मुंबई : नाटक, मालिका आणि चित्रपट या मनोरंजनाच्या प्रत्येक माध्यमात प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल महत्वाचे विधान केले आहे. 'मित्रम्हणे' या सौमित्र पोटे युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काही दिवसांपुर्वी त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना पुरस्कारांसोबत कामं देखील मिळायला हवी असेही वक्तव्य केले होते.
महाराष्ट्रातील नाट्यगृहांची अवस्था ही दिवसागणिक बिघडत चालली आहे अशी तक्रार गेली अनेक वर्ष कलाकार मंडळींकडून केली जात आहेच. याचा दुसावस्थेचा सामना कलाकारांसोबत प्रेक्षकांनाही तितकाच करावा लागतो. याबद्दल बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या की, “नाट्यगृहांची परिस्थिती तशीच आहे आधीही तशीच होती. तेव्हाही कचऱ्याचे डबे नसायचे आताही नाहीयेत. लेडीज रुमच्या आत टॉयलेट नाहीत. नाट्यगृह बांधतानाच महिला कलाकार ज्यांची मासिक पाळी असेल किंवा मेनोपॉजमधून जात असतील अशा कोणताही विचार केला गेला नाही."
त्या पुढे असं देखील म्हणाल्या की, "जर एखाद्या व्हिलचेअरवरील व्यक्तीला नाटक बघायचं असेल तर किती नाट्यगृहांमध्ये ती सोय आहे? नाहीच विचार केला गेला. जे लोक दुरुन येतात त्यांचं काय? आम्ही दुसऱ्या शहरातून जेव्हा येतो तेव्हा आम्हालाही अनेक तात्कळत राहावं लागलं आहे. का तर नाट्यगृहात शासकीय कार्यक्रम सुरु आहे.आजची नाट्यगृह एखाद्या प्रायव्हेट ट्रस्टला देण्याची गरज आहे." त्यामुळे भविष्यात निवेदिता सराफ आणि इतर कलाकारांच्या तक्रारीमुळे का होईना पण नाट्यगृह सुधारतील अशी अपेक्षा केली जात आहे.