मराठीत होतोय बदल, तो स्वीकारार्हच : नीलम गोऱ्हे

    06-Jan-2023
Total Views |


मराठीत होतोय बदल, तो स्वीकारार्हच : नीलम गोऱ्हे
मुंबई : मराठी भाषा टिकवायची तर मराठी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. संस्कृती काळाच्या ओघात सतत बदलत जाते तेवढीच स्थित्यंतरे भाषेत होतं असतात. म्हणूनच कालची मराठी जाणून घेणे आणि येणाऱ्या काळात मराठीत होऊ घातलेले बदल समजून घेणे गरजेचे आहे. विश्व् मराठी संमेलनात मराठी काल, आज, उद्या या परिसंवादात काळाच्या ओघात बदलत गेलेल्या मराठीविषयी चर्चा झाली. दरम्यान, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिसंवादाचे अध्यक्षपद भूषवले.
यावेळी पोपुलर प्रकाशनचे हर्ष भटकळ, पत्रकार व लेखिका संजीवनी खेर व महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्रीकांत बोजेवार उपस्थित होते. नीलम आपले मनोगत सांगताना म्हणाल्या,”साहित्याचे लोकशाहीकरण होत आहे. पूर्वी निवडक लोक मराठीत लेखन करत परंतु, आज तरुण पिढी लिहती झाली. जगाच्या कोपर्यातून लोक मराठी बोलतात. भारतात अनेक ठिकाणी कॉरिडोर होतायत तसे महाराष्ट्रात पंढरपूर, तुळजापूरला व्हायला हवेत. जेणेकरून पर्यटनाच्या माध्यमातून मराठी उद्योगाला चालना मिळेल."
संजीवनी खेर यांनी मराठीचा सातवाहन कालीन इतिहास सांगत भाषेचा प्रवास सांगितला. त्या म्हणाल्या, “अनेक काळात मराठीत उल्लेखनीय कमगिरी केलेल्या अनेक नावांपैकी एक म्हणजे ज्ञानोबा. मराठीला दर्जा प्राप्त व्हावा त्यासाठी त्यांनी बंडखोरी केली. त्यानंतर मराठी बदलत गेली, अनेक नवे शब्द मराठीत आले, उर्दू फारसी, पोर्तुगीज भाषेतील अनेक शब्द आपण आपलेसे केले. हकीकत, सामान, तपशील, बाजार, हापूस व बटाटा हे शब्द वापरात आल्याने आपली भाषा प्रभावी झाली. हर्ष भटकळ आपल्या प्रकाशन व्यवसायासंबंधी बोलताना म्हणाले,”मराठीने इतर भाषांशी सांगत जोडायला हवी.
 
मराठी साहित्य प्राचीन काळापासून मौखिक स्वरुपात होतं. त्यानंतर गुरु शिष्य पद्धतीत पोथी प्रचलित झाली. तेव्हापासून लिखित साहित्याची सुरुवात झाली. मराठी भाषिक संखेच्या मानाने मराठी भारतातील तिसरी तर जगातील १० वी भाषा आहे. आम्ही प्रकाशित केलेल्या कैदी नंबर ६६१ पुस्तकात लेखकाने नवीन शब्द सामील केले आहेत. अशी भर मराठीत नियमितपणे व्हायला हवी. या अतिक्रमणाने भाषा मरत नाही तर तिच्यावर संस्कार होतात. आपण भाषा शुद्धीपेक्षा भाषावृद्धीकडे लक्ष पुरवायला हवे.” श्रीकांत माराठीबद्दल बोलताना अभिमानाने बोलत होते. त्यांनी सांगितले, “४० वर्षांपूर्वीपासून मराठीला उतरती कळा लागली अस वक्तव्य शेजवळकरांनी केल होतं. आजही आपण तेच बोलतोय. मराठीत बदल जरूर झाले परंतु ती संपुष्टात मात्र आली नाही. वृत्तपत्राचा संपादक असल्याने मला हे सांगावस वाटत, पूर्वी वृत्तपत्र ३२ मिनिटे वाचलं जात होतं , आज तो वेळ ७ मिनिटांवर आला आहे. आपण पु. ल, व तत्कालीन लेखकांना वाचतोच परंतु आजचा तरुण काय लिहितो हे पहिले तर आजची मराठीची स्थिती आणि श्रीमंती तुमच्या लक्षात येईल.
 
दरम्यान या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. “मी निमंत्रित वक्ता नव्हतो परंतु मराठीच्या प्रेमाने मला इथवर ओढून आणलं!” असे म्हणत कपिल पाटील यांनी मराठीच्या वृद्धीसाठी प्रयत्न वाढायला हवेत हे सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.