मुंबई :उत्तर प्रदेशातील अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन बांधले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात याआधी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक व गोरखपूरचे खासदार रवि किशन देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी केली होती. त्या मागणीला योगी आदित्यनाथ यांनी होकार दिल्याची माहिती शिंदेंनी दिली. लवकरच आपण प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर येणार असल्याचेही यावेळी त्यांना सांगितले. राज्यपालांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली.