पाक आणि तालिबानी

    04-Oct-2023   
Total Views |
MInister Sarfraz Bugti Says illegal immigrants in the country to leave Pakistan

पाकिस्तानमध्ये यावर्षी आतापर्यंत २४ आत्मघातकी हल्ले झाले. त्यापैकी १४ आत्मघातकी हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानच्या व्यक्ती गुन्हेगार आहेत. तसे पाकिस्तानकडे पुरावे आहेत. पाकिस्तानमध्ये ४.४ दशलक्ष लोक अफगाणिस्तानहून आलेले निर्वासित म्हणून पाकमध्ये वास्तव्यास आहेत. त्यापैकी १.७३ दशलक्ष लोकांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये राहत असलेल्या अफगाणिस्तानच्या नागरिकांनी दि. १ नोव्हेंबरपर्यंत पाकिस्तान स्वखुशीने सोडावा. तसे केले नाही, तर जबरदस्तीने त्यांना पाकिस्तान सोडण्यास भाग पाडले जाईल,” असे पाकिस्तानचे गृहमंत्री सरफराज बगुती यांनी म्हटले.

यावर अफगाणिस्तानचे सत्ताधारी प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद यांनी म्हटले की, ”हे होणे शक्य नाही. पाकिस्तानमध्ये असलेले अफगाणी दि. १ नोव्हेंबरपर्यंत अफगाणिस्तानमध्ये परत येणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत पाकिस्तानने कोणतीही कडक कारवाई करू नये.” जो पाकिस्तान अफगाणिस्तानच्या तालिबान्यांना अगदी कुठे ठेवू नि कुठे नको करायचा, त्याच पाकिस्तानचे या अफगाणिस्तानशी संबंध का चिघळले? पाकिस्तानचे म्हणणे आहे की, ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या दहशतवादी संघटनेला तालिबानी राजवट संरक्षण देते. या संघटनेचे दहशतवादी पाकिस्तानमध्ये येतात, दहशतवाद करतात आणि पुन्हा अफगाणिस्तानमध्ये आरामात जातात, तर अफगाणिस्तानचे म्हणणे आहे की, पाकिस्तान अमेरिकेला अफगाणिस्तानवर ड्रोन हल्ले करण्यासाठी मदत करतो. तसेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध तोरखम सीमेमुळे बिघडले.

अफगाणिस्तानने या सीमेच्या त्यांच्या हद्दीजवळ बंकर बनवण्याचे काम सुरू केले. यावर पाकिस्तानने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उठवला आणि सांगितले की, ’पाकिस्तानला निशाणा बनवण्यासाठी अफगाणिस्तान हे बंकर बनवत आहे.’ यावर अफगाणिस्तानचे म्हणणे की, काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तान येथून तोरखम सीमेमार्गे भारतामध्ये अंजीरने भरलेला ट्रक जात होता. त्यावेळी बलुचिस्तान येथील पाकिस्तानी सैन्य चौकीजवळ हा ट्रक जाळण्यात आला. पाकिस्तान अफगाणिस्तानविरोधात छुप्या कारवाया करीत आहे. त्यानंतर वादचर्चा होऊन तोरखम सीमा दोन्ही देशांनी बंद केली, तर ड्युरंड सीमारेषेवरून दोन्ही देशांत सातत्याने हिंसक संघर्ष होत आली आहे.

१८९३ साली अफगाणिस्तानचा तत्कालीन राजा आणि भारतातल्या ब्रिटिश सरकारचे विदेशमंत्री मोर्टिमर ड्युरंड यांनी एक करार केला होता. त्या करारानुसार, भारत आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरचा काही भूभाग भारताला देण्यात आला होता. १९४७ साली भारतातून ब्रिटिश गेले. भारत स्वतंत्र झाला. पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यामुळे अफगाणी राजा आणि ब्रिटिश यांच्या कराराने भारताला मिळालेली जमीन ही पाकिस्तानला आयतीच मिळाली. खरे तर हा भूभाग कराराद्वारे भारताचा हिस्सा होता. पण, पाकिस्तानने तोही बळकावला. यावर अफगाणिस्तान सत्ताधार्‍यांचे आणि आताच्या तालिबान्यांचेही म्हणणे आहे की, ’ब्रिटिश निघून गेले, त्यामुळे करारही संपला. पाकिस्तान जबरदस्तीने या भूभागावार कब्जा करीत आहे.’

दुसरीकडे या भूभागावर पश्तून समाजाची लोकसंख्या जास्त आहे, तेही पाकिस्तानमधून वेगळे होण्यासाठी संघर्ष करीत असतात, तर अशा या ड्युरंड करारांतर्गत प्राप्त झालेल्या भूभागावर हक्क नवे तालिबानी सरकार सांगणार नाही, असे त्यावेळी पाकिस्तानला वाटले होते. त्यामुळेच तालिबान्यांनी अफगाणिस्तान काबीज केल्यावर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इमरान खान म्हणाले होते की,”अफगाणने गुलामीच्या बेड्या तोडल्या. तालिबानी राजवट ही पाकिस्तान बंधुतेच्या स्वरुपात मानते; तसेच कट्टर शत्रू भारतच्या विरोधातली ही घटना आहे”

पण, तालिबान्यांनी ड्युरंड करार मानण्यास नकार दिला. येत्या काळात तालिबानी या भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न करतील म्हणून पाकिस्तानने सीमेवर काटेरी आणि वीजप्रवाहित असलेले कुंपणही टाकण्याचा घाट घातला; मात्र अफगाणी सैन्याने ते कुंपण तर उखडून टाकले होतेच. त्याशिवाय त्या तारा आणि त्यासोबतच्या वस्तूही ते सोबत घेऊन गेले. तालिबान्यांना सोबत घेऊन भारताला शह देऊ, असे स्वप्न रंगवणार्‍या पाकिस्तानविरोधात, आता तालिबानीच सशस्त्ररित्या उतरले. दहशतवाद पोसत भारताविरोधी कुभांड रचणार्‍या पाकिस्तानचे पाप आता त्याच्यापुढे उभे राहिले. यालाच म्हणतात कर्माची फळं!

९५९४९६९६३८


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.