भारताच्या विकासयात्रेत लांगुलचालनाचा सर्वाधिक धोका – पंतप्रधान नरेंद्र मोदी
अमृत कलश यात्रेचा समारोप
31-Oct-2023
Total Views | 80
नवी दिल्ली : भारताच्या एकात्मतेत आणि विकासाच्या यात्रेत लांगुलचालनाचे राजकारण हा सर्वांत मोठा धोका आहे. त्यामुळे भारतीयांनी आपल्या एकात्मतेवर आघात करणाऱ्यांपासून सावध रहावे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे राष्ट्रीय एकता दिवस आणि दिल्ली येथे अमृत कलश यात्रेच्या समारोप कार्यक्रमास संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या एकात्मतेत आणि आपल्या विकासाच्या वाटचालीत तुष्टीकरणाचे राजकारण हा सर्वात मोठा अडथळा आहे. देशवासियांनी आपल्या एकतेवर आघात करणाऱ्यांपासून सावध राहावे लागेल. जागतिक आव्हानांमध्येही भारत आज खंबीरपणे उभा आहे. देशाची ताकद कमकुवत होईल असे काहीही करू नये आणि कोणास करू देऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दांडीयात्रा सुरू झाल्यानंतर देशवासीय त्यात सामील होऊ लागले होते. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्येही लोकसहभाग दिसला असून त्याद्वारे नवा इतिहास लिहीला गेला आहे. गेल्या 75 वर्षांचा हा प्रवास समृद्ध भारताचे स्वप्न साकार करण्याचा काळ ठरत आहे. युवा भारत २१व्या शतकात राष्ट्र उभारणीत मोठी भूमिका बजावणार आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
देशाला स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत भारताला विकसित देश व्हायचे आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, येणार्या पिढीला दिलेली आश्वासने पूर्ण करायची आहेत. त्यामुळे आपल्याला आपले प्रयत्न अधिक तीव्र करावे लागतील. या अमृत महोत्सवात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शतकातील सर्वात मोठ्या संकटाचा म्हणजेच करोना संसर्गाचा आपण यशस्वीपणे सामना केला. याच काळात विकसित भारताचा रोडमॅप तयार केला याच काळात भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आणि चांद्रयान-३ चेही यशस्वी लँडिंग करून दाखविले आहे. त्यामुळे अमृत कलश अभियान हे विकसित भारताचा प्रारंभ ठरणार आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.