मुंबई/नवी दिल्ली : “प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला मुंबईवर हवाई हल्ला होऊ शकतो,” असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. दहशवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सतर्कता बाळगण्यात येत आहे. शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनाचा शासकीय समारंभ होत असतो. त्यामुळे संभाव्य हल्ला लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून दादरच्या शिवाजी पार्कला ‘नो फ्लाय झोन’ घोषित करण्यात आले आहे.
२६ जानेवारीला शिवाजी पार्कवर हवाई हल्ला होणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार सुरक्षेचा उपाय म्हणून या क्षेत्राला ‘नो फ्लाय झोन’घोषित करण्यात आले आहे.दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या समारंभानिमित्त दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव उप-पारंपरिक हवाई उड्डाणांवर दिल्लीत बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही ही उपाययोजना करण्यात आली आहे.
“सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीत पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा-मोटर, हँग-ग्लाइडर्स, युएव्ही, युएएस, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, रिमोटली पायलट एअरक्राफ्ट, हॉट एअर बलून, लहान पॉवर एअरक्राफ्ट यासारख्या हवाई वाहनांना परवानगी नसेल,” असे आदेश दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी जारी केले आहेत. दिल्लीत ज्याप्रमाणे सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच, मुंबईतही सतर्कता बाळगण्यात येत असून, पोलिसांकडून आवश्यक उपाययोजना केली जात आहे.