भारताने २०४० पर्यंत अवकाशवीरांना चंद्रावर उतरवण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’ला केली. तसेच २१ ऑक्टोबर रोजी ‘गगनयान’चे पहिले चाचणी उड्डाण पार पडणार आहे. भारतही गगनभरारी घेऊ शकतो, या पंतप्रधानांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे आणि शास्त्रज्ञांच्या अविरत मेहनतीचेच हे यश म्हणावे लागेल.
‘चांद्रयान’ आणि ‘आदित्ययान’ यशस्वीपणे रवाना करण्यात आल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या २०३५ पर्यंत भारतीय अवकाश स्थानकाची निर्मिती करावी; तसेच २०४० पर्यंत भारतीय अवकाशवीरांना चंद्रावर उतरवण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना ‘इस्रो’ला केली आहे. चंद्रावर अंतराळवीर पाठवायचे असतील, तर त्याआधी भारताला त्यासाठीची आपली क्षमता सिद्ध करून दाखवावी लागेल. म्हणूनच ‘गगनयान’ ही भारताची अशी पहिली अंतराळ मोहीम आहे, ज्यात तीन अंतराळवीरांना सात दिवसांसाठी अवकाशात पाठवले जाईल. यांची निवड भारतीय हवाई दलातून केली जाईल आणि त्यांना ‘इस्रो’कडून आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल.
२०२५ मध्ये ‘गगनयान’ मोहीम पूर्ण होणे अपेक्षित आहे. ही मोहीम आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमांमध्ये भारताच्या सहभागाचा मार्ग मोकळी करून देणारी ठरणार आहे. २०३५ पर्यंत भारताचे अंतराळात स्वतःचे असे स्थानक असेल. त्याची बांधणी टप्प्याटप्प्याने होणार असून, २०२८ मध्ये याची सुरुवात केली जाईल. या अंतराळ स्थानकाचे नाव ‘इंडियन स्पेस स्टेशन’ असे असेल. वैज्ञानिक, अंतराळ पर्यटन तसेच सूक्ष्म गुरुत्वाकर्षण निर्मिती यांसह विविध कारणांसाठी या स्थानकाचा वापर केला जाईल. तसेच चंद्र आणि मंगळावरील भविष्यातील मोहिमांसाठीही त्याचा वापर केला जाईल.
२०३५ पर्यंत स्वतःचे अंतराळ केंद्र अवकाशात उभारल्यानंतर भारत २०४० पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्यासाठी सज्ज झालेला असेल. दोन अंतराळवीरांना सात दिवसांच्या कालावधीसाठी भारत चंद्रावर पाठवेल. ‘इंडियन लूनर मिशन’ या नावाने ते ओळखले जाईल. ही मोहीम आव्हानात्मक असली तरी भारताने सिद्ध केलेल्या क्षमतांचा विचार केला, तर ती सहजसाध्य आहे, असे नक्कीच म्हणता येते. ‘गगनयान’ २०२५, अंतराळ स्थानक २०३५ आणि भारताचे चंद्रावर पाऊल २०४० या भारताच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत, त्या पूर्ण करण्यासाठीची आवश्यक ती संसाधने आणि कौशल्ये भारताजवळ आहेत.
या मोहिमांच्या यशामुळे भारताचे अनेक फायदे होणार असून, आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठाही अर्थातच वाढणार आहे. या मोहिमांचे तांत्रिक तसेच आर्थिक फायदेही आहेत. व्यावसायिक अंतराळ प्रक्षेपण उद्योगाला, ते बळ देतील. तसेच यांचे यश हे भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या भावी पिढ्यांना प्रेरणादायी असेच असेल. विकसनशील देश म्हणून ओळखल्या जाणार्या भारताने महान गोष्टी साध्य केल्या, हे त्या ठळकपणे सांगतील. या मोहिमांसाठी अर्थातच आर्थिक पाठबळाची गरज आहे, जी केंद्र सरकार देत आहे; तसेच कुशल शास्त्रज्ञांची आवश्यकता यासाठी असेल. जागतिक अंतराळ कार्यक्रमात भारत एक प्रमुख देश म्हणून आपले स्थान प्रस्थापित करत आहे.
