'पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड’ अर्थात ‘पीएमपीएमएल’चे संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) गेल्या १६ वर्षांत १९ वेळा बदलले, अशी आकडेवारी पुढे आली आहे. कोणतीही संस्था कितीही गतिमान असली, तरीही नेतृत्वबदलाचा हा वेग जरा जास्तच नाही का? पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातल्या शहर बस वाहतुकीची जबाबदारी ‘पीएमपीएमएल’कडे आहे. त्यांच्या बसेस पुण्याच्या वर्दळीत किती वेगाने धावू शकतात, हा प्रश्नच. मात्र, ‘पीएमपीएमएल’चे प्रमुख बदलण्याचा वेग सामान्यपेक्षा कितीतरी अधिक आहे, हे नक्की. अलीकडेच पाहा ना, जुलैमध्ये ‘पीएमपीएमएल’ला नवे सीएमडी लाभले; मात्र त्यांनी जम बसवेपर्यंतच, म्हणजे अलीकडे ऑक्टोबरमध्येच त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. प्रत्येक वेळी नेतृत्वबदल होताना, त्यामागे त्या-त्या वेळी काही कारणे असतीलही; मात्र वारंवार नेतृत्वबदलांचा परिणाम कारभारावर होऊ शकतो, हे लक्षात घ्यावे लागेल. आज ‘पीएमपीएमएल’ ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक वाहतुकीचे सर्वात मोठे नेटवर्क राखून आहे. पुणे शहराची वाढ चारही बाजूंनी सुरू आहे. तसतशी शहर बसची मागणीदेखील नवनव्या भागांतून वाढते. आज महामंडळाच्या सुमारे ३८१ मार्गांवर जवळपास १३ लाखांच्या आसपास प्रवासी दररोज प्रवास करतात, अशी माहिती महामंडळाच्या संकेतस्थळावर दिसते. ही सेवा यापुढील काळात अधिक विस्तारावी लागणार आहे. त्यासोबतच मेट्रोसारख्या सेवांशी अधिक निकटचे इंटिग्रेशन करणे, विविध प्रकारचे मार्ग आणि प्रवाशांची गरज लक्षात घेऊन योग्य वाहनेच ताफ्यात सामील करीत राहणे, तंत्रज्ञानाचा विविध पातळ्यांवर अवलंब अधिक प्रभावी करणे, अशा अनेक उद्दिष्टांवर या महामंडळाला काम करावे लागणार आहे. मोठ्या संख्येने असलेल्या कर्मचारी वर्गाचे कल्याण साधत पुढे जायचे आहे. यात अनेक बाह्य घटकांची मदतही लागू शकते. अशा स्थितीत ‘पीएमपीएमएल’ला स्थिर नेतृत्व दीर्घकाळसाठी लाभले, तरच योग्य परिणाम साधता येतील. सार्वजनिक वाहतूक हीच भविष्यात सर्व महानगरांची मोठी गरज भागवेल, असे तज्ज्ञ मंडळी सांगतात. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यापुढे तरी या ‘पीएमपीएमएल’ला स्थिर नेतृत्व लाभले पाहिजे, हीच अपेक्षा.
सांस्कृतिक मोसम बहरात
हिवाळा पुण्यात डोकावू लागला आहे. ‘हिवाळा’ या शब्दाने जर शिशिरातली उदासवाणी पानगळ आपल्या डोळ्यांपुढे उभी राहत असेल, तर अशा हिवाळ्याचा इथे संदर्भ नाही, हे आधीच स्पष्ट केले पाहिजे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत हिवाळा हा सांस्कृतिक बहराचा मोसम. काही पुणेकरांच्या उत्सवी उत्साहाला बाराही महिने कोणती ना कोणती निमित्ते मिळत राहतात. असे असले तरी पुण्यात मोठा ‘सांस्कृतिक आनंदोत्सव’ हा खरा गणेशोत्सवापासून सुरू होतो, असे म्हटले पाहिजे. त्यापाठोपाठ नवरात्रींचे उत्साही पर्व दसर्यापर्यंत चालते. त्यानंतर पुणेकरांचा हा उत्सव मैदाने आणि सभागृहांकडे अधिकाधिक स्थलांतरीत होत जातो. वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल सुरू होते. प्रदर्शने भरतात, कोजागरी पौर्णिमेचे कार्यक्रम रंगतात, त्यानंतर दिवाळीच्या आधी सुरू होणार्या आणि दिवाळी संपल्यानंतरही सुरू राहणार्या पहाटेंच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना भरते येते. दिवाळीसोबतच जगभर पसरलेल्या अनेक पुणेकरांना पुण्यात काही काळासाठी परतण्याचे वेध लागतात. नातेवाईक आणि मित्रपरिवाराशी होणार्या भेटीगाठींना सांस्कृतिक उपक्रमांची जोड लाभते. शहरात संगीताचे आणि सांस्कृतिक उपक्रमांचे महोत्सव, नाटके, अभिवाचनाचे कार्यक्रम, वेगवेगळी सादरीकरणे होतात. त्यातच सुट्ट्या संपवण्याचे निमित्त करून जवळपास निसर्गाच्या कुशीत प्रवासाचे उपक्रम आखले जातात. डिसेंबरचा ‘थर्टीफर्स्ट’ उलटून गेल्यानंतरही लहान-मोठे सांस्कृतिक सोहळे सुरू राहतात. मुलांच्या परीक्षा जवळ आल्या याची पालकांना जाणीव होईपर्यंत, हा सांस्कृतिक ऋतू बहरत राहतो. त्यानंतर मात्र याला काही प्रमाणात उतार लागतो. हे सगळे लिहिण्याचे कारण हा सांस्कृतिक बहर आता शहरात दिसू लागला आहे. कोजागरीच्या कार्यक्रमांच्या जाहिराती आणि बॅनर झळकू लागले आहेत. दिवाळी पहाटेच्या नियोजनालाही प्रसिद्धी मिळू लागली आहे. जिथे बुकिंग आणि रिझर्व्हेशन्स लागतात, तिथले प्लॅन खुले होऊ लागले आहेत. अगदी एखादा कोपरा धरून निवांत वाचत बसण्यात आनंद मानणार्यांसाठी, ही दिवाळी अंकांची सांस्कृतिक मेजवानी उपलब्ध होते आहे. पुण्याचा सांस्कृतिक मोसम पुन्हा एकवार बहरात येऊ लागला आहे.