
द्वेषाद्वारे देश जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (रा. स्व. संघ) रोखण्याचे त्यांच्या (राहुल गांधी) बापजाद्यांनी भरपूर प्रयत्न केले. संघावर विनाकारण दोनवेळा बंदी लादण्यात आली. मात्र, तरीदेखील संघ थांबला नसून सतत संघाची सतत वाढच होत आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कृतींची चिंता करण्याची संघाला गरज नाही, असा जोरदार टोला रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी सोमवारी लगाविला आहे.
काँग्रेस पक्षातर्फे सध्या राहुल गांधी यांना पुन्हा राजकीयदृष्ट्या लाँच करण्यासाठी भारत जोडो नामक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून रा. स्व. संघाच्या जुन्या गणवेशाचा भाग असलेली खाकी अर्धी विजार जाळताना दाखविली आहे. त्याचप्रमाणे पुढील १४५ दिवसात “देशाला द्वेषाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आणि भाजप-आरएसएसने केलेले नुकसान पूर्ववत करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आपण आपले ध्येय गाठू”, असा द्वेषपूर्ण मजकूर त्यासोबत लिहिला होता.
काँग्रेसच्या या कृत्याविषयी पत्रकारांनी रायपूर येथे सुरु असलेल्या रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीमध्ये सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले, त्यांच्या (काँग्रेस व गांधी कुटुंब) मनात रा. स्व. संघाविषयी अगदी सुरुवातीपासूनच द्वेष ठासून भरलेला आहे. त्यांच्या बापजाद्यांनीही संघाचा भरपूर तिरस्कार आणि द्वेष केला, सर्वशक्तीनिशी संघाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी दोनवेळा विनाकारण संघावर बंदीही लादली. मात्र, त्यांना यश आले नाही. संघ त्यामुळे थांबला नसून तो सतत वाढतच असल्याचे डॉ. वैद्य यांनी म्हटले.
त्याचे कारण म्हणजे संघाकडे सत्याचा सिद्धांत आहे आणि त्या सिद्धांतावर वाटचाल करणारी, आवश्यक ते त्याग व बलिदान करणाऱ्या पिढ्या संघासाठी कार्यरत असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, त्यांना देश द्वेषाने जोडावयाचा आहे का; असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. संघाचा गणवेश कधीच बदलला आहे, याचीही त्यांना माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या अशा कृत्यांचा फार विचार करण्याची संघाला गरज नसल्याचेही डॉ. वैद्य यांनी यावेळी नमूद केले.
काँग्रेसची ‘भारत तोडा’ आणि ‘आग लावा’ यात्रा – भाजपचा टोला
गांधी कुटुंब आणि काँग्रेसच्या संघद्वेषावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबीत पात्रा यांनीदेखील जोरदार टिका केली. ते म्हणाले, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने विचारपूर्वक आपल्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांवरून दहशतवाद्यांना केरळमध्ये संघ आणि भाजप कार्यकर्त्यांना संपविण्याचा संदेश दिला आहे. काँग्रेस पक्षाने त्यावरून आपल्या घाणेरड्या राजकारणाचे प्रदर्शन पुन्हा एकदा केले आहे. राहुल गांधी यांचे कुटुंब आणि काँग्रेस पक्षाला द्वेष आवडतो. राहुल यांचे वडिल आणि त्यांच्या कुटुंबाच्या निर्देशानुसारच शीखविरोधी दंगल होऊन त्यात ५ हजारांहून शीखांचे शिरकाण करण्यात आले होते. त्यामुळे यांना भाजप आणि संघ कार्यकर्त्यांना जीवंत जाळावयाचे आहे का, याचे उत्तर राहुल गांधी यांनी देण्याचे आव्हान डॉ. पात्रा यांनी केले आहे.
द्वेषाची क्रोनॉलॉजी !
राहुल गांधी यांना देशात आग लावणे आवडत असल्याचे डॉ. पात्रा यांनी काही जुन्या विधानांमधून दाखवून दिले -
• २०२१ – २२ - राहुल गांधी यांनी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये “पूर्ण भारतात केरोसीन पसरले असून केवळ एक जळती काडी टाकण्याचा अवकाश आहे” असे वक्तव्य करून परदेशात जाऊन भारतात आग लावण्याचे षडयंत्र रचले होते.
• २०२१ – शेतकरी कृषी कायद्यांविषयी जाणून घेतील, तेव्हा देशात आग लागेल असे वक्तव्य केले होते.
• मे २०२२ - राजस्थानमध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिरात राहुल यांनी, काही महिन्यातच देशात आग लागेल; असे वक्तव्य केले होते.
• २०२२ – अग्नीवीर योजनेवर टिका करतान राहुल गांधी यांनी “युवकांनी भारतात आग लावावी” असे वक्तव्य केले होते.