अलीकडच्या काही वर्षांत भारताच्या अंतराळ मोहिमांना वेग आला आहे. विशेषतः नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर. त्यासाठी अनेक घटकही कारणीभूत आहेत. भारत सरकारने अंतराळ मोहिमांसाठीच्या निधीत वाढ केली. म्हणूनच ‘इस्रो’ला महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणे शक्य झाले. मोदी सरकारने अंतराळ कार्यक्रमासाठी दिलेला राजकीय पाठिंबाही महत्त्वाचा ठरला. अवकाश मोहिमांना म्हणूनच प्राधान्य मिळाले आणि नोकरशाहीतील अडथळे सहजपणे दूर झाले. भारताने केलेली तांत्रिक प्रगती थक्क करणारी अशीच आहे. या प्रगतीच्या जोरावरच ‘इस्रो’ला अंतराळयान आणि प्रक्षेपक विकसित करणे शक्य झाले.
भारताच्या बदलत्या अंतराळ धोरण तसेच प्रकल्पांचे अनेक फायदेही झाले. अंतराळ कार्यक्रमात आघाडीवर असलेला देश म्हणून भारताचे नाव आदराने घेण्यात येत आहे. संरक्षण, कृषी तसेच दूरसंचार या क्षेत्रांना अंतराळ कार्यक्रमातील प्रगतीचा लाभ झाला आहे. या क्षेत्राने विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच चांगल्या नोकर्याही निर्माण केल्या आहेत. म्हणूनच यासाठी आवश्यक ते कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत आहे.
‘चांद्रयान’ मोहिमेच्या यशाने भारतीय वैज्ञानिकांना आत्मबळ दिले, असे म्हटले तर त्यात काहीही चुकीचे ठरणार नाही. या मोहिमेमुळे भारतीय वैज्ञानिकांना अवकाश खुणावू लागले. म्हणूनच सूर्याकडे ‘आदित्ययान’ झेपावले. भारताचे धोरण आणि प्रकल्पांचा वेग हा सकारात्मक विकास असून, जागतिक अर्थव्यवस्थेत आपले स्थान बळकट करण्यासाठी, ते साहाय्यभूत ठरणार आहे. पंतप्रधान मोदी हे अवकाश मोहिमांचे खंदे समर्थक आहेत. त्यांनी या मोहिमांना उच्च प्राधान्यक्रम देण्याबरोबरच त्यासाठीच्या निधीतही वाढ केली आहे. या क्षेत्रात काम करणार्या शास्त्रज्ञ तसेच अभियंत्यांसाठी ते मजबूत प्रेरक आहेत. मोहिमांना गती देण्यासाठी मोदी देत असलेले प्रोत्साहन, प्रेरणा आणि पैसा हे महत्त्वाचे घटक असून, ‘चांद्रयाना’चे यश ते अधोरेखित करते.
काँग्रेसच्या कार्यकाळात अंतराळ कार्यक्रम जणू विस्मरणात गेला होता. काँग्रेसी काळात असणारी राजकीय अस्थिरता याला कारणीभूत होती. दीर्घकालीन योजनांची अंमलबजावणी करणे; तसेच अशा मोहिमांसाठी निधी पुरवणे, ही अशक्यप्राय बाब बनली होती. याच काळात देशाला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. त्याचा थेट फटका अवकाश कार्यक्रमाला बसला. नंबी नारायणन यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीला खोट्या कटात अडकवून शास्त्रज्ञांमध्ये एक चुकीचा संदेश काँग्रेसने दिला. म्हणूनच कोणताही महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यास, ते धजावले नाहीत. ज्या पाश्चात्य देशांनी भारतीय अंतराळ मोहिमांची खिल्ली उडवली होती, तेच देश आज भारतामार्फत आपले उपग्रह किफायतशीर दरात प्रक्षेपित करत आहेत. हा विरोधाभास अचंबित करणारा आहे.
एकूणच काय तर खंबीर नेतृत्व आणि पाठबळ असेल, तर काहीही शक्य आहे, हेच भारतीय अवकाश कार्यक्रम सिद्ध करतो. तसेच या क्षेत्रात भारताचे भविष्य हे अतिशय उज्ज्वल आहे, हेही तो सांगतो. भारतीयांनो, वैज्ञानिकांनो आपण हे करू शकतो, हेच भारताचा अवकाश कार्यक्रम पुन्हा पुन्हा सांगतो आहे.