दिव्यांग नव्हे दिव्यत्वाची प्रचिती!

    04-Jan-2023   
Total Views |
 
Dr. Prabhati Chavan
 
 
 
 
दिव्यांग व्यक्तीला जे जे भोगावे लागते, ती सगळी दु:खे पचवत डॉ. प्रभावती चव्हाण दिव्यांगासाठीच नाही,तर समाजातील प्रत्येक शोषित-वंचित घटकासाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. त्यांच्याविषयी...
 
 
प्रभावती जन्मजात पोलिओमुळे एका पायाने दिव्यांग. त्या वयाच्या चार वर्षांपर्यंत तर धड चालूही शकत नव्हत्या. मात्र, आई शांताबाईंनी धीर न सोडता त्यांचे उपचार केले. त्यामुळे वयाच्या सातव्या वर्षांपर्यंत प्रभावती काठीच्या साहाय्याने शाळेत जाऊ लागल्या. मात्र, शाळेत काही द्वाड विद्यार्थी दिव्यांग म्हणून त्यांचा अपमान करायचे. त्यांना असह्य झाले आणि त्या दु:खातच त्या त्यांच्या वडिलांना चंद्रभान यांना, जे अमरावती जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी होते, त्यांना म्हणाल्या की, “मी शाळेत जाणार नाही.” यावर चंद्रभान प्रभावतींना म्हणाले, “तू शाळेत जा बेटा. तू अपंग नाहीस, तर त्ाुला कमी लेखणार्‍यांचे मन अपंग आहे. तू आयुष्यात असं काही करणार आहेस की, आमचं नाव रोशन होईल.” हे ऐकून छोट्या प्रभावतींना हुरूप आला. दुसरीकडे आईलाही शेजारणी म्हणत, “बाई, तुझी लेक सुंदर आहे, पण तिचे काय होईल पुढे?” यावर आई म्हणायची, “माझी लेक हुशार आहे. ती स्वत:च्या पायावर उभी राहील.” आई-वडिलांच्या बोलण्यामुळे प्रभावतींच्या मनात आत्मविश्वास आला.
 
 
आपण आपले अस्तित्व निर्माण करायचेच, ही प्रेरणा आली. आज त्याच प्रभावती डॉ. प्रभावती आहेत. त्यांनी ‘माध्यमिक शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, भावनिक बुद्धिमता अमरावतीच्या आणि सामाजिक परिपक्वतेचा त्यांच्या शैक्षणिक संपादणुकीवर होणार्‍या परिणामाचा अभ्यास’ या विषयात पीएच.डी करून ’डॉक्टरेट’ मिळवली. तसेचे डी.एड्, बी.एड्,एम.एड्,एम.फिल् असलेल्या प्रभावती यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल अशा तब्बल आठ विषयांमध्ये पदव्युत्त्र शिक्षण घेतले, तर सध्या त्यांचे संस्कृतचे पदव्युत्तर शिक्षण सुरू आहे. त्यांनी ‘संगीत विशारद’ ही पदवीही मिळवली आहे. त्याचबरोबर डीएसएमए, डी.एनवायएस (नेच्युरोपॅथी) या डिग्रीही प्राप्त केल्या आहेत. सध्या अमरावतीच्या चांदुरबाजार येथे त्या निमसरकारी शाळेत शिक्षिका आहेत. चर्मकार विकास संघाच्या अमरावती शहराच्या त्या महिला अध्यक्षा आहेत. याचबरोबर विदर्भातील अनेक शैक्षणिक मंडळांवर त्या जबाबदारीच्या पदावर आहेत. डॉ. प्रभावती यांचा जीवनप्रवास सोपा नाही.
 
