चीन पाकिस्तानला पळता भुई थोडी होणार! हवाई दलात दाखल झाले स्वदेशी तेजस
04-Oct-2023
Total Views |
बंगरुळू : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने बुधवारी पहिले दोन सीटर लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजस विमान भारतीय हवाईदलाला सुपूर्द केले आहे. हे विमान भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्याकडे बेंगळुरू येथे सुपूर्द करण्यात आले आहे.
याबद्दल बोलताना हवाई दल प्रमुख व्हीआर चौधरी म्हणाले की, "आजचा दिवस महत्त्वाचा असून पहिले दोन आसनी एलसीए विमान स्वीकारणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आजचा दिवस इतिहासात एक उल्लेखनीय दिवस म्हणून नोंदवला जाईल. तसेच हे भारतीय देशांतर्गत विमान वाहतूक उद्योगाच्या ताकदीचे उदाहरण आहे," असेही ते म्हणाले.
हे विमान वजनाने हलके असून याचा उपयोग प्रशिक्षणासाठी करण्यात येणार आहे. तसेच हे विमान कोणत्याही प्रकारच्या वातावरणात उडण्यास सक्षम आहे. भारतीय हवाई दलाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला १८ दोन सीटर विमानांची ऑर्डर दिली आहे.
त्यापैकी ८ विमाने पुढील वर्षी देण्यात येतील. उर्वरित १० विमाने २०२६-२७ पर्यंत उपलब्ध होतील. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने सांगित्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारचे विमान तयार करण्याचे काम सुरु होते. हे विमान उत्तमोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्यात आले असून गरज पडल्यास ते लढाऊ विमानाचे कामही करु शकेल.