास कर थकबाकीच्या १०० टक्के किंवा १०,००० रुपये दंड आकारला जातो. तर चुकीचे चलन दिल्यास २५,००० रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.