 
 
अमरावतीच्या चंद्रमान चव्हाण आणि शांताबाई चव्हाण यांना चार अपत्ये. त्यापैकी एक प्रभावती. शाळेत असताना त्या कविता करू लागल्या. त्या उत्तम चित्रकार, गाण्याचीही सुरेल जाण त्यांना होती. वक्तृत्वही चांगले होते. त्यातच शाळेत त्यांनी पहिला क्रमांक कधी सोडला नाही. या सगळ्यामुळे शाळेत आदर्श विद्यार्थिनी होत्या. नववीत असतानाच प्रभावतींना शिवणकामाची आणि भरतकामाची आवड लागली. नववीत असतानाच त्या ओळखीच्या सर्वच महिलांच्या साड्यांवर भरतकाम करून द्यायच्या. ही सगळी आवड असली तरीसुद्धा प्रभावती यांना शिक्षक व्हायचे होते. दहावी झाल्यानंतर त्यांनी ‘अ‍ॅम्ब्रॉयडरी अ‍ॅण्ड नीडल्स’ हा ‘आयटीआय’चा कोर्स केला आणि रात्र महाविद्यालयात शिक्षण सुरू केले. अकरावीला असतानाच त्यांना डी.एड्मध्ये प्रवेश मिळाला. डी.एड् करता करता त्यांनी बी.एचे शिक्षण पूर्ण केले. चांगली नोकरी लागली. ‘या मुलीचे पुढे कसे होणार?’ विचारणारे प्रभावतीच्या आई-वडिलांना म्हणू लागले, “मुलगी गुणी आहे. छान शिकली. पायावर उभी राहिली.” असे जरी असले तरीसुद्धा सुंदर उच्चशिक्षित आणि सर्वगुणसंपन्न प्रभावतींना विवाहासाठी तोडीस तोड स्थळ मिळत नव्हते. कारण, दिव्यांगता. शेवटी भाजी मार्केटमध्ये उलाढाली करणार्‍या अशोक रावळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रभावती यांनी अशोक यांना शिक्षणासाठी उद्युक्त केले. दहावी-बारावीची परीक्षा देऊन अशोक उत्तीर्णही झाले.
 
 
विवाहाच्या पाच वर्षांत प्रभावती यांना तीन अपत्ये झाली. या दरम्यान प्रभावती यांनी बी.एड्ही केले. मात्र, कुठेतरी माशी शिंकली. त्या सुंदर, उच्चशिक्षित आणि पतीपेक्षा त्यांचा पगार कितीतरी पट जास्त होता, हा जणू त्यांचा अपराधच ठरला. प्रभावती यांना भयंकर घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. त्यानंतर अनेक दु:खद घडामोडी घडल्या आणि प्रभावती यांचा संसार मोडला. चौथीला आणि दुसरीला शिकणार्‍या दोन मुली आणि बालवाडीत शिकणार्‍या मुलाला घेऊन प्रभावती माहेरी परतल्या. कित्येक तडजोडी करत मांडलेला संसार मोडला, हे दु:ख त्यांना झालेच. मात्र, तीन मुलांना सांभाळायचे होते. तसेच स्वत:चे अस्तित्वही प्रभावती यांना निर्माण करायचे होते. यांनी मग स्वत:च्या शैक्षणिक विकासाला आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली. चर्मकार समाजातील महिलांच्या शैक्षणिक विकासासाठी त्या काम करू लागल्या. महिलांना आणि अल्पशिक्षित युवकांना परंपरागत चर्मकार व्यवसायातून रेाजगार कसा मिळेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आज त्यांच्या घरात, समाजात आणि विदर्भातील शैक्षणिक वर्तुळात डॉ. प्रभावती यांचे नाव आदराने घेतले जाते. खरेच आयुष्यात सुखाची प्रतीक्षा करत करत कित्येकांचे आयुष्य दु:खातच व्यतित होते. मात्र, आलेल्या परिस्थितीशी सरळ सामना करत नशिबात जे काही होणार आहे, याचे गृहितक टाळत यशस्वी होणार्‍या काही मान्यवर व्यक्तीही आहेत. या व्यक्तींमध्ये डॉ.प्रभावती चव्हाण यांचे नाव अग्रक्रमाने लिहायला हवे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.